इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी बोर्ड पेपर 2025

itihaas v rajyashastra iyatta dahavi board paper 2025

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ………………… या शहराचे उत्खनन करताना सापडते.

अ) दिल्ली

ब) हडप्पा

क) उर

ड) कोलकाता

उत्तर :

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडते.

2) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री …………………. हे होते.

अ) वसंतराव नाईक

ब) यशवंतराव चव्हाण

क) शंकरराव चव्हाण

ड) वसंतदादा पाटील

उत्तर :

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

3) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद …………………. यांनी केला.

अ) जेन्म मिल

ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

क) माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन

ड) जॉन मार्शल

उत्तर :

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला.

ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :

1)

i) रायगडाला जेव्हा जाग येत – वसंत कानेटकर

ii) टिळक आणि आगरकर – विश्राम बेडेकर

iii) साष्टांग नमस्कार – आचार्य अत्रे

iv) एकच प्याला – अण्णासाहेब किर्लोस्कर

उत्तर :

एकच प्याला – राम गणेश गडकरी

2)

i) लिओपॉल्ड व्हॉन रांके – द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी

ii) मायकेल फुको – आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज

iii) कार्ल मार्क्स – दास कॅपिटल

iv) रेने देकार्त – रिझन इन हिस्टरी

उत्तर :

रेने देकार्त – डिस्कोर्स ऑन द मेथड

3)

i) प्रभाकर – आचार्य प्र. के. अत्रे

ii) दर्पण – बाळशास्त्री जांभेकर

iii) दीनबंधू – कृष्णराव भालेकर

iv) केसरी – बाळ गंगाधर टिळक

उत्तर :

प्रभाकर – भाऊ महाजन

2. अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :

1) पुढील तक्ता पूर्ण

उत्तर :

2) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर :

3) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर :

ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) :

1) उपयोजित इतिहास

उत्तर :

i) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे ‘उपयोजन’ होय.

ii) इतिहासाची उद्दिष्ट्ये इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच ‘इतिहासाचे उपयोजन’ असे म्हणतात.

iii) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.

iv) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात, तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.

2) मराठा चित्रशैली

उत्तर :

इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली.

i) सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.

ii) या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत.

iii) वाड्यांचे दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.

iv) या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

3) स्थळ कोश

उत्तर :

i) भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात.

ii) महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद ‘स्थानपोथी’ या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.

iii) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ‘प्राचीन भारतीय स्थल कोशाची’ रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारशी-ग्रीक साहित्य यांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.

iv) स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थल कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

1) फुको यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ म्हटले आहे.

उत्तर :

i) फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले.

ii) पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.

iii) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

2) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

उत्तर :

i) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.

ii) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.

iii) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.

iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

3) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.

उत्तर :

i) ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.

ii) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते.

iii) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात.

iv) त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.

4) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

उत्तर :

i) लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.

ii) दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला.

iii) कृषी उत्पादने, वस्तूंची उत्पादने, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले.

iv) यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

मेजर ध्यानचंद हे भारतीय खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडादिवस’ म्हणून पाळला जातो. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ या सन्मानाने विभूषित करण्यात आले.

प्रश्न :

1) 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते ?

उत्तर :

1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक मेजर ध्यानचंद हे होते.

2) भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर :

भारतात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून साजरा केला जातो.

3) हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा.

उत्तर :

हॉकी हा एक रोमांचक आणि वेगवान खेळ आहे ज्यासाठी कौशल्य, सांघिक कार्य आणि रणनीती आवश्यक आहे. हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि त्याचा समृद्ध इतिहास आहे, ज्यामध्ये मेजर ध्यानचंद सारख्या दिग्गजांनी त्याच्या वैभवात योगदान दिले आहे. या खेळाने देशाला अनेक गौरव मिळवून दिले आहेत आणि तरुण खेळाडूंना प्रेरणा देत आहे.

5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

1) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर :

i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.

ii) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमॉ-द-बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.

iii) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले.

iv) 1990 नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच ‘स्त्रीवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

2) कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ? हे स्पष्ट करा.

उत्तर :

विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात –

i) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात.

ii) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात.

iii) औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते.

iv) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार प्रकाशयोजना करणारे इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.

v) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते.

vi) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती व दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.

3) पोवाडा म्हणजे काय ? हे स्पष्ट करा.

उत्तर :

i) घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे ‘पोवाडा’ होय.

ii) पोवाडा हा गद्य-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.

iii) तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.

iv) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते.

v) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो.

vi) दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात. म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.

4) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

उत्तर :

पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार –

i) ऐतिहासिक पर्यटन – पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.

ii) भौगोलिक पर्यटन – अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते, निसर्गराजीत राहायला निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.

iii) आंतरराष्ट्रीय पर्यटन – आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोर्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदि निर्मित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते.

6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ………………. जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

अ) 25%

ब) 30%

क) 40%

ड) 50%

उत्तर :

महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

2) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ………………….. करण्यात आली.

अ) जलक्रांती

ब) हरितक्रांती

क) औद्योगिकक्रांती

ड) धवलक्रांती

उत्तर :

शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली.

7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

1) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे कारण –

i) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो.

ii) एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.

iii) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले, तर पक्षांतरबंदी कायदयाप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.

2) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण

i) लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे, हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते.

ii) पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात.

iii) शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली; म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.

3) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) 1989 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली.

ii) पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.

iii) 1977 चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.

8. अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक) :

1) अल्पसंख्याकविषयक तरतुदी

उत्तर :

i) भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.

ii) अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत.

iii) भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे.

iv) अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे.

2) कामगार चळवळ

उत्तर :

i) १८५० नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला.  

ii) पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या.  

iii) स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. १९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता. १९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली.  

iv) जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.

ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही एक) :

1) पुढील तक्ता पूर्ण करा :

उत्तर :

2) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर :

3) पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक) :

1) राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा.

उत्तर :

भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी खालील तीनपैकी किमान एक अट पूर्ण करावी लागते :

i) मतदानाचे प्रमाण आणि जागा : पक्षाने लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 4 किंवा अधिक राज्यांमध्ये 6% वैध मते मिळवली पाहिजेत. याशिवाय, लोकसभेत किमान 4 जागा जिंकणे आवश्यक आहे.

ii) लोकसभा जागा जिंकण्याचे निकष : पक्षाने लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 2% (म्हणजेच 11 जागा) जिंकलेल्या असाव्यात. या 11 जागा किमान 3 वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.

iii) राज्य पक्ष मान्यता : पक्ष किमान 4 राज्यांमध्ये ‘राज्य पक्ष’ म्हणून मान्यता प्राप्त असावा.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणारे विशेष अधिकार :

  • संपूर्ण भारतात एकच निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार
  • सरकारी माध्यमांवर (टीव्ही, रेडिओ) मोफत प्रसारण वेळ मिळतो.
  • अनेक राज्यांमध्ये समान ओळख आणि महत्त्व.

2) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?

उत्तर :

भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे –

i) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत.

iii) केवळ शासकीयच नव्हे, तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

iv) शासनव्यवहारात सर्व पातळ्यावरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे.

Leave a Comment