इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 प्रश्नपत्रिका 2025 pdf

इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 बोर्ड प्रश्नपत्रिका 2025

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा.

i) ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होवून ऊर्जेबरोबरच पाणी आणि ………………… चे रेणू तयार होतात.

अ) CO2

ब) O2

क) NaOH

ड) HNO3

उत्तर :

ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होवून ऊर्जेबरोबरच पाणी आणि CO2 चे रेणू तयार होतात.

ii) व्हिनेगरमध्ये ………………. आम्ल असते.

अ) अँसेटीक

ब) लॅक्टिक

क) टारटारीक

ड) हायड्रोक्लोरीक

उत्तर :

व्हिनेगरमध्ये अँसेटीक आम्ल असते.

iii) जनुकांमध्ये अचानक बदल होवून सजीवात लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच ………………. होय.

अ) परिवर्तन

ब) उत्परिवर्तन

क) विकृती

ड) स्थानांतरण

उत्तर :

जनुकांमध्ये अचानक बदल होवून सजीवात लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय.

iv) मानवी शुकपेशीची निर्मिती ……………….. या अवयवात होते.

अ) शुक्रवाहिनी

ब) स्खलनवाहिनी

क) वृषण

ड) मूत्रजननवाहिनी

उत्तर :

मानवी शुकपेशीची निर्मिती वृषण या अवयवात होते.

iv) सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे ………………. करतात.

अ) रासायनिक ऊर्जेत

ब) प्रकाश ऊर्जेत

क) यांत्रिक ऊर्जेत

ड) विद्युत ऊर्जेत

उत्तर :

सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात.

ब) खालील प्रश्न सोडवा :

i) विसंगत पद ओळखा :

खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, फलन

उत्तर :

फलन

स्पष्टीकरण :
खंडीभवन, पुनर्जनन आणि मुकुलायन या तिन्ही अलैंगिक प्रजननाच्या पद्धती आहेत, ज्यामध्ये एकाच सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो – म्हणजेच यासाठी दुसऱ्या जीवाची गरज भासत नाही. याउलट, फलन ही मात्र लैंगिक प्रजननाशी संबंधित प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दोन भिन्न सजीवांचे युग्मक एकत्र येऊन नवीन सजीवाची निर्मिती करतात. त्यामुळे इतर तिघांच्या तुलनेत फलन ही प्रक्रिया वेगळी ठरते आणि म्हणूनच ती या गटातील विसंगत पद आहे.

ii) सहसंबंध लिहा :

मधुमेह : इन्सुलीन : : कॅन्सर : ……………..

उत्तर :

मधुमेह : इन्सुलीन : : कॅन्सर : कीमोथेरेपी

iii) चूक की बरोबर, ते लिहा :

जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण :

जीवाश्म म्हणजे भूतकाळात पृथ्वीवर वास्तव्य करणाऱ्या सजीवांचे शिल्लक राहिलेले अवशेष किंवा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा होत. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या पूर्वजांचे प्रतिनिधित्व हे जीवाश्म करतात. उत्क्रांतीचा भक्कम पुरावा म्हणून जीवाश्मांकडे पाहिले जाते, कारण त्यांमधून प्राचीन काळातील सजीवांची शारीरिक वैशिष्ट्ये आणि कालौघात त्यांच्यात घडत गेलेले टप्प्याटप्प्याने बदल स्पष्टपणे दिसून येतात – याच बदलांच्या साखळीतून आजचे सजीव सृष्टीत विकसित झाले आहेत.

iv) जैवतंत्रज्ञानाचे दोन व्यावहारिक उपयोग लिहा.

उत्तर :

i) जनुकीय सुधारित पिके : एखाद्या पिकाच्या मूळ जनुकीय संरचनेत बाह्य जनुक समाविष्ट करून, त्यातून हवा तो गुणधर्म प्राप्त केलेल्या पिकांना जनुकीय सुधारित (GM) पिके म्हणून ओळखले जाते. या तंत्राच्या साहाय्याने अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारशक्ती असलेल्या, क्षारयुक्त जमिनीत तग धरणाऱ्या, तणनाशकांना सहनशील तसेच दुष्काळ व थंडीसारख्या प्रतिकूल हवामानातही टिकून राहू शकणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करता येतात.

ii) पशुसंवर्धन क्षेत्रातील प्रगती : कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण या दोन तंत्रांचा वापर प्रामुख्याने पशुधन सुधारण्यासाठी केला जातो. यामुळे दूध, मांस, लोकर यांसारख्या प्राणीजन्य उत्पादनांच्या प्रमाणात तसेच दर्जातही लक्षणीय वाढ साधता येते. शिवाय, अधिक कार्यक्षम व शक्तिशाली अशा श्रमिक जनावरांच्या जातीही याच पद्धतींद्वारे निर्माण करण्यात आल्या आहेत.

iii) कृषी जैवतंत्रज्ञान : शेती क्षेत्रातील उत्पादनक्षमता आणि पीकविविधता वाढवण्यासाठी जैवतंत्रज्ञानाच्या विविध पद्धतींचा प्रभावीपणे उपयोग केला जातो.

v) मी मत्स्यप्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण ?

उत्तर :

लंगफिश

2. अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) :

i) काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनाॅक्सीश्वसन करतात.

उत्तर :

काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनऐवजी विनाॅक्सिश्वसन करू लागतात. जिवंत राहण्यासाठी अशा विनाॅक्सिश्वसनाचा आधार घेतला जातो.

ii) मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे.

उत्तर :

i) लिंगनिश्चिती फक्त पुरुषा शुक्राणूंमध्ये असलेल्या गुणसूत्रांवर अवलंबून असते, स्त्रीच्या अंडपेशीवर नाही.

ii) मुलगा किंवा मुलगी होणे पुरुषाच्या शुक्रजंतूवर अवलंबून असते, स्त्रीमध्ये सतत XX गुणसूत्रे असतात, तर पुरुषामध्ये XY गुणसूत्रे असतात.

iii) शुक्राणूच बाळाच्या लिंगाचा निर्णय घेतो कारण त्यात X किंवा Y गुणसूत्र असते: जर X गुणसूत्र असलेला शुक्रजंतू स्त्रीच्या अंडीपेशीशी संयोग करतो, तर गर्भ मुलगी (XX) असते. जर Y गुणसूत्र असलेला शुक्रजंतू स्त्रीच्या अंडीपेशीशी संयोग करतो, तर गर्भ (XY) असतो.

iv) त्यामुळे लिंगनिश्चितीसाठी वडिलांचे शुक्राणू जबाबदार असतात आणि मुलीला जन्म देण्यासाठी आईला दोष देणे हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आणि सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक आहे.

iii) अणु ऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरणस्नेही नाही.

उत्तर :

i) दुर्घटनांचा संभाव्य धोका : चेर्नोबिल (१९८६) व फुकुशिमा (२०११) येथे घडलेल्या अणुदुर्घटनांनी हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे, की अशा प्रकारच्या अपघातांमुळे पर्यावरणावर दीर्घकाळ टिकणारे दुष्परिणाम होऊ शकतात आणि जनआरोग्यासमोरही गंभीर संकट उभे राहू शकते.

ii) औष्णिक प्रदूषण : अणुऊर्जा प्रकल्पांतून नद्या व तलावांमध्ये सोडले जाणारे तप्त पाणी जलपरिसंस्थेचा नैसर्गिक समतोल ढासळवू शकते, तसेच त्यामुळे जलचर सृष्टीलाही हानी पोहोचण्याची शक्यता असते.

iii) किरणोत्सर्गाची गळती : अणुभट्टीमध्ये अगदी किरकोळ प्रमाणात जरी गळती झाली, तरी त्यामुळे माणसे व प्राणी हानिकारक किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.

iv) युरेनियम उत्खननाशी निगडित समस्या : अणुऊर्जानिर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियमचे उत्खनन करताना जमिनीची मोठ्या प्रमाणावर हानी होते, तसेच या खाणींमध्ये काम करणाऱ्या मजुरांना अतिशय घातक अशा किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते.

ब) खालील प्रश्न सोडवा (कोणतेही तीन) :

i) खालील अन्नसाखळी पूर्ण करा :

उत्तर :

ii) फरक स्पष्ट करा :

मत्स्यप्राणी वर्ग आणि सरीसृपप्राणी वर्ग

उत्तर :

गुणधर्ममत्स्यप्राणी वर्गसरीसृपप्राणी वर्ग
आधिवासहे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत.प्राणी – उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी.
शरीररचनापाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी ह्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते.शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात.
श्वसनश्वसन कल्ल्याद्वारे होते.फुफ्फुसांद्वारे श्वसन होते.
ह्रदय संरचनादोन कप्प्यांचे ह्रदय असते (काही प्रजातींमध्ये तीन कप्पे असतात).प्रामुख्याने तीन कप्प्यांचे ह्रदय असते (मात्र मगरींना चार कप्प्यांचे ह्रदय असते).
प्रजननप्रामुख्याने अंडज असतात व बाह्य फलन होते.बहुतेक प्राणी अंडज असतात. पण काही प्राणी अजीवत (जिवंत पिल्ले जन्माला घालणारे)असतात: अंतर्गत फलन होते.
उदाहरणेरोहु, शार्क, स्टिंग-रे, समुद्र घोडाकासव, सरडा, साप

iii) खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून या आपत्तीचे कोणतेही दोन परिणाम लिहा :

उत्तर :

चित्रांमध्ये दाखवलेली आपत्ती म्हणजे पूर. पूराचे परिणाम म्हणजे पूल कोसळणे, किनारी गावांना पूर येणे, मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान, अन्नाची कमतरता, मातीची धूप, जलजन्य रोगांचा प्रसार आणि इतर साथीचे रोग.

iv) ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही चार मार्ग लिहा.

उत्तर :

i) हास्यमंडळ : दररोज सकाळी सार्वजनिक उद्यानांमध्ये एकत्र येऊन मोठ्याने हसल्याने तणाव कमी होतो. यामुळे आपल्याला मानसिक आरोग्य सुधारल्यासारखे वाटते.

ii) सुसंवाद : मित्र-मैत्रिणी, समवसस्क, भाऊ-बहिणी, शिक्षक व पालक या सर्वाशी सुसंवाद साधणे म्हणजेच आपले मन मोकळे करणे याने ताणतणाव कमी होतो. मित्र, भाऊ-बहिण, शिक्षक, पालक किंवा आपल्या वयाच्या लोकांसोबत आपल्या आनंद आणि दु:ख, मन मोकळे करणे याने तणाव कमी होतो.

iii) लेखन : आपल्या विचारांना शब्दरूप देऊन लिहिणे आणि नकारात्मक विचारांचे विश्लेषण करणे हा तणाव कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरतो.

iv) छंद जोपासणे : वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही आणि रिकामा वेळदेखील सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवावे. त्यामुके नकारात्मक भावना कमी होतात.

v) संगीत : संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यांमुळे आनंद मिळून ताण हलका होतो. संगीतात मन:स्थिती बदलण्याची ताकद असते.

vi) मैदानी खेळ व व्यायाम : मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी खेळांमुळे सुधारते. खेळांमुळे शारीरिक व्यायाम, शिस्त, सामाजिक संवाद, एकजुटीची भावना वाढणे, आणि सामाजिक कौशल्ये विकसित होतात, तसेच तणावही दूर होतो. योगासुद्धा या उपक्रमांचा एक भाग असावा.

iv) खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर :

3. खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा :

i) आनुवंशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून आनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा.

उत्तर :

एका जनक पिढीतील जैविक वैशिष्ट्ये जनुकांच्या माध्यमातून पुढील संततीच्या पिढीत हस्तांतरित होण्याच्या प्रक्रियेला आनुवंशिकता असे म्हणतात.

आनुवंशिक बदल घडण्यामागील कारणे :

i) उत्परिवर्तन : एखाद्या कारणामुळे अचानकपणे जनक पिढीच्या DNA मध्ये बदल घडून आल्यास, त्यातून आनुवंशिक बदल निर्माण होतात.

ii) जनुकांची सरमिसळ : युग्मकनिर्मितीच्या वेळी घडणाऱ्या अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेदरम्यान जनुकांची अदलाबदल व सरमिसळ होते, ज्यामुळेही आनुवंशिक बदल संभवतात.

iii) नैसर्गिक निवड : एखाद्या लोकसंख्येमध्ये विशिष्ट लक्षण हे जगण्यासाठी अनुकूल व फायदेशीर ठरत असल्याने, तेच लक्षण पुढे कायम राखले जाते.

iv) आनुवंशिक प्रवाह : छोट्या आकाराच्या लोकसंख्येत घडणाऱ्या आकस्मिक बदलांमुळे, त्या समूहातील आनुवंशिक विविधता कमी होत जाते.

ii) सूत्री पेशीविभाजनाच्या चार अवस्था लिहा आणि कोणत्याही दोन अवस्थांचे स्पष्टीकरण करा.

उत्तर :

कायपेशी (शारीरिक पेशी) तसेच मूलपेशी या दोन्ही प्रकारच्या पेशी सूत्री विभाजन (Mitosis) या प्रक्रियेद्वारे विभागल्या जातात. ही संपूर्ण प्रक्रिया मुख्यतः दोन प्रमुख टप्प्यांत पार पडते – प्रकलविभाजन (केंद्रकाचे विभाजन) आणि परिकलविभाजन (जीवद्रव्याचे विभाजन). यांतील प्रकलविभाजन ही क्रिया पुढील चार अवस्थांमध्ये पूर्ण होते.

अ) पूर्वावस्था : या टप्प्यात गुणसूत्रांचे वलीभवन सुरू होते. मूळतः बारीक धाग्यासारखी दिसणारी गुणसूत्रे आता आखूड होऊन जाड बनतात. प्रत्येक गुणसूत्राच्या दोन अर्धगुणसूत्रांची जोडी स्पष्टपणे दिसू लागते. ताराकेंद्राचे द्विगुणीकरण होऊन ती पेशीच्या परस्परविरुद्ध ध्रुवांकडे सरकतात. त्याचबरोबर केंद्रकावरण व केंद्रिका हळूहळू लुप्त होण्यास सुरुवात होते.

आ) मध्यावस्था : सर्व गुणसूत्रांचे वलीकरण संपूर्णपणे पूर्ण होते, त्यामुळे प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसह ठळकपणे दृश्यमान होते. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय पातळीशी समांतर अशा रचनेत मांडली जातात. दोन्ही ताराकेंद्रांपासून प्रत्येक गुणसूत्राच्या गुणसूत्रबिंदूपर्यंत लवचीक प्रथिनतंतू (तुर्कतंतू) निर्माण होतात. याच अवस्थेत केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते.

इ) पश्चावस्था : तुर्कतंतूंच्या सहाय्याने गुणसूत्रबिंदूंचे विभाजन घडते. प्रत्येक गुणसूत्रातील अर्धगुणसूत्र जोडी एकमेकांपासून विलग होऊन विरुद्ध दिशांना खेचली जाते. अशा प्रकारे विलग झालेली अर्धगुणसूत्रे यापुढे स्वतंत्र गुणसूत्रे (जन्यगुणसूत्रे) बनतात, आणि त्यांची रचना केळीच्या घडासारखी दिसते. या अवस्थेच्या अखेरीस गुणसूत्रांचे दोन समान संच पेशीच्या दोन्ही टोकांना जाऊन पोहोचतात.

ई) अंत्यावस्था : या अंतिम टप्प्यात, पेशीच्या दोन्ही टोकांशी पोहोचलेली गुणसूत्रे पुन्हा उलगडू लागतात आणि पूर्वीसारखी बारीक धाग्यांसारखी होऊन दिसेनाशी होतात. या दोन्ही गुणसूत्र-संचांभोवती नव्याने केंद्रकावरण तयार होते, त्यामुळे एका पेशीत आता दोन स्वतंत्र जन्यकेंद्रके निर्माण होतात, ज्यांमध्ये केंद्रिकाही पुन्हा दिसू लागतात. या टप्प्यात तुर्कतंतू पूर्णतः नाहीसे होतात.

iii) एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर :

अलैंगिक प्रजननाच्या निरनिराळ्या पद्धती विविधसजीवांत आढळतात.

अ) द्विविभाजन : या प्रकारात जनकपेशीचे दोन समान भागांत विभाजन होते. त्यामुळे दोन नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. ज्या वेळी अनुकूल परिस्थिती असते आणू मुबलक अन्न उपलब्ध असते, अशा वेळी या पद्धतीचा वापर केला जातो. जीवाणू, आदिजीव, दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात.

विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये द्वि-विभाजनाचे पुढील प्रकार आहेत.

i) साधे द्विविभाजन – कोणत्याही अक्षातून विभाजन

उदा., अमिबा.

ii) आडवे द्विविभाजन – पॅरामेशियम ‘आडवे द्विभाजन’ यापद्धतीने विभाजित होतो.

उदा., पॅरामेशियम

ii) उभे द्विविभाजन – युग्लीना ‘उभे द्विविभाजन’ या पद्धतीने विभाजित होतो.

उदा., युग्लीना.

आ) बहुविभाजन : प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते, तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. अशा वेळी अमिबा संरक्षक कवच तयार करतात. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते. त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत ते पुटीतच राहतात. ज्या वेळी अनुकूलता असते अशा वेळी पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात.

इ) कलिकायन : किण्व कालिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रथम जनकपेशीत सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार होतात. या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते. दोन नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये शिरतो. कलिकेची योग्य वाढ होते आणि नंतर ती जनकपेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्वपेशी म्हणून वाढू लागते.

iv) औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात ? या विद्युतनिर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही दोन समस्या स्पष्ट करा.

उत्तर :

औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळसा हे प्रमुख जीवाश्म इंधन वापरले जाते. कोळशाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या उष्णता ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करून वीजनिर्मिती साधली जाते.

औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे उद्भवणाऱ्या समस्या :

i) वायुप्रदूषण : कोळसा जळताना कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजनचे ऑक्साइड्स यांसारखे शरीरास हानिकारक व आरोग्यास अपायकारक वायू हवेत सोडले जातात.

ii) सूक्ष्म धूलिकणांचे उत्सर्जन : ज्वलनादरम्यान इंधनाचे बारीक कण वातावरणात मिसळले जातात, आणि या घनरूप कणांमुळे श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

iii) मर्यादित नैसर्गिक साठा : भूगर्भातील कोळशाचे साठे अमर्याद नसून ते ठराविक काळापुरतेच पुरेसे आहेत. त्यामुळे भविष्यात विद्युतनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या उपलब्धतेवर निश्चितच मर्यादा येण्याची शक्यता आहे.

v) मृदुकाय प्राणीसंघातील प्राण्यांच्या शरीराचे तीन वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर :

i) या प्राण्यांचे शरीर मऊ व बुळबुळीत स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना ‘मृदुकाय प्राणी’ असे संबोधले जाते.

ii) प्राणीसृष्टीतील संघांमध्ये आकारमानाच्या दृष्टीने हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा संघ मानला जातो.

iii) हे प्राणी एकतर जलचर असतात किंवा भूचर. जलचर मृदुकाय प्राण्यांपैकी बहुतांश प्राणी समुद्री वातावरणात वास्तव्य करतात, तर काही मोजके प्राणी गोड्या पाण्यातही आढळून येतात.

iv) यांचे शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त, अखंड व मऊ रचनेचे असते. गोगलगायीसारख्या काही अपवादात्मक प्राण्यांव्यतिरिक्त बाकी सर्व मृदुकाय प्राण्यांच्या शरीररचनेत द्विपार्श्व सममिती आढळते. त्यांच्या शरीराची विभागणी प्रामुख्याने डोके, पाय आणि आंतरांग-संहती अशा तीन प्रमुख भागांत केलेली असते.

vi) आम्ल पर्जन्याचे घटक कोणते ? त्याचे पृथ्वीतळावर होणारे कोणतेही दोन दृष्यपरिणाम लिहा.

उत्तर :

आम्ल पर्जन्यामध्ये प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल (H₂SO₄) आणि नायट्रिक आम्ल (HNO₃) यांचे प्रमाण अधिक असते. वातावरणात सोडले जाणारे सल्फर डायऑक्साइड (SO₂) आणि नायट्रोजन ऑक्साइड (NO₂) हे वायू यांच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

अ) माती व जलस्रोतांचे प्रदूषण :

  • आम्ल पर्जन्यामुळे मातीतील कॅल्शियम, मॅग्नेशियमसारखी आवश्यक पोषकद्रव्ये वाहून जातात, परिणामी जमिनीचा सुपीकपणा घटतो.
  • त्याचबरोबर तलाव व नद्यांमधील पाण्याची आम्लता वाढते, ज्यामुळे त्यांचे नैसर्गिक pH संतुलन बिघडते आणि त्याचा प्रतिकूल परिणाम जलचर सृष्टीवर होतो.

आ) वास्तू व ऐतिहासिक स्मारकांची हानी :

  • आम्ल पर्जन्यामुळे धातूंना गंज चढतो, तसेच चुनखडी व संगमरवरासारख्या दगडी बांधकामांची झीज होत जाते.
  • ताजमहालसारख्या जगप्रसिद्ध वास्तूंच्या पृष्ठभागावर आम्लाची रासायनिक प्रक्रिया घडल्याने त्यांची हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
  • पुतळे, पूल यांसारख्या धातूनिर्मित संरचनांचीही यामुळे झीज होते.

vii) खालील शब्दकोडे पूर्ण करा :

उत्तर :

1) मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन.

उत्तर :

व्यसनाधिनता

2) या अँप्पमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता.

उत्तर :

फेसबुक

3) ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय.

उत्तर :

गायन

4) ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक.

उत्तर :

सात्त्विकआहार

viii) तुम्ही ऐकलेल्या एका आपत्तीचे कारण, परिणाम आणि केलेली उपाययोजना लिहा.

उत्तर :

आपत्ती : पूर

पूर ही निसर्गामध्ये वारंवार घडणारी एक आपत्ती असून, तिच्यामुळे जीवितहानी व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

i) पूर उद्भवण्यामागील कारणे :

अ) नैसर्गिक कारणे :

a) अतिवृष्टी : अल्पावधीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी काठ ओलांडून वाहू लागते.

b) वादळे व चक्रीवादळे : प्रचंड वेगाचे वारे आणि सोबत होणारा जोरदार पाऊस यांमुळे सागरकिनाऱ्यालगतच्या प्रदेशांत पूरस्थिती उद्भवते.

c) हिमनद्यांचे वितळणे : यामुळे नद्यांतील पाण्याची पातळी वाढते आणि पूर येण्यास कारणीभूत ठरते.

d) त्सुनामी : समुद्रकिनाऱ्यावरील भागांत मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होते.

आ) मानवनिर्मित कारणे :

a) वृक्षतोड व जंगलांचा ऱ्हास : यामुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता घटते आणि पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढते.

b) बेशिस्त शहरीकरण : अपुऱ्या क्षमतेचे गटार व जलनिस्सारण व्यवस्थेमुळे पाणी साचून राहते.

c) धरणांचे अयोग्य व्यवस्थापन : धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास तीव्र स्वरूपाचा पूर येऊ शकतो.

d) नदीकाठावरील अतिक्रमण : नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहमार्गात अडथळे निर्माण झाल्याने पूरपरिस्थिती उद्भवते.

ii) पुरामुळे होणारे परिणाम :

अ) जीवित व मालमत्तेची हानी : नागरिक बेघर होतात आणि पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात मोडतोड होते.

आ) जलजन्य आजारांचा प्रसार : दूषित पाण्यामुळे कॉलरा, विषमज्वर यांसारखे आजार पसरण्याची शक्यता वाढते.

इ) शेतीपिकांची नासाडी : त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा तसेच आर्थिक नुकसान सोसावे लागते.

ई) मृदेची धूप : परिणामी जमिनीचा सुपीकपणा कमी होतो.

उ) निर्वासन : अनेक कुटुंबांना आपली घरे सोडावी लागतात आणि त्यांच्या पुनर्वसनाची आवश्यकता भासते.

iii) पूर नियंत्रणासाठी उपाययोजना :

अ) प्रतिबंधात्मक उपाय :

a) वृक्षारोपण : मोठ्या प्रमाणावर झाडे लावल्यास मृदेची धूप रोखता येते.

b) धरणनिर्मिती : नद्यांच्या पाण्यावर नियंत्रण ठेवून पूर टाळता येतो.

c) सुयोग्य जलनिस्सारण व्यवस्था : शहरी भागांतील अतिरिक्त पाणी सुरळीत वाहून जाण्यास मदत होते.

d) पूर्वसूचना व सतर्कता प्रणाली : नागरिकांना अगोदरच सतर्क केल्याने पुराचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.

आ) पूरानंतर घ्यावयाच्या उपाययोजना :

a) मदत व पुनर्वसन कार्य : बाधित नागरिकांना अन्न, निवारा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

b) पायाभूत सुविधांची पुनर्उभारणी : रस्ते, पूल, इमारती यांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली जाते.

c) आरोग्य व स्वच्छताविषयक उपाय : शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, जेणेकरून आजारांचा प्रादुर्भाव रोखता येईल.

4. खालीलपैकी कोणत्याही एक प्रश्नाचे उत्तर लिहा :

i) जैवविविधता म्हणजे काय ? जैवविविधता संवर्धनाचे चार उपाय लिहा.

उत्तर :

i) जैवविविधता ही स्वत: दोन शब्दांचे मिश्रण आहे, जैव (जीवन) आणि विविधता (विविधता). सोप्या शब्दांत सांगायचे तर, जैवविविधता म्हणजे विशिष्ट भौगोलिक प्रदेशात आढळणाऱ्या जीवांची संख्या आणि विविधता. ती वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांच्या विविधता, त्यांच्यात असलेले जनुके आणि ते तयार करणाऱ्या परिसंस्थांना सूचित करते. ती पृथ्वीवरील सजीवांमधील परिवर्तनशीलतेशी संबंधित आहे, ज्यामध्ये प्रजातींमधील आणि परिसंस्थांमधील आणि त्यांच्यामधील परिवर्तनशिलतेचा समावेश आहे.

पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल :

ii) दुर्मीळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे .

iii) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे.

iv) काही क्षेत्रे ‘राखीव जैवविभाग’ म्हणून घोषित करणे.

v) विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे.

vi) प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.

vii) पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे.

ii) मूळपेशी म्हणजे काय ? मूळपेशींचे चार उपयोग स्पष्ट करा.

उत्तर :

i) स्त्रीयुगमक व पुंयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव ‘पेशींचा एक गोळा’ असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींना मूलपेशी म्हणतात.

मूलपेशी पुढील कारणांसाठी उपयोगात येतात :

ii) पुनरुज्जीवित औषध क्षेत्र : याअंतर्गत सेल थेरपी हे तंत्र वापरण्यात येते.

iii) मधुमेह, ह्रदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात (पर्किन्सनचा आजार) इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशी वापरल्या जातात.

iv) अँनीमिया, ल्यूकेमिया, थॅलॅसेमिया अशा रोगांमध्ये रक्तपेशीची कमतरता भासते. अशा वेळी रक्तपेशी बनवण्यासाठी मूलपेशी वापरल्या जातात.

v) अवयवरोपण या तंत्रात मूलपेशींपासून अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. उदा., यकृत, वृक्क (किडनी) असे अवयव निकामी झाल्यास त्यांच्या जागी सुदृढ अवयव रोपण करावे लागते. तेव्हा या पेशींचा फायदा होतो.

Leave a Comment