आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय
आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. खालील कोष्टक पूर्ण करा.
मानवाने करायच्या गोष्टी | मानवाने टाळायच्या गोष्टी |
---|---|
1) | 1) |
2) | 2) |
3) | 3) |
4) | 4) |
उत्तर :
मानवाने करायच्या गोष्टी | मानवाने टाळायच्या गोष्टी |
---|---|
1) दिवा होऊन जगाला उजळणे. | 1) चाकू बनून जगाला कापणे. |
2) पावित्र्याची वस्त्रे पांघरणे. | 2) पटकूर बनून तो दुसऱ्यांपुढे पसरणे. |
3) शक्तीने गोवर्धन पेलणे. | 3) कंस बनून इतरांना छळणे. |
4) दुसऱ्यास्तव करुणा वाहणे. | 4) आपल्या स्वतःच्या दु:खासाठी अश्रू ढाळणे. |
प्रश्न. 2. आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 3. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
अ) पटकूर पसरू नको.
उत्तर :
कुणापुढेही पदर पसरणारा लाचार बनू नकोस.
आ) व्यर्थ कोरडा राहू नको.
उत्तर :
भावनांमध्ये ओल असू दे. भावना कोरड्या शुष्क ठेवू नकोस.
इ) कर्तृत्वाचे घडवी वेरूळ.
उत्तर :
वेरूळच्या लेण्या सुंदर व जगप्रसिध्द आहेत. तसे तुझे कर्तृत्व जगाला दिपवणारे सुंदर असावे.
प्रश्न. 4. काव्यसौंदर्य
अ) ‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरू नको’, या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
प्रस्तुत कवितेत माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगतांना कवी म्हणतात, श्रीमंतीच्या बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे योग्य नव्हे. म्हणजेच संपत्तीचे प्रदर्शन करू नये. वाईट, अपवित्र गोष्टी करू नयेत. अशा गोष्टींना पांघरू नये म्हणजे जवळ घेऊ नये. तसेच स्वाभिमानाने जगावे. लाचार होऊन इतरांपुढे पदर पसरू नये. (अनेकजण सत्ता धाऱ्यांपुढे लाचार होऊन त्यांची हाजी हाजी करतात, तशी लाचारी पत्करू नये.) शरीरावर घातलेल्या किंमती वस्त्रापेक्षा मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे, मंगलतेची वस्त्रे ल्यावीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दीनवाणे, लाचार, असू नये. स्वत:च्या मनाने मलीन, घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीत मांडला आहे.
आ) ‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको’, या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
स्वच्छतेला दिखावटीच्या प्रदर्शनापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. बाह्य शोभायात्रा करण्यापेक्षा, आपल्या मनाची व परिसराची निर्मळता टिकवणे महत्त्वपूर्ण आहे. कवींनी या विचारांचा प्रसार केला आहे. स्वच्छता जपली गेली तर, रोगराई टाळता येते आणि आरोग्यासाठी धोका निर्माण होत नाही. आपल्याला शुद्ध हवा आणि निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा व सेनापती बापट यांनी स्वच्छतेचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे’ हे त्यांचे विचार आहेत आणि ‘शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे’ हे सिद्धांत स्वच्छतेची महत्त्वाकांक्षा दर्शवितात.
प्रश्न. 5. स्वमत
अ) स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.
उत्तर :
जीवन घडवताना कवितेत सांगितल्याप्रमाणे नित्य वाचन लेखन करणे, कामावाचून एकही क्षण वाया न घालवणे, पाठांतर करणे, व्यायाम करणे, ह्या आवश्यक असलेल्या गोष्टी तर आम्ही करणारच, पण शिवाय दिवा होऊन जगाला उजळावे, चाकू होऊन जगाला कापू नये, हा विचार आम्हाला भ्रष्टाचारापासून सदैव दूर ठेवील. आम्ही कोणत्याही क्षेत्रात असलो तरी पैशाच्या लोभापायी कुणाचीही पिळवणूक करणार नाही. अडलेल्यांना नाडणार नाही. दीन-दुबळ्यांना सदैव मदतीचा हात देऊ. ‘होऊन पटकूर पसरू नको’ हा ही विचार जीवनाला दिशा देणारा आहे. यातून ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा मोलाचा संदेश मिळतो. आज अनेक माणसं स्वार्थ साधण्यासाठी लाचार होताना दिसतात. ते धनाढ्य श्रीमंताची किंवा सत्ताधाऱ्यांची हाजीहाजी करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यासाठी ‘स्व’ चे अस्तित्व विकतात. असे न करता माणसाने स्वाभिमानाने जगावे हा विचार खरोखर मार्गदर्शन आहे. त्यामुळे आपण सरकारी अनुदानावर विसंबून न राहता स्वतःला व राष्ट्राला स्वावलंबी बनवू.
आमचे मन करुणेने व्यापले असावे. ‘पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा’ हा विश्वप्रेमाचा संदेश आम्हाला स्वकर्तृत्व घडवताना उपयुक्त ठरेल. आणि त्यातूनच मातेसह मातीचे देणेही फेडता येईल.
आ) आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर :
‘पावित्र्याची वस्त्रे पांघरणे’ ही आपल्या जगण्यातून आपली पहिली ओळख व्हावी. हे पहिले पथ्य होय. नम्र राहणे ही आपली दुसरी ओळख व्हावी आणि त्याकरिता आपल्या श्रेष्ठत्वाच्या अहंकाराचा त्याग करावा हे दुसरे पथ्य होय. आपण आपल्या शक्तीचा वापर समाजहितासाठी करावा, छळण्यासाठी नको, ‘पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको’. फॅशनेबल कपडे, वरवर गोड बोलणे हे आपले खरे सौंदर्य नव्हे. निर्मळ अंत:करण हे आपले खरे सौंदर्य होय. ‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता’ हे न विसरणारा मुलगा अशी आपली ओळख व्हावी. आपलेच दुःख कुरवाळत न बसता या मुलाच्या मनात दुसऱ्या बद्दलचीच करुणा तुडुंब भरून वाहते असे जगाच्या अनुभवाला येणे ही आपली ओळख व्हावी. समाजसुधारक अशी आपली ओळख व्हावी. ‘तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिऊ नको’ यातून अंधश्रद्धेला थारा न देणारा अशी आपली ओळख होईल. कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रभक्त अशीही आपली ओळख व्हावी.
‘कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकु नको
मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकु नको !’