पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान

1. ‘अ’ व ‘ब’ स्तंभाची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा.
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| 1. धोकादायक कचरा | अ. काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी. |
| 2. घरगुती कचरा | आ. रसायने, रंग, राख इत्यादी. |
| 3. जैववैद्यकीय कचरा | इ. किरणोत्सारी पदार्थ |
| 4. औद्योगिक कचरा | ई. वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली |
| 5. शहरी कचरा | उ. बॅडेज, कापूस, सुया इत्यादी. |
उत्तर :
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| 1. धोकादायक कचरा | इ. किरणोत्सारी पदार्थ |
| 2. घरगुती कचरा | ई. वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली |
| 3. जैववैद्यकीय कचरा | उ. बॅडेज, कापूस, सुया इत्यादी. |
| 4. औद्योगिक कचरा | आ. रसायने, रंग, राख इत्यादी. |
| 5. शहरी कचरा | अ. काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी. |
2. दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.
(भौगोलिक, अनुकूलता, हवामान, हवा, वेधशाळा)
अ. जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक ………….. हा आहे.
उत्तर :
जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक हवामान हा आहे.
स्पष्टीकरण : हवामान हा अजैविक घटक आहे. हा घटक पृथ्वीवरील निरनिराळ्या सजीवांची वाढ व विकास यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
आ. कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन ………….. होय.
उत्तर :
कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन हवा होय.
स्पष्टीकरण : वातावरणाची अल्पकाळाची स्थिती म्हणजे हवा होय.
इ. मानवाने कितीही प्रगती केली तरी ……………. चा विचार करावाच लागतो.
उत्तर :
मानवाने कितीही प्रगती केली तरी भौगोलिक अनुकूलते चा विचार करावाच लागतो.
स्पष्टीकरण : काही भाग दाट लोकसंख्येचे असतात, तर काही भाग विरळ लोकसंख्येचे असतात. हे सर्व त्या भागाच्या भौगोलिक अनुकलतेवर अवलंबून असते.
ई. हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना ……………… असे म्हणतात.
उत्तर :
हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना वेधशाळा असे म्हणतात.
स्पष्टीकरण : वेधशाळा ही आधुनिक यंत्रसामग्री व उपकरणांनी सुसज्ज असून तिचा वापर खगोलीय, हवामानविषयक व नैसर्गिक घटनांविषयी निरीक्षणे व नोंदी करण्यासाठी होतो.
3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा ?
उत्तर :
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांना पुढीलप्रमाणे प्रथमोपचार करावा.
i) श्वसनमार्ग : आपद्ग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल, तर डोके उतरत्या स्थितीत धरावे किंवा हनुवटीला वर उचलावे जेणेकरून श्वसनलिकेचा मार्ग खुला राहील.
ii) श्वासोच्छ्वास : जर श्वासोच्छ्वास बंद झालेला असेल, तर आपद्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा.
iii) रक्ताभिसरण : जर आपद्ग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल, तर प्रथम त्या व्यक्तीस दोनदा कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन नंतर छातीवर दोन तळळ्यांनी हात ठेवून ह्रदयावर जोरावा दाब देऊन सोडवा. या दोन्ही क्रिया सुमारे 15 वेळा कराव्यात.
iv) रक्तस्त्राव : जर व्यक्तीला जखम होऊन त्यामधून रक्तस्त्राव सुरू झाला असेल, तर त्या जखमेवर निर्जतुक आवरण ठेवून हाताच्या अंगठ्याने किंवा तळव्याने 5 मिनिटे हलका दाब द्यावा.
v) अस्थिभंग व मणक्यावर आघात : जर आपद्ग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल, तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लाकडी फळ्या उपलब्ध असतील, तर त्या बांधून अचल करण्यासाठी वापर करावा. पाठीवर किंवा मणक्यावर आघात झालेल्या असेल, तर त्या व्यक्तीला कठीण रुग्णशिबिकेवर ठेवावे.
vi) पोळणे/भाजणे : आपद्ग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल, तर भाजलेला भाग किंवा होरपळलेला भाग 10 मिनिटे पाण्याच्या संततधारेखाली धरणे फायदेशीर ठरते.
आ. शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा.
उत्तर :
शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती पुढीलप्रमाणे :
i) कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण : ही कचरा व्यवस्थापनातील पहिली पायरी होय. कचऱ्यावरील पुढील प्रक्रियेसाठी सुका कचरा व ओला कचरा असे वर्गीकरण करणे खुप महत्त्वाचे असते.
ii) कंपोस्टिंग (सेंद्रिय खत) : शिल्लक राहिलेले अन्न, स्वयंपाकघरातील कचरा, भाज्या व फळे यांच्या साली, बागेतील कचरा इत्यादींच्या विघटनाने चांगल्या प्रतीचे खत मिळू शकते.
iii) गांडूळ खत निर्मिती : या पद्धतीत, गांडूळाच्या मदतीने घनकचऱ्याचे विघटन जलद रीतीने केले जाते. गांडूळ खत निर्मितीतून मिळालेले खत हे पोषकद्रव्यांनी समृद्ध असल्याने शेतीसाठी उपयुक्त ठरते.
iv) सुरक्षित भूमीभरणाची पद्धती : या पद्धतीत, मानवी वस्तीपासून दूर अशा सुरक्षित असलेल्या विशिष्ट ठिकाणी कचरा टाकून दिला जातो. अशा ठिकाणी जमिनीवर प्लॅस्टिकचे व चिकण मातीचे आवरण केले जाते, जेणेकरून कचऱ्यातील पाणी जमिनीत मुरत नाही.
v) पायरोलिसिस : ही एक शास्त्रीय पद्धत असून त्यात कचऱ्याचे उच्च तापमानास ज्वलन केले जाते. या पद्धतीत जैववायूपासून विद्युतऊर्जा निर्मिती केली जाते.
vi) भट्टीतील ज्वलन/भस्मीकरण : ही एक औद्योगिक पद्धत असून यात कचऱ्याचे साध्या घन किंवा वायूरूपी अवशेषात रूपांतर केले जाते. या पद्धतीत भट्टीमध्ये कचऱ्याचे उच्च तापमानाला ज्वलन केले जाते. सामान्यपणे जैववैद्यकीय कचऱ्यासाठी ह्या पद्धतीचा उपयोग होतो.
इ. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
i) विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने आता हवामानाचा अंदाज वर्तवणे सोपे झाले आहे.
ii) पूर, भूकंप, चक्रीवादळे इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या काळात परिणामकारक आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी हवामानाचा अंदाज मदतगार ठरतो.
iii) उदाहरणार्थ, 2014 साली आंध्र व ओडिशाच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या अति तीव्रतेच्या ‘हुडहुड’ वादळाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
iv) हवामानाच्या अंदाजानुसार आपण आपत्ती व्यवस्थापनासाठी योग्य ती खबरदारी घेऊ शकतो आणि आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार राहू शकतो.
ई. ई-कचरा घातक का आहे ? याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :
i) निकामी मोबाइल फोन्स, टीव्ही संच, संगणक, म्युझिक सिस्टिम, ट्रांझिस्टर्स इत्यादींचा इ-कचऱ्यात समावेश होतो.
ii) इ-कचरा धोकादायक असून त्यात शिसे, बेरिलिअम, पारा व कॅडमिअम यासारखे धोकादायक जड धातू असतात.
iii) जड धातू व अविघटनशील असतात, त्यामुळे हे पर्यावरणात बराच काळ साचून राहतात.
iv) इ-कचऱ्याचे ज्वलन व भूमीभरण सभोवतालच्या पर्यावरणासाठी धोकादायक असते.
उ. घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमच्या वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल ?
उत्तर :
घनकचरा व्यवस्थापनामध्ये व्यक्तिगत सहभाग खालीलप्रमाणे नोंदवता येईल :
i) कचरा कचराकुंडीत टाकणे.
ii) वस्तूची दुरुस्ती व देखभाल करून त्यांचा अधिक काळ वापर करणे.
iii) वाचून झालेली पुस्तके व मासिके गरजूंना देणे.
iv) प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडाच्या पिशव्या वापरणे.
v) टिश्यू पेपर, कागदी थाळ्या यांचा वापर कमीतकमी करणे.
vi) Reduce (कचरा कमी करणे), Reuse (वस्तूंचा पुनर्वापर), Recycle (कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण) या 3 R मंत्राचा वापर करणे.
vii) इतरांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणे व त्यांना कचरा व्यवस्थापन कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे.
4. टीपा लिहा.
हवामानशास्त्र, हवामानाचे घटक, मान्सून प्रारूप, औद्योगिक कचरा, प्लॅस्टिक कचरा, प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
उत्तर :
हवामानशास्त्र
i) हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामान शास्त्र होय.
ii) यामध्ये हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांच्या अभ्यासाचा समावेश होतो.
iii) या हवामानविषयक अभ्यासाला पायाभूत मानून भविष्यातील हवामानाबाबत अंदाज व्यक्त केले जातात.
iv) ही माहिती सर्वसामान्य जनता शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना उपयोगी ठरते.
हवामानाचे घटक
i) एखाद्या विशिष्ट ठिकाणाचे हवामान अनेक घटकांवर अवलंबून असते, त्या घटकांनाच हवामानाचे घटक असे म्हणतात.
ii) वाऱ्याची दिशा व गती, तापमान, हवेचा दाब, पर्जन्यवृष्टी, आर्द्रता, सूर्यप्रकाश, ढग इत्यादींचा हवामानाच्या घटकांमध्ये समावेश होतो.
iii) विमानांसाठी धावपट्ट्या बनवणे, बंदरनिर्मिती, मोठे पूल उभारणे आणि अतिउंच इमारती बांधणे इत्यादी योजनांमध्ये अशा हवामान घटकांचा विचार केला जातो.
मान्सून प्रारूप
i) भारतातील मान्सूनच्या मोसमात पर्जन्यविषयक अचूक अंदाज वर्तवण्यासाठी मान्सून प्रारूपे तयार केली जातात.
ii) भारतीय हवामान खाते, IMD (Indian Meterological Department) व IITM (Indian Institute of Tropical Meterology) या संस्था मान्सून प्रारूपे तयार करणे व ते विकसित करण्याकरता काम करतात.
iii) 1990 च्या दशकात डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते.
iv) संख्यात्मक प्रारूप/गणितीय मॉडेल, समुच्चित प्रारूप, सांख्यिकी प्रारूप असे मान्सून प्रारूपांचे काही प्रकार आहेत.
औद्योगिक कचरा
i) औद्योगिक कचरा हा वेगवेगळ्या कारखान्यांतून उद्योगधंद्यांतून निर्माण आलेला कचरा असतो.
ii) या कचऱ्यात रसायने, तेल, गाळ, रंग, राख, धातू इत्यादींचा समावेश होतो.
iii) हा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे व तो अतिशय हानिकारक आहे.
iv) औद्योगिक केंद्रातून बाहेर पडणारी विषारी द्रावके ही जवळच्या प्राण्याच्या साठ्यात सोडली जातात, ज्यामुळे जलप्रदूषण होते.
v) कारखान्यांतून बाहेर पडणारे अनेक विषारी वायू हवेत सोडले जातात, ज्यामुळे हवेचे प्रदूषण होते.
प्लॅस्टिक कचरा
i) घरगुती कचरा जसे, कॅरीबॅग्ज, प्लॅस्टिकच्या पिशव्या, डबे, वेष्टन साहित्य इत्यादींमुळे प्लॅस्टिक कचरा तयार होतो.
ii) प्लॅस्टिक कचऱ्यात घातक रसायने असतात.
iii) या कचऱ्याचे जीवाणूंकडून विघटन होऊ शकत नाही, म्हणून हा अविघटनशील कचरा आहे.
iv) प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळणे आवश्यक आहे.
प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
i) श्वसनमार्ग : जर आपद्ग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर त्याचे डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्यामुळे श्वासनलिका खुली राहते.
ii) श्वासोच्छवास : श्वासोच्छवास बंद झालेला असेल तर आपद्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. यात मदतकर्त्याने आपद्ग्रस्ताच्या तोंडावर तोंड ठेवून आपद्ग्रस्ताच्या फुफ्फुसांमध्ये हवा सोडायची असते.
iii) रक्ताभिसरण : जर आपद्ग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर प्रथम त्या व्यक्तीस दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा नंतर छातीवर दोन तळव्यांनी हात ठेवून ह्रदयावर जोराचा दाब देऊन सोडणे ही प्रक्रिया सुमारे 15 वेळा करावी. यामुळे आपद्ग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण पुन्हा सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते.
5. हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर :
i) हवामान मानवी जीवनपद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असते.
ii) एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनपद्धती निश्चित करण्यास तेथील हवामान कारणीभूत ठरते.
उदा. जगातील वेगवेगळ्या प्रदेशातील घरांची रचना त्या प्रदेशातील हवामानाप्रमाणेच ठरवली जाते.
iii) सागरजलाची क्षारता, सागरप्रवाहांची निर्मिती व जलचक्रांची निर्मिती इत्यादी सर्व बाबींवर हवामानाच्या घटकांचा परिणाम होतो.
iv) भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे कार्य, मातीची निर्मिती आणि संपन्नता अशा बऱ्याच प्रक्रिया हवामानातील घटकांमुळे प्रभावित होत असतात.
v) मातीत असणाऱ्या जीवाणूंची सेंद्रिय पदार्थांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असते. ही प्रक्रिया हवामानातील विविध घटकांवर अवलंबून असते.
6. रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
i) रुग्णाचे वहन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती :
पाळणा पद्धत, पाठंगळीला मारणे, मानवी कुबडी पद्धत, खेचून नेणे किंवा उचलून नेणे, दोन हातांची बैठक, चार हातांची बैठक, स्ट्रेचर.
ii) या पद्धतींची अंमलबजावणी करताना रुग्णाला कोणतीही इजा होणार नाही याची खबरदारी घेतली जाते.
iii) जर रुग्ण घायाळ असेल, तर त्याला आरामदायक अवस्थेत बसवावे. मार लागलेला भाग नेहमी उंचावून किंवा उतरत्या स्थितीत ठेवावा.
iv) जर रुग्ण जखमी असेल, तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून हाताच्या अंगठ्याचा किंवा तळव्याचा हलका दाब 5 मिनिटे द्यावा.
v) जर रुग्णाचे हाड मोडले असेल, तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करावे.
7. फरक स्पष्ट करा.
अ. हवा व हवामान
उत्तर :
| हवा | हवामान |
|---|---|
| i) वातावरणाच्या तत्कालीन अस्थायी स्थितीला हवा म्हणतात. | i) वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. |
| ii) हवेत अल्पकाळात बदल होतात. | ii) हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. |
| iii) एका प्रदेशातीलही हवेत सातत्य नसते. | iii) हवामान एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते. |
| iv) हवा सतत बदलत असते. | iv) हवामान सतत बदलत नाही. |
आ. विघटनशील व अविघटनशील कचरा
उत्तर :
| विघटनशील कचरा | अविघटनशील कचरा |
|---|---|
| i) या कचऱ्याचे सहज विघटन होते. | i) या कचऱ्याचे सहजासहजी विघटन होत नाही. |
| ii) याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत होते. | ii) याचे विघटन होण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करावा लागतो. |
| iii) हा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साचून राहत नाही. | iii) हा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साचून राहू शकतो. |
| iv) उदा. वाया गेलेले अन्न, फळे, कागद इत्यादी | iv) उदा. प्लॅस्टिक, रबर, काच, धातू इत्यादी. |