वनवासी स्वाध्याय

वनवासी स्वाध्याय

वनवासी स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. खालील शब्दसमूहांतील अर्थ स्पष्ट करा.

1) पांघरू आभाळ –

उत्तर :

आभाळ हेच आमचे पांघरूण आहे.

2) वांदार नळीचे –

उत्तर :

आम्ही डोंगरदऱ्यात माकडाप्रमाणे उड्या मारतो.

3) आभाळ पेलीत –

उत्तर :

आमच्या डोक्यावर आम्ही ओझे वाहतो. (आभाळाला पेलतो.)

प्रश्न. 2. शोध घ्या.

अ) ‘हात लाऊन गंगना येऊ चांदण्या घेऊन’ या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण –

उत्तर :

निर्भय आत्मविश्वास

आ) कवितेच्या यमकरचनेतील वेगळेपण –

उत्तर :

कवितेच्या पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या चरणात अंत्याक्षर सारखेच आहे. तिसऱ्या चरणांत वेगळे आहे.

प्रश्न. 3. काव्यसौंदर्य.

1) ‘बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राकं हसून’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर :

प्रस्तुत कवितेत तुकाराम धांडे यांनी वनवासी मुलांचे डोंगरदऱ्यातील जीवन वर्णन केले आहे.

दुपारी सूर्य तापतो. माळरानावर हुंदड हुंदाडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्याबोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो; म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. पण रात्री मात्र चंद्राच्या शीतल प्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते. म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झाले आहे.

2) ‘डोई आभाळ पेलीत चालू शिंव्हाच्या चालीत’, या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा.

उत्तर :

प्रस्तुत ओळ ही ‘वनवासी’ या कवितेतील आहे. या कवितेचे कवी तुकाराम धांडे यांनी वनवासी व त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, त्यांचे निसर्गावरचे प्रेम व त्यामधील अतुट नाते यांचे चित्रण केले आहे. त्यांनी या वनवासी मुलांना ‘सिंहाची’ उपमा दिली आहे. आदिवासी मुले उघड्याबोडक्या अंगाने उंबराच्या माळावर भटकतात, बागडतात. झाडांवर आणि डोंगरांच्या कड्यावर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते. परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची चिंता नसते. ऊन, वारा, पाऊस झेलत ते मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याचा दरारा सगळ्या रानावर असतो. म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन येथे केले आहे.

प्रश्न. 4. अभिव्यक्ती

‘आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते’, याविषयी तुमचे विचार लिहा.

उत्तर :

आदिवासी समाज हा दाट जंगलात व कडेकपारीत राहतो. झाडांच्या वाढलेल्या फांद्या, काटक्या घेऊन त्यांची खोपटी तयार करतात. रानातली फळे, कंदमुळे खाऊन स्वतःची गुजराण करतात. ओढ्यानाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. ते धरतीवर जणू आभाळच पांघरून जगतात. जंगलातील पशूपक्षी त्यांचा मित्र परिवार असतो. दुखण्याखुपण्याला ते झाडापाल्यांचे औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावरच अवलंबून असते, म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे नाते अतूट असते.

भाषा सौंदर्य

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

1) ते बांधकाम कसलं आहे

उत्तर :

ते बांधकाम कसलं आहे ?

2) आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला

उत्तर :

आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला.

3) गुलाब जास्वंद मोगरा ही माझी आवडती फुले आहेत

उत्तर :

गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत.

4) अरेरे त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले

उत्तर :

अरेरे ! त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले.

5) आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे

उत्तर :

आई म्हणाली, “सोनम चल लवकर उशीर होत आहे.”

Leave a Comment