पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2

1. खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे.
नाकतोडा – साप – भातशेती – गरुड – बेडूक
उत्तर :
दिलेल्या अन्नसाखळीचा योग्य क्रम खालीलप्रमाणे :
भातशेती → नाकतोडा → बेडूक → साप → गरुड

i) दिलेली अन्नसाखळी ही शेती परिसंस्थेशी संबंधित असून ती एक मानवनिर्मित भू-परिसंस्था आहे.
ii)) या मानवनिर्मित परिसंस्थेचे मानवाकडून कृत्रिमरीत्या व्यवस्थापन केले जाते.
iii) दिलेल्या परिसंस्थेत, भातशेतीतील पिके ही प्राथमिक उत्पादके आहेत, त्यांना सूर्यापासून ऊर्जा मिळते. ही ऊर्जा पिकांवर जगणाऱ्या प्राथमिक भक्षकांना म्हणजेच नाकतोड्यांना मिळते. त्यानंतर ती ऊर्जा नाकतोड्यांवर जगणाऱ्या द्वितीयक भक्षक बेडकांना मिळते. बेडकांकडून ती ऊर्जा तृतीयक भक्षक सापापर्यंत पोचते. सर्वात शेवटी सर्वोच्च भक्षक गरुडांना मिळते.
2. ‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
i) जसजशा नव्या पिढ्या निर्माण होतात, तसतशा जुन्या पिढ्या नष्ट होत जातात. आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पात घडवून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम घडले आहेत.
ii) मुळात असलेले सजीव, त्यांच्यात असलेल्या आंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव्य यांचा समतोल मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे.
iii) औद्योगिकीकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळी खंडित झाली आहे.
iv) मानवाच्या अफाट लोकसंख्यावाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न,वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्याच लक्षात आले नाही.
v) परिणामी, जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केली तिचे संपूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करीत आहोत. हा विकास शाश्वत नाही.
vi) नैसर्गिक साधनसंपदांचा अवाजवी उपयोग केल्याने पुढच्या पिढ्यांना अशा संपदा उपलब्ध होणार नाहीत. उदा., जीवाश्म इंधने, विविध धातू इत्यादी.
vii) आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला ओरबाडून घेतल्यामुळे हवामानबदल, प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढीला तोंड द्यावे लागेल. म्हणून आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्काने मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवायची आहे.
viii) यालाच शाश्वत विकास असे म्हटले आहे. म्हणूनच आपल्याला पृथ्वी पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
3. टिपा लिहा.
अ. पर्यावरण संवर्धन
उत्तर :
i) पर्यावरणाचे संरक्षण करणे, त्याची जोपासना कारणे, त्याचे व्यवस्थापन करणे म्हणजेच पर्यावरण संवर्धन होय.
ii) पर्यावरणातील कोणत्याही स्वरूपाचे असंतुलन हे थेट जैविक घटकांच्या अस्तित्वास हानी पोहोचवू शकते, म्हणूनच पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे.
iii) अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा पर्यावरण पूर्ण करते. पर्यावरणातील घटकांतूनच आपली अन्नसाखळी पूर्ण होते. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.
iv) पर्यावरणाची पातळी अधिक खालावू नये याकरता नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे हे पर्यावरण संवर्धनात अपेक्षित आहे.
आ. बिश्नोई चिपको आंदोलन
उत्तर :
i) राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी हे गाव आहे. जोधपुर शहरापासून 26 किमीवर हे गाव आहे. या गावाचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी वनस्पतीवरून घेण्यात आलेले आहे. येथेच प्रथम बिश्नोई आंदोलन झाले होते.
ii) बिश्नोई हा राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एक समाज आहे. या समाजाच्या इतिहासात खेजडी या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलनासारखे आंदोलन 1738 साली झाले होते. तेथील ग्रामस्थ अमृतादेवी यांच्या पुढाकाराने गावातील 363 बिश्नोई मंडळींनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केले होते. या गावात खेजडी या वनस्पतीची बरीच झाडे होती. या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो.
iii) इ. स. 1738 सालच्या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी अमृतादेवी आणि त्यांच्या तीन मुली असू, रत्ना आणि भागुबाई या चौघींनी मिळून वृक्षतोडीला विरोध केला.
iv) तेथील राजाची माणसे वृक्षतोडीसाठी आली होती. राजाच्या नव्या महालाच्या बांधणीसाठी लागणारा चुना भाजण्यासाठी या झाडांची त्यांना गरज वाटली. पण या चौघींनी झाडांना घट्ट मिठ्या मारल्या.
v) अमृतादेवीने हा नाद सोडावा म्हणून त्यांना लाच पण देऊ केली. त्यांना धमकावण्यात आले. पण अमृतादेवी त्यांच्या धमक्यांनी झुकल्या नाही.
इ. जैवविविधता
उत्तर :
1) निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक आणि सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार त्याचबरोबर विविध प्रकारच्या परिसंस्था यांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता असे म्हणतात.
2) जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसून येते.
i) आनुवंशिक विविधता : एकाच जातीतील सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजेच आनुवंशिक विविधता होय.
उदा. प्रत्येक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडासा वेगळा असतो.
ii) प्रजातींची विविधता : निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, त्यांना प्रजातींची विविधता असे म्हणतात.
उदा. वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचे विविध प्रकार.
iii) परिसंस्थेची विविधता : प्रत्येक प्रदेशात आढळणारे परिसंस्थांचे वैविध्य म्हणजेच परिसंस्थेची विविधता. ह्या परिसंस्था वनस्पती, प्राणी, त्यांचे अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधांतून निर्माण होतात. प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळे जैविक (प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव) आणि अजैविक घटक असतात.
ई. देवराई
उत्तर :
i) देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन.
ii) हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वनखात्याकडून सांभाळले जात नसून समाजाकडून सांभाळलेले अभयारण्यच असते.
iii) देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याकारणाने या वनाला एक प्रकारचे संरक्षक कवच लाभते.
iv_) भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे, तर संपूर्ण भारतभर अशा 13000 पेक्षा अधिक देवराया नोंदविलेल्या आहेत.
उ. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन
उत्तर :
i) पर्यावरणात अनेक वेळा घडून येणाऱ्या धोकादायक घटना जीविताच्या, संपत्तीच्या, तसेच पर्यावरणाच्या नुकसानीचे कारण ठरतात, त्यांना आपत्ती असे म्हटले जाते. उदा. महापूर, भूकंप, दुष्काळ, वादळे इत्यादी.
ii) नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मिती आपत्ती हे आपत्तीचे दोन प्रकार आहेत.
iii) आपत्तीला रोखण्यासाठी किंवा तिला तोंड देण्यासाठी सुसज्ज असणे किंवा किमान त्या आपत्तीला तोंड देण्यासाठीची क्षमता प्राप्त करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.
iv) आपत्ती व्यवस्थापनाचे दोन भाग करता येतात.
1) आपत्तीपूर्व व्यवस्थापन उदा. माहिती गोळा करणे, सतर्क राहणे इत्यादी.
2) आपत्तीनंतरचे व्यवस्थापन उदा. बचावात्मक कार्य इत्यादी.
4. प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते लिहा.
उत्तर :
i) प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व पर्यावरणावर होतो.
ii) प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा सजीवांच्या अस्तित्वावर होतो.
iii) विकसनशील देशांमध्ये प्रदूषणामुळे अनारोग्य, मृत्यू, अपंगत्व असे दुष्परिणाम अधिक तीव्र प्रमाणात झालेले आढळून येतात.
iv) प्रदूषण कमी केल्याने विषारी कचऱ्याच्या निर्मितीत घट होते, त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा खर्चही वाचतो.
v) आपले पर्यावरण ही आपली सर्वांचीच जबाबदारी असल्यामुळे प्रदूषणावर मात करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. यामुळे, मौल्यवान पर्यावरणीय संसाधनांचे जतन होईल आणि पर्यावरणाची गुणवत्ता वाढीस लागेल.
अशाप्रकारे, प्रदूषणावर मात करणे हे पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे.
5. पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल ? कसे ?
उत्तर :
ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत, त्यांचा आधी अभ्यास करू या समस्यांवर काही उपाय शोधून त्यांची व्याप्ती कमी करू
i) झाडे लावणे आणि झाडे जगवणे हा सर्वांत सहज आणि सोपा उपक्रम आहे. त्यासाठी वृक्षारोपणाचे हाती घेऊ.
ii) घनकचरा व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. घरातून, शाळेतून परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातच किंवा वसाहतीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे हे करू. त्यासाठी लोकसहभाग घेऊ.
iii) प्लास्टिक वापरावर नियंत्रण करण्यास लोकांना भाग पाडणे हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवू.
iv) जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हे देखील महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवेत बदल होत आहे. म्हणून थोड्या अंतरासाठी चालत जाणे, सायकलचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करू.
v) आजूबाजूच्या पशु-पक्ष्यांची काळजी घेणे, त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे, त्यांनाही आपल्याबरोबरच जगण्याची संधी देणे हे काम करू. या आणि अशा छोट्या छोट्या कृतींतून पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य आहे.
6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.
उत्तर :
i) पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही काही घटक नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात.
ii) जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात.
iii) मानवाच्या कृती जसे, जंगलतोड, औद्योगिकीकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात.
iv) नैसर्गिक आपत्तींमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो.
उदा., भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ अशा कारणांनी पर्यावरणावर परिणाम होतो.
आ. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे ?
उत्तर :
i) पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वत:ला हवे तसे बदल करायला सुरूवात केली.
ii) इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणबुद्धी आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सर्व सजीवांवर प्रभुत्व प्रस्थपित केले.
iii) पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा त्याने बेसुमार वापर केला.
iv) विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाचा विनाशच जास्त केला. त्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या.
v) परिसंस्थांचा समतोल बिघडवला गेला. मानवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही. इतर सजीव निसर्गाचे कायदे मानणारे असतात.
vi) त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरते.
इ. जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.
उत्तर :
जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसते. या पातळ्या पुढीलप्रमाणे आहेत.
आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्था विविधता.
i) आनुवंशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. प्रत्येक प्राणी किंवा माणूस एकसमान नसतो. थोडे थोडे वेगळेपण प्रत्येकात असते.
ii) प्रजाती विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो.
iii) परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशांतून दिसून येणाऱ्या परिसंस्था होय. प्रत्येक प्रदेशातल्या अनेक परिसंस्थांत प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. एखाद्या प्रदेशातील सजीव आणि त्याचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधांतून परिसंस्थेची निर्मिती होते. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशादेखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात.
ई. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल ?
उत्तर :
जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे उपाय :
i) दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे.
ii) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे.
iii) काही क्षेत्रे ‘राखीव जैवविभाग’ म्हणून घोषित करणे.
iv) विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे.
v) प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.
vi) पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे.
vii) पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.
उ. जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो ?
उत्तर :
i) जादव मोलाई पायंग यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाण होती.
ii) सकारात्मक दृष्टिकोन, निसर्गाप्रती असलेले प्रेम, कठोर परिश्रम करण्याची वृत्ती यामुळे एकट्याच्या हिमतीवर 1360 एकराच्या भूखंडावर झाडे लावण्यात त्यांना यश मिळाले.
iii) जादव मोलाई पायंग यांच्या गोष्टीतून आपणास असा बोध मिळतो, की अनेकांनी मिळून जरी पर्यावरणास हानी पोहोचवली तरी एक माणूसदेखील निश्चय करून जंगल निर्माण करू शकतो आणि त्यापासून पर्यावरणाचे उत्तमरीत्या संवर्धन करू शकतो.
iv) त्याचबरोबर एक माणूस एवढा मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकत असेल, तर अनेक माणसांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास क्रांती घडून येईल.
ऊ. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा.
उत्तर :
1) जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे.
2) भारतातील जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे :
i) पूर्व हिमालय, ii) इंडो-बर्मा, iii) पश्चिम घाट व श्रीलंका
3) जगातील जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे :
i) मादागास्कर, ii) फिलिपिन्स, iii) सुंदालँड, iv) ब्राझिलचे अटलांटिक वन, v) कॅरेबिअन-आयलँड इत्यादी.
ए. प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत ? त्यांना कसे वाचविता येईल ?
उत्तर :
प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे पुढीलप्रमाणे :
i) नैसर्गिक कारणे : भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वणवा, महापूर, दुष्काळ इत्यादी.
ii) मानवनिर्मित कारणे : शिकार करणे, वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट करणे, अति प्रमाणात होणारी जंगलतोड, अति प्रमाणातील मासेमारी, प्रदूषण तसेच औषधे, सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने इत्यादींच्या निर्मितीसाठी वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचा होणारा वापर इत्यादी.
- धोक्यात असलेल्या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती वाचवण्यासाठी उपाय :
1) प्रदूषण नियंत्रण केल्यास प्राणी आणि वनस्पतींवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल.
2) प्राणी आणि वनस्पती प्रजातींच्या अधिवासांचे संरक्षण करणे आणि त्यातील मानवी हस्तक्षेप मर्यादित करणे.
3) वन्यजीव आणि वनस्पती यांचे महत्त्व व त्यांचे संरक्षण यांविषयी लोकजागृती करणे.
4) या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ञ यांच्या मदतीने उपाययोजना करणे.
7. खालील चिन्हसंकेत काय सांगतात ? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

उत्तर :
