iyatta dahavi vidnyan aani tantrdnyan bhag 1 board prashnapatrika 2025
1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :
i) अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा ……………….. मध्ये आहे.
अ) गण 2
ब) गण 16
क) आवर्त 2
ड) डी-खंड
ऊतत्र :
अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा गण 2 मध्ये आहे.
ii) ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना …………… असे म्हणतात.
अ) संयोग अभिक्रिया
ब) अपघटन अभिक्रिया
क) विस्थापन अभिक्रिया
ड) दुहेरी विस्थापन अभिक्रिया
उत्तर :
ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात.
iii) विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी ………………. धातूचा उपयोग करतात.
अ) नायक्रोम
ब) तांबे
क) टंगस्टन
ड) अँल्युमिनिअम
उत्तर :
विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.
iv) एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे ……………….. म्हणतात.
अ) परावर्तन
ब) अपस्करण
क) विकिरण
ड) अपवर्तन
उत्तर :
एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात.
v) CaO + H2O Ca(OH)2 + उष्णता ही ……………………… प्रकारची अभिक्रिया आहे.
अ) उष्मादायी
ब) विद्युतअपघटनी
क) अपघटन
ड) उष्माग्राही
उत्तर :
CaO + H2O Ca(OH)2 + उष्णता ही उष्मादायी प्रकारची अभिक्रिया आहे.
ब) खालील प्रश्न सोडवा :
i) चूक की बरोबर ते लिहा :
पेशींमधील श्वसनादरम्यान रेडाॅक्स अभिक्रिया घडत असते.
उत्तर :
बरोबर
स्पष्टीकरण : पेशींमधील श्वसनादरम्यान रेडाॅक्स अभिक्रिया घडत असते. तेथे सायटोक्रोम सी ऑक्सिडेज ह्या विकराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणतो.
ii) वेगळा घटक ओळखा :
ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक
उत्तर :
चुंबक
स्पष्टीकरण : ध्वनीवर्धक, सूक्ष्मश्रवणी आणि विद्युतचलित्र ही विद्युत उपकरणे आहेत, तर चुंबक हा एक नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थ आहे जो विद्युत उपकरण नाही. म्हणून, चुंबक हा सर्वात वेगळा घटक आहे.
iii) ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ?
उत्तर :
ताऱ्यांचे लुकलुकणे हे ताऱ्यांच्या प्रकाशाच्या वातावरणीय अपवर्तनामुळे होते. ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणाच्या वेगवेगळ्या थरांमधून जातो, ज्यांची घनता वेगवेगळी असते. प्रकाशाच्या या झुकण्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात.
iv) योग्य जोडी जुळवा :
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| साधा सूक्ष्मदर्शक | a) अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे |
| b) दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करणे | |
| c) घड्याळ दुरुस्ती करणे |
उत्तर :
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| साधा सूक्ष्मदर्शक | a) अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे |
v) 0°C ते 4°C या तापमानदरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात ?
उत्तर :
असंगत आचरण
स्पष्टीकरण : पाणी 0°C पासून तापवायला सुरुवात केल्यावर ते ताबडतोब प्रसरण पावत नाही, तर उलट 4°C पर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे आकारमान कमी होत जाते, म्हणजेच ते आकुंचन पावते. पाण्याचे आकारमान 4°C या तापमानाला सर्वात कमी म्हणजेच घनता सर्वाधिक असते. त्यानंतर तापमान 4°C पेक्षा अधिक वाढवत नेल्यास मात्र पाण्याचे आकारमान नेहमीप्रमाणे वाढू लागते. अशा प्रकारे 0°C ते 4°C या तापमानपट्ट्यात पाणी इतर पदार्थांप्रमाणे न वागता उलट पद्धतीने वागते, यालाच “पाण्याचे असंगत आचरण” असे संबोधले जाते.
2. अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) :
i) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुआकार कमी होत जातो.
उत्तर :
i) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचात जमा होतो.
ii) वाढीत केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते.
ii) विद्युतपारेषणासाठी तांब्याच्या किंवा अँल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
उत्तर :
i) तांबे व अँल्युमिनिअम उत्तम विद्युत वाहक आहेत.
ii) तांबे व अँल्युमिनिअमची रोधकता खूप कमी असल्याने त्यांतून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अँल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
iii) काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये ईथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात.
उत्तर :
i) ऊस हे पीक सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्याच्या बाबतीत अतिशय कार्यक्षम मानले जाते. उसाच्या रसापासून साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत मळी हे उपउत्पादन शिल्लक राहते आणि या मळीवर किण्वन प्रक्रिया घडवून आणल्यास अल्कोहोल (इथेनॉल) मिळवता येते.
ii) इथेनॉलचे पुरेशा प्रमाणात हवेच्या उपस्थितीत ज्वलन केल्यास त्यातून केवळ कार्बन डायऑक्साइड आणि पाणी हीच उत्पादिते बाहेर पडतात.
iii) यामुळेच इथेनॉल हे प्रदूषण न करणारे, स्वच्छ स्वरूपाचे इंधन मानले जाते. याच गुणधर्मामुळे काही देशांत पेट्रोलमध्ये हे इथेनॉल मिसळून पेट्रोलची ज्वलन-कार्यक्षमता सुधारली जाते. पेट्रोल आणि इथेनॉल यांच्या अशा मिश्रणातून तयार होणाऱ्या इंधनाला गॅसोहोल असे म्हटले जाते.
ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) :
i) पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ? ते तत्त्व लिहा.
उत्तर :
पदार्थाची विशिष्ट उष्णता क्षमता मोजण्यासाठी उष्णता विनिमयाचे तत्त्व वापरले जाते. हे तत्त्व खालीलप्रमाणे आहे : दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत आपणांस खालील तत्त्व मिळते.
उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्त्वास उष्णता विनिमयाचे तत्त्व म्हणतात.
ii) लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल ?
उत्तर :
घराच्या लोखंडी दरवाजाला गंज चढू नये यासाठी पुढील उपाययोजना केल्या जातात:
i) धातूच्या पृष्ठभागावर असा एखादा संरक्षक थर चढवला जातो, ज्यामुळे हवेतील बाष्प व ऑक्सिजन हे धातूच्या थेट संपर्कात येऊ शकत नाहीत. परिणामी, त्यांच्यात कोणतीही रासायनिक अभिक्रिया घडून येत नाही.
ii) धातूच्या पृष्ठभागावर रंग, तेल, ग्रीस अथवा वॉर्निश यांसारख्या पदार्थांचा लेप देऊनही धातूचे क्षरण थांबवता येते. उदाहरणार्थ, लोखंडाला गंज चढण्यापासून वाचवण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जातो.
iii) फरक स्पष्ट करा :
वस्तुमान आणि वजन
उत्तर :
| वस्तुमान | वजन |
|---|---|
| i) एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्यसंचयाचे मापन होय. | i) एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात. |
| ii) या राशीला परिमाण असते, पण दिशा नसते. | ii) या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. |
| iii) हे विश्वात सगळीकडे सारखे असते. | iii) हे पृथ्वीसापेक्ष स्थानानुसार बदलते. |
| iv) हे कधीही शून्य होऊ शकत नाही. | iv) हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते. |
| v) याचे SI एकक किलोग्रॅम आहे. | v) याचे SI एकक न्यूटन आहे. |
iv) ‘दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो’ यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
a) प्रक्षेपकाचे नाव सांगा.
उत्तर :
रॉकेट
b) त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते ?
उत्तर :
हा न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे, जो म्हणतो, “प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते.” जेव्हा रॉकेट फटाका जळतो, तेव्हा गरम वायू जोरात खाली उत्सर्जित होतात, ज्यामुळे विपरीत दिशेने एक बल निर्माण होते, आणि त्यामुळे रॉकेट वरच्या दिशेने उडते.
v) अपघटन अभिक्रिया म्हणजे काय ? साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा.
उत्तर :
ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन म्हणतात.
C11H22O11 →/उष्णता 12C + 11H2O
3. खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) :
i) एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 m उंचीवरून खाली पडला. ‘g’ चे मूल्य 10 m/s2 आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा :
a) जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी.
b) जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग.
उत्तर :
ii) वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा :
a) सर्वाधिक विद्युतऋण अणु
उत्तर :
नाव : फ्ल्युओरीन
संज्ञा : F
स्पष्टीकरण : फ्ल्यओरीन (F) हे सर्वाधिक विद्युतऋणात्मक मूलद्रव्य आहे, ज्याची विद्युतऋणता पॉलिंग परिमाणावर 3.98 आहे. यामध्ये रासायनिक बंधामध्ये इलेक्ट्रॉन्स आकर्षित करण्याची तीव्र प्रवृत्ती असते, ज्यामुळे ते अत्यंत अभिक्रियाशील बनते, विशेषत: धातू आणि हायड्रोजनसोबत.
b) सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणु
उत्तर :
नाव : हायड्रोजन
संज्ञा : H
स्पष्टीकरण : हायड्रोजन (H) चे अणुवस्तुमान सर्वात कमी, 1.008 u आहे. हे विश्वातील सर्वात हलके आणि सर्वाधिक मुबलक मूलद्रव्य आहे, जे ज्वलन आणि आम्ल-क्षार अभिक्रियांसह रासायनिक अभिक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
c) सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू
उत्तर :
नाव : हेलिअम
संज्ञा : He
स्पष्टीकरण : हेलिअम (He) हा सर्वात लहान अणुत्रिज्या असलेला राजवायू आहे. जरी राजवायूंमध्ये पूर्ण बाह्य इलेक्ट्रॉन कवच असतात आणि ते सहजपणे बंध तयार करत नाहीत, तरी हेलिअमचा अणु आकार सर्वात लहान असतो कारण त्यात फक्त दोन इलेक्ट्रॉन असतात आणि तो तीव्र अणु आकर्षण अनुभवतो, ज्यामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या जवळ येतात.
iii) a) तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता. मुक्त होणारा वायू कोणता ? त्याचा रंग सांगा.
उत्तर :
तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया:
तांबे (Cu) हे सांद्र नायट्रिक आम्लाशी (HNO₃) अभिक्रिया करते तेव्हा त्यात ऑक्सीकरण-अपचयन प्रकारची अभिक्रिया घडून येते. या अभिक्रियेच्या परिणामी तांबे नायट्रेट (Cu(NO₃)₂), नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂) आणि पाणी (H₂O) ही उत्पादिते निर्माण होतात.
b) अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा.
उत्तर :
Cu + 4HNO3 → Cu (NO3)2 + 2NO2 ↑ + 2H2O
c) अभिक्रियाकारके व उत्पादिके यांची रासायनिक नावे लिहा.
उत्तर :
| अभिक्रियाकारके | उत्पादिते |
|---|---|
| तांबे (Cu) | तांबे (II) नायट्रेट (Cu(NO3)2) |
| नायट्रिक आम्ल (HNO3) | नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) |
| पाणी (H2O) |
i) तांबे सांद्र नायट्रिक आम्लाच्या संपर्कात आल्यावर हळूहळू विरघळू लागते आणि या प्रक्रियेतून तांबे (II) नायट्रेटचे निळ्या रंगाचे द्रावण तयार होते.
ii) या अभिक्रियेदरम्यान नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂) हा वायू बाहेर पडतो, जो लालसर-तपकिरी रंगाच्या धुराच्या स्वरूपात दिसून येतो.
iii) याशिवाय या अभिक्रियेत पाणी हे देखील एक उप-उत्पादन म्हणून तयार होते.
iv) आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा :

उत्तर :

v) इंद्रधनुष्यनिर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
a) इंद्रधनुष्यनिर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.
उत्तर :

b) यात अंतर्भात असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक घटना सांगा.
उत्तर :
इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम आहे.
c) पाण्याचे अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात ?
उत्तर :
पावसाच्या पाण्याचे अतिशय बारीक थेंब हे जणू छोट्या लोलकांसारखे कार्य करतात. वातावरणात तरंगणाऱ्या अशा एखाद्या पाण्याच्या थेंबात सूर्यकिरण शिरतो, तेव्हा त्या थेंबामुळे प्रकाशाचे अपवर्तन होऊन त्याचे सप्तरंगांत विभाजन (अपस्करण) घडते. त्यानंतर हा प्रकाश थेंबाच्या आतील पृष्ठभागावरून आंतरिक परावर्तन पावतो आणि अखेरीस थेंबातून बाहेर पडताना त्याचे पुन्हा एकदा अपवर्तन होते, जसे संबंधित आकृतीत दर्शवले आहे. या तीनही प्रकाशीय घटना – अपवर्तन, अपस्करण व आंतरिक परावर्तन – एकत्रितपणे घडून येतात आणि त्यांच्या एकत्रित परिणामातूनच आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसून येते.
vi) नावे लिहा :
a) सुरीने सहज कापता येतील असे दोन धातू
उत्तर :
i) सोडिअम (Na)
ii) पोटॅशिअम (K)
b) काही धातूवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. त्या गुणधर्माचे नाव.
उत्तर :
काही धातूंवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. याला आपण नादमयता असे म्हणतो. असे धातू नादमय धातू म्हणून ओळखले जातात.
c) विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ.
उत्तर :
कार्बन (ग्रॅफाइट) हा विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ आहे.
vii) खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा :

a) वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो ?
उत्तर :
विद्युत विलेपन प्रक्रियेला बोध होतो.
b) ही प्रक्रिया कशी घडते ?
उत्तर :
विद्युत अपघटनाद्वारे जास्त अभिक्रियाशील धातूवर त्याच्यापेक्षा कमी अभिक्रियाशील धातूचा थर दिला जातो म्हणजेच विद्युत विलेपन प्रक्रिया घडते.
c) या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू
उत्तर :
चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने
viii) खालील सारणी पूर्ण करा :
| उपग्रहाचा प्रकार | उपग्रहाचे कार्य | भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे |
|---|---|---|
| a) …………………….. | पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. | …………………….. |
| b) हवामान उपग्रह | …………………….. | …………………….. |
| c) …………………….. | …………………….. | IRS प्रक्षेपक : PSLV |
उत्तर :
| उपग्रहाचा प्रकार | उपग्रहाचे कार्य | भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे |
|---|---|---|
| a) दिशादर्शक उपग्रह | पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. | IRNSS |
| b) हवामान उपग्रह | हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. | INSAT |
| c) पृथ्वी-निरीक्षक उपग्रह | पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगलेवाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशातील बर्फ यांचा अभ्यास तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करणे | IRS प्रक्षेपक : PSLV |
4. कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा :
i) a) मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.
उत्तर :

b) निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे ?
उत्तर :
निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 25 cm आहे.
c) नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात ?
उत्तर :
नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात.
d) कोणत्या दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप भिंगाची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते ?
उत्तर :
वृद्ध दृष्टिता दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप भिंगाची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते
ii) क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
a) क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
उत्तर :
क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,7 असे आहे.
b) क्लोरीन अणुच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा.
उत्तर :
क्लोरीन अणुच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 7 आहे.
c) क्लोरीनचे रेणूसूत्र सांगा.
उत्तर :
क्लोरीनचे रेणूसूत्र – Cl2
d) क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो ?
उत्तर :
क्लोरीनचा रेणू निर्माण होताना सहसंयुज प्रकारचा बंध निर्माण होतो.
e) क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना (वर्तुळविरहित) रेखाटन करा.
उत्तर :
