इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी बोर्ड पेपर 2026

iyatta dahavi itihas aani rajyshastra board prashnpatriaka 2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाच्या 2026 बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सखोल आणि नियोजनबद्ध अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. इतिहास विभागात महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, सामाजिक व आर्थिक बदल, स्वातंत्र्यलढ्यातील घटनाक्रम तसेच कालरेषा (Timeline) व नकाशाशी संबंधित प्रश्नांचा सराव आवश्यक असतो, तर राज्यशास्त्र विभागात भारतीय संविधान, लोकशाही शासनप्रणाली, निवडणूक प्रक्रिया, सामाजिक व राजकीय चळवळी यांसारख्या संकल्पना नीट समजून घेणे महत्त्वाचे ठरते. वस्तुनिष्ठ प्रश्न, थोडक्यात उत्तरे, सविस्तर उत्तरे आणि नकाशा आधारित प्रश्न यांचा मिळून प्रश्नपत्रिकेचा आराखडा तयार होतो, त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि बोर्डाच्या अधिकृत मूल्यमापन योजनेनुसार (Marking Scheme) उत्तरे लिहिण्याची पद्धत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवण्यास मदत करते. या लेखात दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिका, महत्त्वाचे मुद्दे आणि सोप्या उत्तरलेखन तंत्रांच्या साहाय्याने विद्यार्थी आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे बोर्ड परीक्षेची तयारी करू शकतात.

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ……………….. या शहराचे उत्खनन करताना सापडले.

अ) दिल्ली

ब) हडप्पा

क) उर

ड) कोलकाता

उत्तर :

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले.

2) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ……………….. यांना मानतात.

अ) संत ज्ञानेश्वर

ब) संत तुकाराम

क) संत नामदेव

ड) संत एकनाथ

उत्तर :

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात.

3) आधुनिक इतिहासलेखनाचा जनक …………………. यास म्हणता येईल.

अ) व्हॉल्टेअर

ब) रेने देकार्त

क) लिओपॉल्ड रांके

ड) कार्ल मार्क्स

उत्तर :

आधुनिक इतिहासलेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.

ब) पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :

1)

i) प्रभाकर – आचार्य प्र. के. अत्रे

ii) दर्पण – बाळशास्त्री जांभेकर

iii) दीनबंधु – कृष्णराव भालेकर

iv) केसरी – बाळ गंगाधर टिळक

उत्तर :

प्रभाकर – भाऊ महाजन

2)

i) बाळंभट देवधर – मल्लखांब

ii) खाशाबा जाधव – फुटबॉल

iii) मेजर ध्यानचंद – हॉकी

iv) सचिन तेंडूलकर – क्रिकेट

उत्तर :

खाशाबा जाधव – कुस्ती

3)

i) महाराज सयाजी विद्यापीठ – दिल्ली

ii) बनारस हिंदू विद्यापीठ – वाराणसी

iii) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी – अलिगढ

iv) जिवाजी विद्यापीठ – ग्वालियर

उत्तर :

महाराज सायजीराज विद्यापीठ – वडोदरा

2. अ) दिलेल्या सुचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :

1) दूरदर्शनशी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा :

उत्तर :

2) पुढील वृक्षतक्ता पूर्ण करा :

उत्तर :

3) पुढील तक्ता पूर्ण करा :

जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालयेदेश
i) लुव्र संग्रहालय……………………
ii) ……………………इंग्लंड
iii) सालारजंग म्युझियम……………………
iv) ……………………युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका

उत्तर :

जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालयेदेश
i) लुव्र संग्रहालयफ्रांस
ii) ब्रिटिश संग्रहालयइंग्लंड
iii) सालारजंग म्युझियमभारत
iv) नॅशनल म्युझिअम ऑफ नॅचरल हिस्ट्रीयुनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका

ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) :

1) राष्ट्रवादी इतिहासलेखन

उत्तर :

i) एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपध्दती सुरू झाली. या पध्दतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास ‘राष्ट्रवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

ii) या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला.

iii) भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.

iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

2) उपयोजित इतिहास

उत्तर :

i) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे ‘उपयोजन’ होय.

ii) इतिहासाची उद्दिष्ट्ये इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच ‘इतिहासाचे उपयोजन’ असे म्हणतात.

iii) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.

iv) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात, तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.

3) मार्को पोलो

उत्तर :

i) मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इ. स. १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला.

ii) तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा पहिला युरोपियन होय. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्त्रोतग्रंथ ठरला.

iii) आशियातील समाजजीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.

iv) भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविद्या यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

1) कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.

उत्तर :

i) कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत हे माहीत व्हायला हवे.

ii) त्यांतील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो.

iii) कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे, हे कलाकारच ओळखू शकतात.

iv) एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते, त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.

2) विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

उत्तर :

i) इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात.

ii) प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते.

iii) या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, हे माहीत असले पाहिजे.

iv) प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत; म्हणून विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

3) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

उत्तर :

i) इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमॉ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.

ii) स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.

iii) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.

iv) सीमॉ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

4) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.

उत्तर :

i) ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.

ii) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते.

iii) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात.

iv) त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.

4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

सोहगौडा ताम्रपट : हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राम्ही लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या काठोरघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.

प्रश्न :

1) सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते ?

उत्तर :

सोहगौडा ताम्रपट हा मौर्य काळातील असावा, असे मानले जाते.

2) सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत आहे ?

उत्तर :

सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राम्ही लिपीत आहे.

3) सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व सांगा.

उत्तर :

भारतातील दुष्काळ व्यवस्थापनाचा सर्वात जुना ज्ञात पुरावा

5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

1) भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :

मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे –

i) पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस ‘मुस्लीम स्थापत्यशैली’ म्हणतात.

ii) या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (२४० फूट)

iii) मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते.

iv) इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे.

v) फतेहपूर-सिक्री येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवा त्यांच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे.

vi) दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत.

2) आकाशवाणीचा इतिहास सांगा.

उत्तर :

i) रेडिओ हे प्रसारमाध्यमांपैकी एक महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे. १९२२ साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीची (BBC) स्थापना झाली आणि त्यानंतर रेडिओ प्रसारणाचा जगभर विस्तार झाला.

ii) भारतात रेडिओ प्रसारणाचा प्रारंभ मद्रास (चेन्नई) येथे झाला. सुरुवातीच्या काळात रेडिओला ‘नभोवाणी’ असे म्हटले जात असे. पुढे १९३५ साली म्हैसूर संस्थानाने आपल्या रेडिओ केंद्राला ‘आकाशवाणी’ असे नाव दिले. हे नाव लोकांना इतके आवडले व रुजले की, पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ केंद्रांसाठी ‘आकाशवाणी’ हेच नाव स्वीकारले.

iii) स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून, आज ती देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती, शिक्षण व मनोरंजन पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करते. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे भारताच्या आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे, जे तिच्या सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी असलेल्या ध्येयाचे प्रतीक आहे.

3) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

मैदानी खेळबैठे खेळ
i) मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात.i) बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर. कोठेही खेळता येतात.
ii) मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते.ii) बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते.
iii) मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची शक्तीची गरज असते.iii) या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते.
iv) शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो.iv) शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही.
v) मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो. आनंदही आधिक मिळतो.v) बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो.
vi) मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते.vi) बैठ्या खेळांना शारीरिक गरज कौशल्याची नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते.
vii) मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो-खो, क्रिकेट अशा देशी-विदेशी खेळांचा समावेश होतो.vii) बैठ्या खेळांत बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो.

4) ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे असते ते सांगा.

उत्तर :

ऐतिहासिक वास्तू यं प्राचीन इतिहासाची साधने असून तो आपला सांस्कृतिक ठेवा आहे; म्हणून त्यांचे जतन आपण केले पाहिजे. त्यासाठी पुढील उपाय केले पाहिजेत –

i) किल्ले, लेणी इत्यादी वास्तूंत खडकांतून झिरपणाऱ्या पाण्याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. वास्तूंवर वाढणारी झाडे-झुडपे वेळीच समूळ नष्ट करावीत.

ii) उष्णता-दमट हवा यांमुळे वास्तूंची हानी होते. नवीन तंत्रज्ञान वापरून ही हानी टाळावी.

iii) समुद्रात किंवा समुद्रालगत असणाऱ्या प्राचीन वास्तूंची खाऱ्या पाण्यामुळे व हवेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

iv) पर्यटकांनी या वास्तू कशा स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी. वास्तूंवर नावे कोरणे, त्यांची नासधूस करणे असल्या गोष्टी टाळाव्यात.

v) मानवी विध्वंसनापासून वास्तूंचे जतन होण्यासाठी शासनाने कडक कायदे करावेत.

vi) ऐतिहासिक वास्तूंचे जतन का करायचे, याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणेही आवश्यक आहे.

vii) धरणांत किंवा अन्य प्रकल्पांत पाण्याखाली जाणाऱ्या वास्तू वेळीच अन्यत्र हलवाव्यात.

viii) या वास्तूंच्या जतनासाठी शासनाबरोबरच नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी व उद्योजकांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी.

6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार ………………. आहे.

अ) संसदेला

ब) लोकांना

क) राष्ट्रपतींना

ड) उपराष्ट्रपतींना

उत्तर :

संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे.

2) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ………………. करण्यात आली.

अ) जलक्रांती

ब) हरितक्रांती

क) औद्योगिकक्रांती

ड) धवलक्रांती

उत्तर :

शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली.

7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

1) सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे, कारण –

i) भारतीय समाजात अनेक शतके अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांसारख्या घटकांना सामाजिक विषमतेला व शैक्षणिक-आर्थिक मागासलेपणाला सामोरे जावे लागले होते.

ii) या सामाजिकदृष्ट्या वंचित व मागास घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय संविधानाने शिक्षण, शासकीय नोकऱ्या तसेच विधिमंडळ व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांची तरतूद केली आहे.

iii) राखीव जागांच्या तरतुदीमुळे या दुर्बल घटकांना विकासाची व प्रगतीची समान संधी मिळते, त्यामुळे सामाजिक विषमता कमी होण्यास मदत होते.

iv) यामुळे समाजातील सर्व घटकांना राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होता येते आणि सामाजिक न्याय व समता प्रत्यक्षात प्रस्थापित होण्यास हातभार लागतो.

म्हणून, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे,

2) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.

ii) राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.

iii) म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे; त्यामुळे एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.

3) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे कारण –

i) लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते.

ii) परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो.

iii) बनावट मतदान होणे, मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे, मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.

8. अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक) :

1) प्रादेशिकता

उत्तर :

i) भारतात विविध भाषा बोलणारे विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात.

ii) भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी यांबाबतीतही भारतात विविधता आढळते.

iii) प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वाबाबत अस्मिता निर्माण होते.

iv) आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच ‘प्रादेशिकता’ असे म्हणतात.

2) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व

उत्तर :

i) संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरूवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले.

ii) त्यामुळे १९५२ च्या पहिल्या लोकसभेत २२ महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन २०१९ च्या निवडणुकीत ती ७३ वर जाऊन पोहोचली आहे.

iii) लोकसभेच्या एकूण जागांच्या ३३% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात, असे विधेयक संसदेने मंजूर केले आहे.

iv) स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्याने स्त्रियांवरील अन्याय दूर होतील आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल.

ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही एक) :

1) दिलेला आकृतीबंध पूर्ण करा :

उत्तर :

2) दिलेला आकृतिबंध पूर्ण करा :

उत्तर :

9. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक) :

1) मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा.

उत्तर :

मुक्त वातावरणात आणि न्याय पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला पुढील आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे –

i) देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे.

ii) निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे.

iii) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घातलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे.

2) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?

उत्तर :

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात –

i) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात. 

iii) राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते. 

iv) भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे. 

Leave a Comment