iyatta dahavi vidnyan aani tantrdnyan bhag 2 board prashnapatrika
दहावी विज्ञान भाग 2 परीक्षेत जीवशास्त्र, आनुवंशिकता, पर्यावरण, ऊर्जा स्रोत आणि अवकाश तंत्रज्ञान यांसारख्या घटकांचा सराव महत्त्वाचा आहे. आकृत्या, व्याख्या आणि शास्त्रीय कारणे यांचा नियमित अभ्यास करून नमुना प्रश्नपत्रिकांसह 2026 बोर्ड परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा!
1. अ) योग्य पर्याय निवडा :
i) अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या ………………….. सिद्धांतामुळे लक्षात आला.
अ) आत्रपुच्छ
ब) उत्परिवर्तन
क) प्रतिलेखन
ड) स्थानांतरण
उत्तर :
अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला.
ii) एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ………………… रेणू मिळतात.
अ) 18
ब) 28
क) 38
ड) 48
उत्तर :
एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण 38 रेणू मिळतात.
iii) वटवाघूळाचा समावेश ……………….. वर्गात होतो.
अ) उभयचर
ब) सरीसृप
क) पक्षी
ड) सस्तन
उत्तर :
वटवाघूळाचा समावेश सस्तन वर्गात होतो.
iv) महाराष्ट्रातील ………………….. येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.
अ) चंद्रपूर
ब) कोयना
क) परळी
ड) तारापूर
उत्तर :
महाराष्ट्रातील कोयना येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.
v) सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील …………………. हे पहिले राज्य ठरले आहे.
अ) मध्यप्रदेश
ब) महाराष्ट्र
क) गुजरात
ड) कर्नाटक
उत्तर :
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
i) रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा :

उत्तर :

ii) जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करतात ?
उत्तर :
जागतिक जैवविविधता दिन 22 मे ला साजरा करतात
iii) ओळखा पाहू मी कोण ?
स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी.
उत्तर :
डॉली
iv) रेणूसूत्र लिहा.
अँसिटेक आम्ल
उत्तर :
CH3-COOH
v) चूक की बरोबर ते लिहा :
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात.
उत्तर :
चूक
2. अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) :
i) प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत.
उत्तर :
i) प्रोबायोटिक्स क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
ii) उदा., प्रोबायोटिक्समुळे आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती होतात.
iii) क्लाॅस्ट्रिडीअमसारख्या इतर घातक सूक्ष्मजीवांवर हे चांगले जीवाणू नियंत्रण ठेवतात. तसेच अशा जीवाणूंच्या चयापचयक्रियांवर देखील नियंत्रण ठेवतात.
iv) प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.
v) चयापचयक्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात.
vi) एखाद्याने जर प्रतिजैविकांचे उपचार घेतले असतील, तर त्यामुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात. अशा उपयुक्त जीवाणूंना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात.
vii) अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरतात.
viii) तसेच इतर पाळीव प्राण्यांच्या जसे कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटिक्स वापरतात.
ix) या साऱ्या फायद्यांमुळेच अली कडच्या काळात प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय झाली आहेत.
ii) सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
उत्तर :
i) सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात.
ii) त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते.
iii) परिसराचे तापमान जसे वरखाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वरखाली होते.
iv) त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
iii) आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे.
उत्तर :
i) अन्न सुरक्षा : सेंद्रिय उत्पादने हानिकारक रासायनिक अवशेषांपासून मुक्त असतात; ज्यामुळे मानवी सेवनासाठी ती अधिक सुरक्षित आणि पौष्टिक ठरतात.
ii) मृदा आरोग्य : कालांतराने जमिनीचा ऱ्हास करणाऱ्या रासायनिक खतांच्या विपरीत, सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक कंपोस्ट आणि शेणखताचा वापर केला जातो; ज्यामुळे जमिनीची सुपीकता आणि पोत टिकून राहते.
iii) पर्यावरणास अनुकूल : या पद्धतीत विषारी कीटकनाशकांचा वापर टाळला जातो; जी हवा आणि पाणी प्रदूषित करतात, तसेच मधमाशांसारख्या उपयुक्त कीटकांना हानी पोहोचवतात.
ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) :
i) कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहून त्याचा एक उपयोग लिहा.
उत्तर :
व्याख्या :
i) प्राणी आणि वनस्पतींच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते केवळ C-14 चार ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते.
ii) मृत वनस्पती आणि प्राण्यांमध्ये C-12 हे किरणोत्सर्गी नसल्यामुळे, काळानुसार C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर सतत बदलत असते.
iii) एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत होऊन किती काळ लोटला आहे, हे कार्बन वयमापनाद्वारे म्हणजेच त्या मृत जीवाच्या अवशेषांमध्ये उपस्थित असलेल्या C-14 ची किरणोत्सर्गता आणि C-14 व C-12 यांचे गुणोत्तर मोजून गणित करता येते.
उपयोग : मानवी जीवाश्म आणि प्राचीन हस्तलिखितांचे वय निश्चित करण्यासाठी, याचा प्रामुख्याने पुराजीवशास्त्र आणि मानवशास्त्र या क्षेत्रांमध्ये वापर केला जातो.
ii) खालील तक्ता पूर्ण करा :
| अ. क्र. | प्रथिने | अव्यवयांचे नांव |
|---|---|---|
| 1 | …………….. | हाडे |
| 2 | इन्सुलिन | …………….. |
उत्तर :
| अ. क्र. | प्रथिने | अव्यवयांचे नांव |
|---|---|---|
| 1 | ऑस्सीन | हाडे |
| 2 | इन्सुलिन | स्वादुपिंड |
iii) खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्नांनी उत्तरे लिहा :
दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांत मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरिता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर.
अ) भाताच्या पिकांवर काय परिणाम होईल ?
उत्तर :
नाकतोड्यांची संख्या वाढेल. भातांच्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होईल.
ब) कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल ?
उत्तर :
नाकतोडे व उंदीरांची संख्या वाढेल.
iv) जल-विद्युत निर्मितीचे दोन फायदे लिहा.
उत्तर :
i) जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. अशा केंद्रातून कोणत्याही इंधनाचे ज्वलन होत नाही त्यामुळे जलविद्युत ऊर्जा प्रदूषणकारी नसते.
ii) धरणात योग्य इतका पाणीसाठा असल्यास हवे तेव्हा विद्युतनिर्मिती करता येते.
iii) धरणात पाणी तुटवडा झाला तरी पावसाने पुन्हा धरण भरू शकते आणि पुन्हा ऊर्जानिर्मिती शक्य होते.
v) खाली काही आपत्तीची चित्रे दिली आहेत. त्यानुसार, समजा तुमच्यावर ओढवल्या तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल ?

उत्तर :
अ) गॅससिलिंडर गळतीने विषारी वायू पसरत आहे.
i) त्वरित बाहेर पडा: कोणताही विलंब न करता मोकळ्या व हवेशीर ठिकाणी जा. वायुगळती झालेल्या इमारतीत अजिबात थांबू नका.
ii) ठिणगी होण्याचा धोका दूर ठेवा: कोणतेही स्विच, बटण किंवा विद्युत उपकरण सुरू अथवा बंद करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच काडेपेटी किंवा लायटर पेटवू नका – एका छोट्याशा ठिणगीमुळेदेखील मोठा स्फोट घडू शकतो.
iii) तातडीचे उपचार: एखाद्या व्यक्तीच्या श्वासावाटे वायू शरीरात गेला असल्यास, तिला लगेच शुद्ध हवेच्या ठिकाणी न्या. श्वासोच्छवासास अडथळा जाणवत असल्यास ऑक्सिजन पुरवा किंवा विनाविलंब वैद्यकीय सहाय्य बोलवा.
iv) हवा खेळती करा: परिस्थिती सुरक्षित वाटत असल्यास, वायू बाहेर पडण्यासाठी इमारतीतील सर्व दारे-खिडक्या उघड्या ठेवा.
ब) अतिदृष्टी पुरसदृश्य परिस्थिती
i) पाण्याबाबत खबरदारी: पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्नपदार्थ किंवा पाणी वापरू नका, कारण त्यात दूषितता असण्याची शक्यता असते. पाणी पिण्याआधी ते चांगले उकळून घ्या.
ii) घराची पाहणी करा: घरात परत जाण्यापूर्वी इमारतीला कुठे भेगा पडल्या आहेत का किंवा तिचे बांधकाम कमकुवत झाले आहे का, हे तपासून पाहा – यामुळे इमारत कोसळण्याचा धोका नाही याची खातरजमा होईल.
iii) विजेपासून सावध राहा: पायाखाली पाणी असताना किंवा तारा/उपकरणे ओली असताना त्यांना हात लावू नका. घरातील मुख्य वीजपुरवठा बंद केलेला आहे, याची निश्चिती करून घ्या.
iv) साफसफाई व निर्जंतुकीकरण: कॉलरा, विषमज्वर (टायफॉइड) यांसारखे जलजन्य आजार पसरू नयेत, यासाठी घर व आजूबाजूचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करून निर्जंतुक करा.
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही पाच) :
i) लॅमार्कवाद सिद्धांत लिहून तो दोन उदाहरणांद्वारे स्पष्ट करा.
उत्तर :
जीन-बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेल्या ‘लॅमार्कवाद’ या सिद्धांतानुसार, सजीवांच्या शरीररचनेत घडणारे बदल हेच उत्क्रांतीमागील मूळ कारण असतात. असे बदल प्रामुख्याने दोन तत्त्वांमुळे उद्भवतात – “अवयवांचा वापर अथवा अवापर” आणि “प्राप्त केलेल्या गुणधर्मांचे पुढील पिढीत संक्रमण”.
उदाहरणे:
i) जिराफाची लांब मान: सुरुवातीच्या काळात जिराफांची मान लहान होती. मात्र दुष्काळसदृश परिस्थितीत उंच झाडांवरील पाने मिळवण्यासाठी त्यांना सतत मान लांब ताणावी लागली. या सततच्या प्रयत्नांमुळे प्राप्त झालेली लांब मान पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत गेली.
ii) लोहाराचे बलदंड खांदे: धातू घडवताना करावे लागणारे सततचे जोरदार घाव आणि हालचालींमुळे लोहाराच्या खांद्यांचे स्नायू अधिकाधिक मजबूत बनतात.
iii) उडू न शकणारे पक्षी: शहामृग किंवा इमूसारख्या पक्ष्यांनी उड्डाणासाठी पंखांचा वापर करणे सोडून दिल्यामुळे, कालांतराने त्यांचे पंख दुर्बल होत गेले.
ii) सूत्री विभाजन कोणत्या पेशींमध्ये घडून येते ? प्रकलविभाजनाच्या चार पायऱ्या लिहा.
उत्तर :
सूत्री विभाजन (Mitosis) ही प्रक्रिया शरीरातील कायिक पेशी तसेच मूलपेशींमध्ये घडून येते.
अ) पूर्वावस्था (Prophase): या टप्प्यात गुणसूत्रांचे वलीभवन सुरू होते. सामान्यतः बारीक धाग्यासारख्या दिसणाऱ्या गुणसूत्रांची लांबी कमी होऊन ती जाड बनतात. प्रत्येक गुणसूत्राच्या दोन अर्धगुणसूत्रांची जोडी आता स्पष्टपणे ओळखता येते. ताराकेंद्राचे द्विगुणीकरण होऊन ती पेशीच्या परस्परविरुद्ध टोकांकडे सरकतात. यासोबतच केंद्रकावरण व केंद्रिका हळूहळू विरघळण्यास सुरुवात होते.
आ) मध्यावस्था (Metaphase): सर्व गुणसूत्रांचे वलीकरण पूर्णत्वास जाते, त्यामुळे प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसह ठळकपणे दिसू लागते. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय पातळीत एका रेषेत मांडली जातात. दोन्ही ताराकेंद्रांपासून प्रत्येक गुणसूत्राच्या गुणसूत्रबिंदूपर्यंत लवचीक प्रथिनतंतू (तुर्कतंतू) तयार होतात. याच अवस्थेत केंद्रकावरण संपूर्णतः लुप्त होते.
इ) पश्चावस्था (Anaphase): तुर्कतंतूंच्या साहाय्याने गुणसूत्रबिंदूचे विभाजन घडते, परिणामी प्रत्येक गुणसूत्रातील अर्धगुणसूत्रे एकमेकांपासून विलग होऊन विरुद्ध ध्रुवांच्या दिशेने खेचली जातात. अशा प्रकारे विलग झालेली अर्धगुणसूत्रे यापुढे स्वतंत्र गुणसूत्रे (जन्यगुणसूत्रे) म्हणून ओळखली जातात, आणि त्यांची रचना केळीच्या घडासारखी भासते. या अवस्थेच्या अखेरीस गुणसूत्रांचे दोन समान संच पेशीच्या दोन्ही टोकांशी पोहोचतात.
ई) अंत्यावस्था (Telophase): पेशीच्या दोन्ही टोकांशी पोहोचलेली गुणसूत्रे पुन्हा उलगडून बारीक, पातळ धाग्यांसारखी होतात व दृष्टीआड होतात. याचवेळी एका पेशीत दोन स्वतंत्र जन्यकेंद्रके निर्माण होतात, ज्यांमध्ये केंद्रिकाही पुन्हा दिसू लागतात. तुर्कतंतू या टप्प्यात पूर्णतः नष्ट होतात.
iii) खालील धोक्यात आलेल्या प्रजातींची प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा :
अ) संकटग्रस्त प्रजाती
उत्तर :
तणमोर, लायन-टेल्ड वानर
ब) दुर्मिळ प्रजाती
उत्तर :
कस्तुरी मृग, रेड पांडा
क) संवेदनशील प्रजाती
उत्तर :
गीरचे सिंह, पट्टेरी वाघ
iv) औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात ? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या ?
उत्तर :
i) औष्णिक विद्युतनिर्मिती प्रक्रिया: औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळसा हे मुख्य जीवाश्म इंधन म्हणून वापरले जाते. कोळसा जाळल्यावर निर्माण होणाऱ्या उष्णतेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
ii) औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे उद्भवणाऱ्या अडचणी:
अ) वायुप्रदूषण: कोळसा जळताना कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजनचे ऑक्साइड्स यांसारखे शरीरास अपायकारक वायू हवेत मिसळले जातात.
आ) सूक्ष्म धूलिकण उत्सर्जन: ज्वलनादरम्यान बाहेर पडणारे बारीक घनकण हवेत पसरतात, ज्यामुळे श्वसनाशी संबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.
इ) मर्यादित साठा: पृथ्वीच्या पोटातील कोळशाचे साठे अमर्याद नाहीत. त्यामुळे भविष्यात विद्युतनिर्मितीसाठी लागणारा कोळसा उपलब्ध होण्यात अडचणी येऊ शकतात.
v) खालील दिलेल्या चित्रात दर्शविलेल्या प्राण्यांचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा :

उत्तर :
अ) असममित शरीर
ब) अरिय सममिती
क) द्विपार्श्व सममिती
vi) उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर :

vii) कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ?
उत्तर :
i) कीडनाशकांचा धोका: कीडनाशके ही मुळात एक प्रकारची रासायनिक विषारी द्रव्ये असतात. त्यांचा बेसुमार वापर केल्यास ही विषारी रसायने पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून संपूर्ण अन्नजाळ्यात पसरत जातात.
ii) घातक कीडनाशके टाळावीत: डी.डी.टी., मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस यांसारखी कीडनाशके जैविक विषवृद्धीच्या (biomagnification) प्रक्रियेद्वारे संपूर्ण अन्नसाखळीत पसरतात, त्यामुळे अशा कीडनाशकांचा वापर शक्यतो टाळावा.
iii) सेंद्रिय कीडनाशकांचा वापर: पिकांवर फवारणी करताना शक्यतो सेंद्रिय कीडनाशकांनाच प्राधान्य द्यावे, परंतु त्यांचाही अतिरेकी वापर करणे टाळावे.
iv) वैयक्तिक सुरक्षा: फवारणी करताना नाक, डोळे व त्वचा यांचे योग्य संरक्षण करावे.
v) मुले व पाळीव प्राण्यांची काळजी: कीडनाशके लहान मुले आणि जनावरे यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची विशेष खबरदारी घ्यावी.
viii) प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या सहा साहित्यांची नांवे लिहा.
उत्तर :
i) जखमा बांधण्यासाठी/झाकण्यासाठी : बँडेज पट्ट्या, जाळीची पट्टी, त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस, वैद्यकीय कापूस, चिकटपट्टी, बॅड-एड्स.
ii) स्वच्छतेसाठी : रबराचे हातमोजे (2 जोड्या), स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे, साबण.
iii) औषधे : अँटिसेप्टिक (डेटाॅल किंवा सॅव्हलॉन), पेट्रोलियम जेली.
iv) सेफ्टीपिना, ब्लेडम छोटा चिमटा, सुई, कात्री.
v) थर्मामीटर, छोटी टॉर्च.
4. खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा :
i) अ) सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे सहा घटक लिहा.
उत्तर :
i) कोणत्याही समाजाचे आरोग्य टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या असणे आवश्यक आहे. उदा., अन्न, वस्त्र, निवारा, पाण्याची सोय, औषधोपचार, शिक्षणाच्या सोयी व समान संधी, परिसराची स्वच्छता, परिवहनची सुलभता इत्यादी.
ii) आजूबाजूची सामाजिक परिस्थिती आणि राजकीय आधार तसेच गुन्हेगारी असणे/नसणे अशा अनेक बाबींचा सामाजिक आरोग्याशी संबंध आहे.
iii) तसेच उद्याने, मैदाने, खेळण्यासाठी मोकळ्या जागा यं व्यक्तिविकासासाठी महत्त्वाच्या ठरतात. याच्याच बरोबर प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व खंबीर आणि आनंदी असणे जरुरीचे आहे.
iv) व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृत वागणे आणि विकृत विचार हे सामाजिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत होतात.
v) मित्र व नातेवाइकांचा मोठा संग्रह असणे, चांगले समवयस्क मिळणे, एकटेपणाने राहायचे झाल्यास योग्य छंद जोपासणे, आपल्या कामात आणि कर्तव्यात न चुकता झोकून देणे.
vi) इतरांप्रती विश्वास, आदर व माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती असे सर्व घटक सामाजिक आरोग्य टिकवून ठेवतात.
आ) तुम्ही काय कराल ? का ?
बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
उत्तर :
बारावीचा अभ्यासक्रम बराच विस्तृत असतो, आणि ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभर अभ्यासाकडे हवे तितके गांभीर्याने लक्ष दिलेले नसते, त्यांच्यावर परीक्षेच्या काळात मानसिक ताण येणे साहजिकच असते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने वेळेचे सुयोग्य नियोजन करावे आणि एका वेळी फक्त एकाच विषयावर लक्ष केंद्रित करावे. सतत अभ्यास न करता, मध्ये-मध्ये थोडी विश्रांतीही घ्यावी. याशिवाय घरातील व्यक्तींशी आपल्या मनातील विचार मोकळेपणाने बोलून व्यक्त करावेत. घरातील वातावरण असे ठेवावे, की ज्यामुळे विद्यार्थ्याचा ताण नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होईल. तसेच त्याला हे पटवून द्यावे की, ‘अभ्यास हा तुझ्यासाठी आहे, तू अभ्यासासाठी नाहीस.’
ii) खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

उत्तर :
1) आकृतीमध्ये दर्शविलेल्या प्रजननसंस्थेचे नाव लिहा.
उत्तर :
मानवी पुरुष-प्रजनन संस्था
2) या प्रजननसंस्थेतील दोन ग्रंथींची नावे लिहा.
उत्तर :
i) शुक्राशय
ii) काऊपरग्रंथी
iii) पु:रस्थ ग्रंथी
3) या प्रजननसंस्थेतील एका नालिकेचे नाव लिहा.
उत्तर :
शुक्रवाहिनी
4) एका शुक्राणूची लांबी किती असते ?
उत्तर :
मानवी शुक्राणूची लांबी अंदाजे 60 मायक्रोमीटर्स (60 ) असते. ही सूक्ष्म पेशी असून, तिचे डोके, मान, मध्यभाग आणि हालचालीसाठी उपयुक्त असलेली एक लांब शेपटी असे भाग असतात.
5) वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते ?
उत्तर :
पुरुषांमधील दुय्यम लैंगिक लक्षणांचा विकास आणि शुक्राणु निर्मितीची प्रक्रिया (शुक्राणूजनन) यांसाठी टेस्टोस्टेरोन हे संप्रेरक जबाबदार असते.