इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी बोर्ड पेपर 2024

दहावी इतिहास व राज्यशास्त्र बोर्ड प्रश्नपत्रिका 2024 (SSC Board) – मोफत PDF आणि उत्तरे

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) मथुरा शिल्पशैली ………………… काळात उद्याला आली.

अ) कुशाण

ब) गुप्त

क) राष्ट्रकूट

ड) मौर्य

उत्तर :

मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उद्याला आली.

2) महाबळेश्वर जवळील भिलार हे ………………….. गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

अ) पुस्तकांचे

ब) वनस्पतींचे

क) आंब्याचे

ड) किल्ल्यांचे

उत्तर :

महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

3) “मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,” असे मत ………………. या तत्त्वज्ञाने मांडले आहे.

अ) व्हॉल्टेअर

ब) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल

क) लिओपॉल्ड व्हॉन रांके

ड) कार्ल मार्क्स

उत्तर :

“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,” असे मत कार्ल मार्क्स या तत्त्वज्ञाने मांडले आहे.

ब) पुढील प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :

1)

गट ‘अ’गट ‘ब’
i) कुटियट्टम– केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
ii) रम्मन– पश्चिम बंगालमधील नृत्य
iii) रामलीला– उत्तर भारतातील रामायणाचे परंपरागत सादरीकरण
iv) कालबेलिया– राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य

उत्तर :

चुकीची जोडी : रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य

दुरुस्त जोडी : रम्मन – गढवाल (उत्तराखंड) येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य

2)

गट ‘अ’गट ‘ब’
i) दशावतार– त्यागराज
ii) खंजिरी भजन– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
iii) कीर्तन– संत नामदेव
iv) भारुड– संत एकनाथ

उत्तर :

चुकीची जोडी : दशावतार – त्यागराज

दुरुस्त जोडी : दशावतार – श्यामजी नाईक काळ

3)

गट ‘अ’गट ‘ब’
i) जेम्स मिल– स्त्रीवादी इतिहासकार
ii) फ्रेडरिक मॅक्सम्युलर– प्राच्यवादी इतिहासकार
iii) न्या. महादेव गोविंद रानडे-राष्ट्रवादी इतिहासकार
iv) दामोदर कोसंबी– मार्क्सवादी इतिहासकार

उत्तर :

चुकीची जोडी : जेम्स मिल – स्त्रीवादी इतिहासकार

दुरुस्त जोडी : जेम्स मिल – ब्रिटिश इतिहासकार

2. अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :

1) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर :

2) पुढील कालरेषा पूर्ण करा :

उत्तर :

3) पुढील तक्ता पूर्ण करा :

ललितभारूड
गुणवैशिष्ट्ये
उदाहरणे

उत्तर :

ललितभारूड
गुणवैशिष्ट्येi) आधुनिक मराठी रंगभूमीला लळिताची पार्श्वभूमी आहे.
ii) नारदीय कीर्तन परंपरेत लळिताचा समावेश असून नाट्यप्रवेशाप्रमाणे कथा सादर करणे.
iii) गोवा, कोकण या भागांत मोठ्या प्रमाणात प्रचलित.
i) आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत.
ii) सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते.
उदाहरणेकृष्णकथा व रामकथाi) ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे.
ii) संत एकनाथांची भारुडे सर्वांत

ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) :

1) स्थळ कोश

उत्तर :

i) एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक रचनेतूनच तेथील इतिहासाला आकार मिळत असतो, त्यामुळे इतिहास समजून घेण्यासाठी भूगोलाचे ज्ञानही तितकेच आवश्यक ठरते. अशा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांची सविस्तर माहिती देणारे ग्रंथ म्हणजेच स्थलकोश होत.

ii) महानुभाव पंथाची स्थापना करणारे श्रीचक्रधरस्वामी आपल्या भ्रमंतीदरम्यान ज्या गावांमधून फिरले, त्या प्रत्येक गावाची सविस्तर माहिती पंथातील मुनी व्यास यांनी ‘स्थानपोथी’ नामक ग्रंथात नोंदवून ठेवली.

iii) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ‘प्राचीन भारतीय स्थलकोश’ हा ग्रंथ रचला. यामध्ये वेदकालीन वाङ्मय, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरणशास्त्र, कौटिल्याचे अर्थशास्त्र, बौद्ध-जैन ग्रंथसंपदा, तसेच चिनी, फारसी व ग्रीक साहित्यात उल्लेखलेल्या भौगोलिक स्थळांचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे.

iv) स्थलकोशांच्या साहाय्याने प्राचीन काळातील नगरांची नावे व त्यांचा इतिहास उलगडण्यास मदत होते. यामुळेच इतिहासलेखनासाठी स्थलकोश हे एक मोलाचे साधन मानले जाते.

2) प्राच्यवादी इतिहासलेखन

उत्तर :

i) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबाबत कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना ‘प्राच्यवादी अभ्यासक’ असे म्हणतात.

ii) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला ‘प्राच्यवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

iii) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

3) वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य

उत्तर :

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले –

i) लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.

ii) सामाजिक धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला.

iii) पाश्चात्त्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाजप्रबोधनाचे काम केले.

iv) तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांचा वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकापर्यंत पोहोचवले.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

1) फुको त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ असे म्हणत असत.

उत्तर :

i) मायकेले फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.

ii) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूत काळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.

iii) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्तव’ असे म्हटले आहे.

2) चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.

उत्तर :

i) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण-महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे ‘चित्रकथी परंपरा’ होय.

ii) ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यान्पिढ्या टिकवून ठेवली आहे.

iii) चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत.

iv) नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे; कारण या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून, तो आपला वैभवशाली वारसा आहे.

3) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो.

उत्तर :

मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास-लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.

i) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.

ii) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.

iii) उत्खननात पॉपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.

iv) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

4) जागतिक वारस्याच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.

उत्तर :

i) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो.

ii) त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते.

iii) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.

iv) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी ‘युनेस्को’ या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.

4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ या सन्मानाने विभूषित करण्यात आले.

प्रश्न :

1) ‘हॉकीचे जादूगार’ कोणाला म्हणतात ?

उत्तर :

‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांना म्हणतात.

2) भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर :

भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

3) मेजर ध्यानचंद यांची ऑलिंपिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा.

उत्तर :

भारतीय हॉकीला ‘जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये विलक्षण नैपुण्य दाखवले. त्यांच्या खेळाच्या कालखंडात भारताने सलग तीन ऑलिंपिक स्पर्धा – 1928 साली एम्स्टरडॅम, 1932 साली लॉस एंजलिस आणि 1936 साली बर्लिन येथे – सुवर्णपदकांची कमाई केली. या सर्व स्पर्धांदरम्यान ध्यानचंद यांनी सातत्याने असंख्य गोल नोंदवले, ज्यामुळे जागतिक हॉकीविश्वात त्यांचे नाव कायमचे कोरले गेले. विशेषतः 1936 च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय संघाने यजमान जर्मनीला 8-1 अशा फरकाने नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले; या विजयात ध्यानचंद यांनी स्वतः 3 गोलांची भर घातली. त्यांची ही कामगिरी हॉकीच्या इतिहासात आजही सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे.

5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

1) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर :

i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.

ii) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाॅ-द-बोव्हा हिने मांडली.

iii) त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.

iv) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियनस्म स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.

v) 1990 नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच ‘स्त्रीवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

2) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे ?

उत्तर :

ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे. संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते.

i) ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात.

ii) कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे, ती त्वरित सांगता येऊ शकते.

iii) त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही.

iv) उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विद्ध्वंस होत नाही.

v) व्यवस्थापन जाणकार असेल; तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात.

vi) एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते.

vii) उत्तम वयस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात.

viii) कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे, जाहीरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते.

3) कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.

उत्तर :

विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात –

i) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात.

ii) कलेच्या अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात.

iii) औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते.

iv) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.

v) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला-क्षेत्रातील जाणकारांची गरज असते.

vi) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.

4) दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.

उत्तर :

i) दशावतारी नाटक हा महाराष्ट्रातील एक लोकनाट्य प्रकार आहे.

ii) या नाटकांचा आधार मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, आणि कल्की या दहा अवतारांवर असतो.

iii) या नाटकांचे प्रयोग मुख्यत: सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे होतात. दशावतारी नाटकांच्या सादरीकरणात सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करून नाटकाची सुरुवात करतो.

iv) नाटकाचा बहुतांश भाग पद्य रूपात असतो, आणि काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. या नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा सर्वात परंपरागत असतो. देवाची भूमिका सादर करणारी पात्रे लाकडी मुखवटे वापरतात.

v) दशावतारी नाटकाचा शेवट हंडी फोडून दहिकाला वाटणे आणि आरती करून होतो.

6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) 73 व्या व 74 व्या संविधान दुरुस्तीने ………………… च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.

अ) विधानसभा

ब) स्थानिक शासनसंस्था

क) लोकसभा

ड) राज्यसभा

उत्तर :

73 व्या व 74 व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासनसंस्था च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.

2) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे …………………

अ) धार्मिक संघर्ष

ब) नक्षलवादी कारवाया

क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे

ड) गुंडगिरीला महत्त्व

उत्तर :

जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.

7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

1) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो.

ii) एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.

iii) निर्वाचित सदस्याने पक्षांवर केले, तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.

2) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) 1989 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली.

ii) पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.

iii) 1977 च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.

3) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

ii) भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.

iii) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी ‘ग्राहक चळवळ’ अस्तित्वात आली.

8. अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक) :

1) राजकारणाचे गुन्हेगारीकरण

उत्तर :

i) राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते.

ii) पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात.

iii) निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देतात.

iv) असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात. विरोधकांना त्रास देतात. काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले की लोकशाही कमकुवत होते.

2) हक्काधारित दृष्टिकोन

उत्तर :

i) स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले.

ii) लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ ‘लाभार्थी’ म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता.

iii) मात्र इ.स. 2000 नंतरच्या काळात मात्र ‘नागरिकांचा हक्क’ ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या.

iv) म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा; म्हणून कायदे केले गेले नाहीत; तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच ‘हक्काधारित दृष्टिकोन’ असे म्हणतात.

ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही एक) :

1) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर :

2) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर :

9. पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक) :

1) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?

उत्तर :

i) ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे.

ii) व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे.

iii) जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.

iv) सर्वांना विकासाची समान संधी देणे.

2) मध्यावधी निवडणुका म्हणजे काय ?

उत्तर :

i) विधानसभेत, लोकसभेत निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते.

ii) जर पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्यावा लागतात. त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात.

Leave a Comment