जैवतंत्रज्ञानाची ओळख स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान

1. खालील प्रत्येक विधान चूक आहे. या विधानांतील एक किंवा दोन शब्द बदलून ती बरोबर करून पुन्हा लिहा.
अ. श्वसनमार्गामध्ये सरल पट्टकी अभिस्तर ऊती असते.
उत्तर :
श्वसनमार्गामध्ये सरल रोमक अभिस्तर ऊती असते.
आ. वृक्कांमध्ये ग्रंथीमय अभिस्तर ऊती असते.
उत्तर :
वृक्कांमध्ये घनाभरूप अभिस्तर ऊती असते.
इ. हरितऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते.
उत्तर :
वायूऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते.
ई. पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात.
उत्तर :
अपट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात.
ए. दृढ ऊतीमध्ये हरितद्रव्य असते.
उत्तर :
हरित ऊतीमध्ये हरितद्रव्य असते.
2. गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा.
अ. जलवाहिनी, रसवाहिनी, दृढऊती, विभाजी ऊती.
उत्तर :
विभाजी ऊती
कारण : विभाजी ऊतीमध्ये सतत पेशीविभाजन होत राहते, तर इतर ऊतीमधील पेशीविभाजन क्षमता संपलेली असते.
आ. अभिस्तर, स्नायूतंतू, चेतातंतू, अपित्वचा
उत्तर :
अपित्वचा
कारण : इतर तीनही वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती आहेत.
अपित्वचा हा वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या पेशींचा बाह्य स्तर आहे.
इ. कास्थी, अस्थी, स्नायूरज्जू, ह्रदय स्नायू
उत्तर :
ह्रदय स्थायू
कारण : इतर संयोजी ऊतीचे प्रकार आहेत तर ह्रदय स्नायूऊतीचा प्रकार आहे.
3. खालील ऊतींची नावे लिहा.
अ. तोंडाच्या आतील स्तरातील ऊती
उत्तर :
सरल पट्टकी अभिस्तर
आ. स्नायू व अस्थी यांना जोडणारी ऊती
उत्तर :
स्नायूरज्जू
इ. वनस्पतींची ऊंची वाढवणारी ऊती
उत्तर :
प्ररोह विभाजी ऊती
ई. खोडाचा घेर वाढविणारी ऊती
उत्तर :
पार्श्व विभाजी ऊती
4. फरक लिहा.
वनस्पतींमधील सरल ऊती व जटील ऊती
उत्तर :
| वनस्पतींमधील सरल ऊती | वनस्पतींमधील जटील ऊती |
|---|---|
| सरल ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. | जटील ऊती अनेक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. |
| सरल ऊती मध्ये मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती असतात. | जटील ऊती मध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी असतात. |
| हे वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये आढळते. | ही केवळ वनस्पतीच्या वहन संस्थेशी संबंधित भागांमध्ये आढळते. |
| या ऊती अनेक कार्य करतात जसे की मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवण इत्यादी. | या ऊती प्रामुख्याने अन्न व पाण्याच्या वहनाचे कार्य करतात. |
5. टीपा लिहा.
अ. विभाजी ऊती
उत्तर :
i) वनस्पतींच्या ठरावीक भागांतच असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे त्या भागांतच वाढ सुरू असते.
ii) ह्या ऊतीच्या पेशींत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशीभित्तिका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात.
iii) या पेशींमध्ये बहुदा रिक्तिका नसतात. या पेशी अतिशय क्रियाशील असतात.
iv) वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे.
विभाजी ऊती कोणत्या भागात आहे यानुसार तिचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात.
| स्थान | कार्य |
|---|---|
| प्ररोह विभाजी ऊती : मूळ व खोडांच्या टोकाशी असतात. | मूळ व खोडाची लांबी वाढविणे. |
| आंतरीय विभाजी ऊती : पानांच्या देठाच्या व फांद्यांच्या तळाशी | फांद्यांची वाढ करणे, पाने व फुलांची निर्मिती करणे. |
| पार्श्व विभाजी ऊती : मूळ व खोडाच्या पार्श्व भागात | मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवणे. |
आ. जलवाहिनी
उत्तर :
जलवाहिनी ही जटिल स्थायी ऊती आहे.
वैशिष्ट्ये : जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेल्या आहेत.
पेशींचे प्रकार : वाहिनिका, वाहिन्या व तंतू-मृत पेशी जलवाहिनी मूल ऊती-जिवंत पेशी
कार्य : एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी रचना असते, पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेनेच करतात.
इ. पट्टकी स्नायू
उत्तर :
i) पट्टकी स्नायूंच्या पेशी या लांबट, दंडगोलाकार, अशाखीय व बहुकेंद्रकी पेशी असतात.
ii) या स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात. ही स्नायू हाडांना जोडलेले असल्याने यांना ‘कंकाल स्नायू’ म्हणतात.
iii) या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून यांना ऐच्छिक स्नायूही म्हणतात.
iv) हातपाय हलवणे, धावणे, बोलणे ह्या हालचाली घडवून आणणारे स्नायू.
ई. शेतीपूरक व्यवसाय
उत्तर :
i) पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका-पालन असे शेतीपूरक व्यवसाय आहेत.
ii) शेतीतील पिकांचे उत्पादन घेतानाच पूरक उत्पन्न मिळावे म्हणून शेतीपूरक व्यवसाय घेतले जातात.
iii) शेतीपूरक व्यवसायाने आर्थिक लाभ आणि स्वयंपूर्णतेकडे जाता येते.
उ. जनुकीय अभियांत्रिकी
उत्तर :
i) जैवतंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे.
ii) या तंत्रज्ञानाचा वापर करून नायट्रोजनयुक्त जमिनीचा क्रम बदलला जाऊ शकतो.
iii) या तंत्राद्वारे, सजीवांच्या जनुकांमध्ये कृत्रिम पद्धतीने बदल केले जातात त्याद्वारे विविध उपयोगी गुणधर्म त्यांना प्रदान केले जातात.
iv) नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियाचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, कूर्चा तयार करणे यासाठी प्रयोगशाळांमध्ये याचा वापर केला जातो.
ऊ. रेशीम उद्योग
उत्तर :
i) रेशीम उत्पादनासाठी ‘बॉम्बिक्स मोरी’ प्रजातीच्या किड्यांचे पालन केले जाते.
ii) या किड्यांचा विकास चार टप्प्यांमध्ये होतो: अंडी, अळी, कोश आणि पतंग.
iii) मादी किड्याद्वारे टाकलेल्या हजारो अंड्यांना कृत्रिम पद्धतीने उबवले जाते.
iv) या अंड्यांमधून निघालेल्या अळ्यांना तुतीच्या झाडांवर सोडण्यात येते.
v) अळ्यांचे पोषण तुतीच्या पानांद्वारे होते.
vi) जेव्हा ते सुमारे 3-4 आठवडे पाने खातात, त्यानंतर ते तुतीच्या फांदीकडे जातात.
vii) अळ्यांच्या लाळग्रंथीमधून निघणारा स्त्राव हा रेशमी तंतू निर्माण करतो. अळ्या या तंतूचा वापर करून स्वत:भोवती गुंफून करून एक रेशीमकोष तयार करतात.
viii) कोषाचे पतंगात रूपांतर होण्याच्या दहा दिवसांपूर्वीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात.
ix) या उकळत्या पाण्याच्या परिणामाने कोषातील अळी मरतात आणि रेशीमचे तंतू मुलायम होतात.
x) या तंतूंना सोडवून त्यांचे प्रक्रियांतर्गत रूपांतरण करून रेशीम धागा तयार केला जातो. या रेशीम धाग्यांपासून विविध प्रकारची वस्त्रे बनविली जातात.
6. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्येकृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात.
i) पिकांच्या डी. एन. ए. मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण निर्माण केले जात आहेत. या प्रजातींमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात.
ii) काही नैसर्गिक प्रजाती वातावरणीय ताण सहन करू शकत नाहीत. तरीही GM प्रजाती मात्र सातत्याने बदलणारे तापमान, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात.
iii) GM प्रजातीमध्ये उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता ह्या प्रजातींमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो.
iv) GM प्रजातीच्या बियाणांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषणमूल्यांत वाढ होते.
7. जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात ? का ?
उत्तर :
i) जैवतंत्रज्ञानामध्ये वापरली जाणारी दोन मुख्य तंत्रे आहेत – जनुकीय अभियांत्रिकी आणि ऊती संवर्धन.
ii) मानवाच्या फायद्यासाठी कृत्रिम आनुवांशिक बदल आणि संकरीकरणाद्वारे सजीवांमध्ये सुधारणा करण्यासाठी या तंत्रांचा वापर केला जातो.
iii) त्याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियाचे रोपण कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, कूर्चा तयार करणे या क्षेत्रात होत आहे.
8. ‘कृषी पर्यटन’ या विषयावर वर्गात चर्चा करून तुमच्या गावाशेजारी असणाऱ्या कृषी पर्यटन स्थळाविषयी प्रकल्प लिहा. तो वर्गात गटामध्ये सादर करा.
उत्तर :
i) कृषी पर्यटनामध्ये, ऊती संवर्धनाने फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे, भाज्या, औषधी वनस्पती, यांची मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती केली जाते.
ii) त्याचपैकी कही प्रकारची झाडे पूर्णपणे वाढवून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र तयार करता येते.
iii) पुरेशा जमिनीची उपलब्धता असल्यास ‘कृषी पर्यटन केंद्र’ हा नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे.
iv) कृषी पर्यटन केंद्रामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो :
- आंबा, चिकू, पेरू, नारळ, सीताफळ व इतर काही प्रादेशिक फळझाडे
- सावली देणारे व नयनरम्य देशी-विदेशी वृक
- शोभेची झाडे व फुलझाडे
- फुलपाखरांची बाग
- औषधी वनस्पतींची बाग
रासायनिक खते/कीडकनाशके यांचा वापर न करता वाढवलेल्या (सेंद्रिय) भाज्या, फळे अशी आकर्षणे असलेल्या ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी रोपे, भाज्या, फळे यांची विक्री अधिक फायदा देऊ शकते.
प्रकल्पाचा मूळ भाग :
1. कृषी पर्यटन स्थळाची माहिती :
नाव : (उदा. कृषी सृष्टी फार्म)
स्थान : गावाजवळील (गावाचे नाव व अंतर)
प्रमुख आकर्षण :
- नैसर्गिक सौंदर्य
- फळबाग (उदा. आंबा, पेरू)
- शेतीचे प्रत्यक्ष प्रदर्शन (भातशेती, भाजीपाला लागवड)
- पारंपरिक खाद्यपदार्थ
2. देण्यात येणाऱ्या सुविधा :
- निवासी व्यवस्था (मड हाउस किंवा टेंट हाउस)
- स्थानिक पदार्थ चाखण्याची संधी
- बैलगाडीची सफर
- शेतीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव (उदा. नांगरणी, पेरणी)
- सेंद्रिय उत्पादन खरेदीची सोय
3. आर्थिक महत्त्व :
- गावातील लोकांसाठी रोजगार निर्मिती.
- स्थानिक उत्पादने (फळेभाजीपाला) विक्रीतून उत्पन्न.
- पर्यटकांमुळे ग्रामीण संस्कृतीला चालना.
4. अडचणी :
- पायाभूत सुविधा कमी असणे.
- पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज.
- पर्यटनासाठी आवश्यक जाहिरात व जनजागृती अभाव.
5. उपाययोजना :
- शासनाच्या कृषी पर्यटन योजनांचा लाभ घेणे.
- स्थानिक शेतकऱ्यांचे गट तयार करून एकत्रित प्रयत्न करणे.
- सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार आणि प्रसार करणे.
- स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणावर भर देणे.
9. ऊती म्हणजे काय हे सांगून ऊती संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात.
i) सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात.
ii) आजकाल ऊती संवर्धन तंत्राने एका पेशीपासून किंवा ऊतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो.
iii) ऊती संवर्धनासाठी आवश्यक पोषक व ऊर्जा पुरविणारे एखादे द्रवरूप, स्थायुरूप किंवा अगारपासून तयार केलेले जेलीसारखे माध्यम वापरले जाते.
iv) त्याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियाचे रोपण, कर्करोग संशोधन, इ. मध्ये केला जातो.
10. मेंढी हे पशुधन आहे. या वाक्याच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण लिहा.
उत्तर :
i) भारतात शेळ्या-मेंढ्यांचा पशुपालनासाठी वापर केला जातो आणि कारण त्यांच्याकडून मांस व लोकर मिळते.
ii) भारतात, शेळी आणि मेंढीचे मांस विशेषत: उद्योगात वापरले जाते आणि मेंढीच्या लोकरीला भारतात मोठी मागणी आहे.
iii) या प्राण्यांचा वापर खत मिळविण्यासाठी देखील केला जातो आणि त्यांना मुख्यत: शेतात चरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. ज्यामुळे शेतातील नैसर्गिक शेतीला चालना मिळते.
iv) मेंढ्यांच्या शेतीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत आणि त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते.
v) मेंढरांचा आकार लहान असतो, त्यामुळे घरातील स्त्रियाही त्यांचे पालन सहज करू शकतात. त्यामुळे मेंढीपालन ही पशुधन म्हणून महत्त्वाचे आहे.