वासरू स्वाध्याय

वासरू स्वाध्याय

वासरू स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी

प्रश्न. 1. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते ?

उत्तर :

रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळपाचा घेर सोडते.

आ) तहान, भूक विसरून वासरू काय करते ?

उत्तर :

तहान, भूक विसरून वासरू सारे रान पायाखाली घालते.

इ) वासराला कळपाची आठवण केव्हा होते ?

उत्तर :

रानात खूप भटकल्यामुळे वासरू थकतो आणि त्याचा हुरूप संपतो. तेव्हा त्याला कळपाची आठवण होते.

प्रश्न. 2. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा.

अ) भूक, तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते.

उत्तर :

विसरूनी भान, भूक नि तहान,

पायांखाली रान घाली सारे.

आ) वासरू रानात फिरून फिरून थकले, की त्याचा उत्साह कमी होतो. मग त्याला आपला कळप आठवू लागतो.

उत्तर :

थकूनिया खूप सरता हुरूप,

आठवे कळप तयालागी.

इ) वासरू कळपाकडे परत यायला निघते, पण त्याला रस्ता सापडत नाही. ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते.

उत्तर :

फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,

आणखीच भाग भटकत.

प्रश्न. 3. कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले, याचे वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर :

वासराला रान पाहायची इच्छा होते. मोठ्या उत्साहाने ते चालत होते. रानाची शोभा पाहत होते. दिसेल त्या रस्त्याने जात होते. भटकता भटकता ते थकले. माघारी यायला निघाले. पण काही वेळानंतर जो रस्ता आपण सोडला त्याच रस्त्यावर आपण पुन्हा आलो आहोत असे त्याला दिसायचे. अशा रीतीने रानात ते गोलगोल फिरू लागले. कळपातून निघालेले वासरू रानात असे गोलगोल फिरू लागले.

प्रश्न. 4. खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा.

i) कानांमध्ये वारे भरणे –

उत्तर :

कानांमध्ये वारे भरणे – हुरळून जाणे, उच्छुंखल होणे

वा. उ. – शिक्षण सोडून सिनेमात जाण्याचे राजनच्या कानात वारे भरले आहे.

ii) हुरळून जाणे –

उत्तर :

हुरळून जाणे – अविचारी उत्साह वाटणे.

वा. उ. – जयाला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे ती हुरळून गेली आहे.

iii) रान पायांखाली –

उत्तर :

रान पायांखाली – संपूर्ण रान फिरणे

वा. उ. – वाघाला शोध घेण्यासाठी शिकाऱ्याने रान पायाखाली घातले.

iv) सगळीकडे फिरणे –

उत्तर :

सगळीकडे फिरणे – सर्वत्र फिरणे.

वा. उ. – चोरांचा शोध घ्यायला पोलीस सगळीकडे फिरले.

v) तहानभूक विसरणे –

उत्तर :

तहानभूक विसरणे – तहान आणि भुकेचा विसर पडणे.

वा. उ. – मौक्तिकचे शिल्प पाहताना मी तहानभूक विसरलो.

vi) मग्न होणे –

उत्तर :

मग्न होणे – चूर होणे, तल्लीन होणे.

वा. उ. – आश्लेषा कथा वाचण्यात मग्न झाली होती.

vii) हुरूप येणे –

उत्तर :

हुरूप येणे – उत्साह येणे.

वा. उ. – गुरुजींनी माझी पाठ थोपटल्यामुळे अभ्यासाचा मला नवा हुरूप आला आहे.

viii) मोकाट सुटणे –

उत्तर :

मोकाट सुटणे – कोणतेही बंधन न पाळणे, स्वैर असणे.

वा. उ. – कोर्टातून निर्दोष सुटलेले गुंड परत मोकाट सुटतात.

प्रश्न. 5. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ) शाळेची मधली सुट्टी झाली, की तुम्ही काय काय करता ?

उत्तर :

शाळेची मधली सुट्टी झाली, की आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि डबे खातो. थोडा वेळ गप्पा करतो व शाळेच्या मैदानावर आवडीनुसार खेळ खेळतो. मधली सुट्टी संपली की वर्गात परत येतो.

आ) खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाहीत तर तुमची आई काय करते ?

उत्तर :

खेळायला गेल्यानंतर मी लवकर परतलो नाही तर माझी आई माझ्या मित्रांच्या घरी फोन करते आणि विचारपूस करते. सर्व मित्रांच्या घरी प्रत्येकाच्या घरचे फोन नंबर आहेत.

इ) तुम्ही तहानभूक केव्हा विसरता ?

उत्तर :

आमची कबड्डीची, क्रिकेटची स्पर्धा असली तर खेळताना आम्ही तहानभूक विसरतो.

प्रश्न. 6. ‘मोकाट-अफाट-वाट’ याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा.

उत्तर :

i) वासरू – फिरू – घेरू

ii) वारे – न्यारे – फिरे

iii) भान – तहान – रान

iv) खूप – हुरूप – कळप

v) मागे – लागे – भागे

vi) अंधारू – हंबरू – लेकरू

प्रश्न. 7. ‘रानोमाळ’ सारखे पाच जोडशब्द लिहा.

उत्तर :

i) गल्लीबोळ

ii) वृक्षवेली

iii) सगेसोयरे

iv) आईबाप

v) पाचदहा

प्रश्न. 8. सोडूनिया, थकूनिया यांसारखे शब्द कवितेत आले आहेत. ते नेहमी लिहिताना ‘सोडूनिया, थकुनिया’ असे लिहितात. या शब्दांप्रमाणे खालील शब्द लिहा.

जेवून, झेपून, खेळून, येऊन, जाऊन, बोलून

उत्तर :

जेवुनिया, झोपुनिया, खेळुनिया, येउनिया, जाउनिया, बोलुनिया.

प्रश्न. 9. ‘एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले,’ असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का ? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का ? त्या वेळी काय घडले ते सांगा.

उत्तर :

एकदा मी आईसोबत देवीच्या प्रदर्शनात गेलो होतो. तेथे खेळण्यांची खूप दुकाने होती. मी आईला बंदूक घेऊन मागितली. ती ‘नाही’ म्हणाली. मला राग आला. आईनं धरलेला माझा हात मी झटक्यानं सोडवला. मी बंदुकीच्या हट्टाला पेटलो होतो. तिथे माणसांची खूप गर्दी होती. त्या गर्दीत मला आई दिसेनासी झाली. मी ‘आई, आई’ म्हणून खूप ओरडलो पण त्या गर्दीत ती कुठेच दिसली नाही. आता मला बंदूक नको होती, आई हवी होती. मी रडू लागलो. तोच माईकवरून आवाज आला. “तन्मय नावाचा मुलगा हरवला आहे. तो जिथे कुठे असेल त्याने माईकजवळ यावे. त्याची आई इथे वाट पाहत आहे”. तसाच मी धावतपळत माईकाजवळ गेलो. आई दिसताच तिला बिलगलो आणि तिला म्हणालो, “मला बंदूक नको आहे.”

खालील चित्रांना विशेषणे लावा.

उत्तर :

ओळखा पाहू !

i) बत्तीस भाऊ, एकच बहीण

सर्वात तीच आयुष्यमान

उत्तर :

दात व जीभ

ii) चार बोटांचे अंतर दोघांत असे

एकावर विश्वास, तर दुसऱ्यावर नसे.

उत्तर :

डोळे व कान

iii) बारा घरावर दोघे पहारा करती

सदैव फिरती, न थकती, न थांबती

उत्तर :

घड्याळ व काटे

Leave a Comment