वितरणाचे नकाशे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. १. खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
अ. वितरणाच्या नकाशांच्या मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
कारण – i) आलेख किंवा आकृत्याद्वारे दर्शविण्यात येणारी आकडेवारी नकाशा शिवायही दाखविता येते परंतु या आकडेवारीचे स्थानिक वितरण नकाशाद्वारे व्यक्त केले तर ते खऱ्या अर्थाने भौगोलिक वितरण दर्शविते.
ii) वितरणाच्या नकाशांमुळे भौगोलिक घटकांचा त्या स्थानिय वितरणावर कसा परिणाम झाला आहे हे यातून स्पष्ट होते. म्हणून वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.
आ. क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
कारण – i) या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छापा किंवा छटांनी दाखवली जाते.
ii) हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो.
iii) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतली जाते. त्यासाठी त्यांचे साधारणत: ५ ते ७ गटांत वर्गीकरण केले जाते व प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात. यावरून हे सिद्ध होते की क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.
इ. क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
कारण – i) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. त्यानंतर त्यांचे साधारणत: ५ ते ७ गटांत वर्गीकरण करतात.
ii) प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात.
iii) ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात. म्हणजेच क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलतात.
ई. क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
कारण – i) क्षेत्रघनी नकाशा लोकसंख्येची घनता दाखविण्यासाठी वापरतात.
ii) तर समघनी नकाशा उंची दाखविण्यासाठी वापरतात.
iii) समघनी नकाशात उंची दाखविण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो. तर क्षेत्रघनी नकाशात रंगछटांचा उपयोग केला जातो.
उ. लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
लोकसंख्येचे वितरण दाखविण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात.
कारण – i) दिलेल्या भौगोलिक घटकाच्या आकडेवारीनुसार एका टिंबाची किंमत ठरवावी लागते. दिलेल्या आकडेवारीनुसार ज्या प्रदेशात संख्यात्मक किंमत कमी असते तेथे टिंबाची संख्या कमी असते.
ii) त्यामुळे लोकसंख्येचे वितरण कोणत्या प्रदेशात जास्त आहे व कोणत्या प्रदेशात कमी आहे याचे नकाशावरून सहज ज्ञान होते.
ऊ. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
कारण – टिंबांद्वारे वितरण दाखवताना टिंबाचे मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्यानुसार टिंबांचे मूल्य ठरवले जाते. म्हणून टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक योग्य प्रमाण असावे.
ए. समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
कारण – समघनी नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जातात.
i) समघनी नकाशा काढताना घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते, जे रेषांमधील अंतर ठरवते.
ii) ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्ये असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते.
iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. म्हणजेच यावरून हे सिद्ध होते की समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करतात.
ऐ. टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
कारण – i) क्षेत्रघनी नकाशा पद्धतीद्वारे भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्टपणे दाखविता येते. तसेच भौगोलिक वितरणही सहज समजते.
ii) एखाद्या भौगोलिक घटकाच्या दाट वितरणाचे व विरळ वितरणाचे प्रदेश सहज लक्षात येतात.
प्रश्न. २. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ. वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.
उत्तर :
वितरणाच्या नकाशाचे उपयोग :
वितरणाच्या नकाशाचा उपयोग एखाद्या घटकांचे एखाद्या प्रदेशातील वितरण दाखवणे हा आहे.
वितरणाच्या नकाशांचे प्रकार
i) टिंब पद्धत : जो घटक प्रदेशांमध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे. टिंब पद्धतीचा नकाशा तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशांमध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच पद्धतीने नकाशात टिंब देऊन वितरण दाखवले जाते. उदा. प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या वितरण इत्यादी.
ii) क्षेत्रघनी पद्धत : या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छापा किंवा छटांनी दाखवली जाते. प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेऊन त्यांचे ५ ते ७ गटांत वर्गीकरण करून प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरला जातो. ते वापरताना वाढत्या मुल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात.
iii) समघनी पद्धत : जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समान समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदा. उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जाते.
आ. समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक.
उत्तर :
| समघनी पद्धत | क्षेत्रघनी पद्धत |
|---|---|
| i) समघनी पद्धतीतील क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. | i) क्षेत्रघनी पद्धतीत प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. |
| ii) समघनी नकाशे तयार करण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर करतात. | ii) क्षेत्रघनी नकाशांसाठी एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. |
| iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. | iii) रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध हे वाढत्या मूल्याप्रमाणे गडद होत जातात. |
| iv) प्रदेशाची उंची, तापमान पर्जन्य दाखविण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. | iv) लोकसंख्येची घनता दाखविण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. |
इ. प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत किंवा क्षेत्रघनी पद्धत उपयुक्त असते. लोकसंख्या या घटकाचे वितरण विलग असते व हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो. मुक्तपणे विखुरलेल्या घटकांसाठी टिंब पद्धत तर ज्या घटकांचे वितरण विलग असते त्यासाठी क्षेत्रघनी पद्धत उपयुक्त ठरते.
टिंब पद्धतीच्या नकाशात एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या हा घटक ज्या तऱ्हेने वितरित झाला आहे, तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन त्याचे वितरण दाखवले जाते. लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे, तर नागरी लोकसंख्या गोलाद्वारे दाखवली जाते.
क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात लोकसंख्येचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. लोकसंख्या वितरणाचे जास्तीत जास्त मूल्य व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन ५ ते ७ गट ठरवले जातात. प्रत्येक गटाचे मूल्य वेगळे असल्यामुळे प्रत्येक गटाच्या मूल्याप्रमाणे वेगवेगळ्या छटांच्या आधारे लोकसंख्येचे उपविभागनिहाय वितरण दाखवले जाते.
प्रश्न. ३. खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल ?
अ. जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.
उत्तर :
क्षेत्रघनी नकाशा पद्धत
आ. जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण.
उतर :
समघनी नकाशा पद्धत
इ. राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण.
उत्तर :
टिंब नकाशा पद्धत
ई. भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण.
उत्तर :
क्षेत्रघनी नकाशा पद्धत
उ. महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण.
उत्तर :
समघनी नकाशा पद्धत
प्रश्न. ४. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

अ. जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे ?
उत्तर :
जिल्ह्यातील लोकसंख्येने वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे.
आ. दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा.
उत्तर :
कोल्हापूर जिल्ह्यात पूर्व दिशेस लोकसंख्येचे वितरण दाट आहे तर पश्चिम दिशेस लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
इ. सर्वांत मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे ? ते ठिकाण कोणते ?
उत्तर :
सर्वांत मोठा गोल कोल्हापूर (करवीर तालुका) या ठिकाणी आहे. त्याची लोकसंख्या सुमारे वीस लाख इतकी आहे.
ई. सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?
उत्तर :
सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका गगनबावडा हा आहे.