उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्याय

उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान

1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधाने पूर्ण व त्याचे स्पष्टीकरण द्या.

(मायकोटाॅक्झीन्स, कलिकायन, रायझोबिअम)

अ. यीस्ट ……………. पद्धतीने अलैगिक प्रजनन करते.

उत्तर :

यीस्ट कलिकायन पद्धतीने अलैगिक प्रजनन करते.

स्पष्टीकरण : अनुकूल परिस्थिती मिळताच कलिकायन पद्धतीने यीस्ट भराभर वाढते.

आ. बुरशीजन्य विषारी रसायनांना ……………. म्हणतात.

उत्तर :

बुरशीजन्य विषारी रसायनांना मायकोटाॅक्झीन्स म्हणतात.

स्पष्टीकरण : अन्नातील पोषणद्रव्ये शोषून घेऊन स्वत:ची वाढ करताना बुरशीकडून जी विषारी रसायने अन्नात सोडली जातात त्यांना मायकोटाॅक्झीन्स म्हणतात.

इ. शिंबावर्गीय वनस्पती …………….. मुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.

उत्तर :

शिंबावर्गीय वनस्पती रायझोबिअम मुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.

स्पष्टीकरण : रायझोबिअम हे जीवाणू शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांत सहजीवी म्हणून राहतात. ही जीवाणू नायट्रोजनच्या जैविक स्थिरीकरणाने त्याचे रूपांतर संयुगांत करतात. त्यामुळे वनस्पतींना पोषक द्रव्ये मिळतात. परिणामी वनस्पती जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.

2. खालील पदार्थांमध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव आढळतात. त्यांची नावे लिहा.

दही, पाव, कडधान्यांच्या मुळांवरील गाठी, इडली, डोसा, खराब झालेली बटाट्याची भाजी.

उत्तर :

पदार्थआढळणारा सूक्ष्मजीव
1) दहीलॅक्टोबॅसिलाय
2) पावयीस्ट
3) कडधान्यांच्या मुळांवरील गाठीरायझोबिअम
4) इडलीयीस्ट
5) डोसायीस्ट
6) खराब झालेली बटाट्याची भाजीक्लाॅस्ट्रीडिअम

3. वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे ?

अ. न्युमोनिया, घटसर्प, कांजिण्या, कॉलरा.

उत्तर :

कांजिण्या

कारण : कांजिण्या विषाणू संसर्गाने होतात, तर इतर सर्व आजार जीवाणूंमुळे होतात.

आ. लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम, किण्व, क्लाॅस्ट्रीडिअम.

उत्तर :

क्लाॅस्ट्रीडिअम

कारण : क्लाॅस्ट्रीडिअम हा उपद्रवी जीवाणू असून इतर सर्व उपयुक्त जीवाणू आहेत.

इ. मुळकूज, तांबेरा, रूबेला, मोझॅइक.

उत्तर :

रुबेला

कारण : रुबेला हा मानवाला होणारा विषाणूजन्य रोग आहे, तर इतर सर्व वनस्पतींचे रोग आहेत.

4. शास्त्रीय कारणे लिहा.

अ. उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.

उत्तर :

i) उन्हाळ्यातील तापमान सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक असते.

ii) अशावेळी वरण किंवा इतर अन्नपदार्थ खूप काळ तसेच ठेवल्यास त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते.

iii) सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळे वरणात किण्वनाची प्रक्रिया होऊन त्यात कार्बन डाय-ऑक्साइड ची निर्मिती होते. त्यामुळे वरणावर फेस जमा झालेला असतो.

आ. कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.

उत्तर :

i) डांबराच्या गोळ्यांमध्ये नॅफ्थलिन हा रासायनिक पदार्थ असतो.

ii) नॅफ्थलिनला विशिष्ट असा उग्र दर्प असतो, त्यामुळे बुरशी आणि जीवाणूंची वाढ रोखली जाते व कपडे सुरक्षित राहतात.

म्हणून कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.

5. कवकजन्य रोगाच्या प्रसाराची माध्यमे व प्रतिबंधक उपाय लिहा.

उत्तर :

नायटा, गजकर्ण, त्वचारोग यांसारख्या कवकजन्य रोगांचा प्रसार रोग्याच्या संपर्कात राहिले तर होतो. रोग्याच्या वापरलेल्या वस्तू, कपडे, अंथरूण-पांघरूण इत्यादीमधून कवकाचे तंतू किंवा बीजाणू संक्रमित झाले की रोगाचाही प्रसार होतो. वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी योग्य नसणे या गोष्टींमुळे कवकजन्य रोग वेगाने पसरले जातात त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

6. जोड्या जुळवा.

‘अ’ समूह‘ब’ समूह
1. रायझोबिअमअ. अन्न विषबाधा
2. क्लाॅस्ट्रिडीअमआ. नायट्रोजन स्थिरीकरण
3. पेनीसिलिअमइ. बेकरी उत्पादने
4. यीस्टई. प्रतिजैविक निर्मिती

उत्तर :

‘अ’ समूह‘ब’ समूह
1. रायझोबिअमआ. नायट्रोजन स्थिरीकरण
2. क्लाॅस्ट्रिडीअमअ. अन्न विषबाधा
3. पेनीसिलिअमई. प्रतिजैविक निर्मिती
4. यीस्टइ. बेकरी उत्पादने

7. उत्तरे लिहा.

अ. लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात ? का ?

उत्तर :

i) लहान मुलांना पोलिओ लस, गोवर आणि कांजिण्याची लस, काविळीची लस, क्षयरोग (BCG) ल, घटसर्प लस, इन्फ्ल्युइन्झा इत्यादी लसी विशिष्ट वेळापत्रकानुसार दिल्या जातात.

ii) लहान बालकांची रोगप्रतिकार शक्ती अतिशय कमकुवत असते. त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढावी व संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना लस्सी दिल्या जातात.

आ. लस कशी तयार केली जाते ?

उत्तर :

i) प्रयोगशाळेत जैव तंत्रज्ञानाचा उपयोग करून जीवाणूंच्या साहाय्याने ठरावीक रोगाची लस तयार केली जाते. त्यासाठी विशिष्ट रोगाच्या जंतूंतील जनुके आणि डीएनए यांची रचना समजून घेतली जाते. या माहितीच्या आधारे त्याच्यावर प्रतिबंध करू शकतील अशी प्रथिने तयार केली जातात. या प्रयोगाद्वारे सुरक्षित लस तयार करण्यात येते.

ii) काही प्रकारच्या लसी या प्रत्यक्ष रोगजंतूनीच बनवलेल्या असतात. हे रोगजंतू क्रियाहीन आणि सुप्त करण्यात येतात. असे रोगजंतू लस म्हणून व्यक्तीच्या अंगात टोचले की ते अगोदरच रोगप्रतिकारक क्रिया करतात. जेव्हा याच व्यक्तीला खरोखर त्या रोगाची लागण होते, तेव्हा त्याच्या शरीरात अगोदरच प्रतिकार करणारी रसायने तयार असतात.

इ. प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते.

उत्तर :

i) प्रतिजैविके ही काही जीवाणू आणि कवकांपासून मिळणारी कार्बनी संयुगे असतात.

ii ) प्रतिजैविके रोगकारक जीवाणूंचा नाश करतात, तसेच त्याची संख्या वाढण्यापासून रोखतात, त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होत नाही व रोग निवारण होते.

ई. मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का ? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का ?

उत्तर :

i) प्राण्यांना देखील रोगांचा प्रादुर्भाव होतो म्हणून त्यांनाही काही प्रतिजैविके दिली जातात.

ii) प्राणी आणि मानवास दिली जाणारी बहुतांश प्रतिजैविके सारखीच असतात.

iii) परंतु, मानवाला बाधित करणारे जीवाणू वेगळे असल्याने त्यांची काही प्रतिजैविके वेगळी असतात.

उ. विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात ?

उत्तर :

i) संशोधन तंत्रज्ञानाचा अवलंब करून रोगकारक सूक्ष्मजीवांचा लस बनवण्यासाठी वापर केला जातो.

ii) हे सूक्ष्मजीव चुकून हवेत पसरले, तर लस तयार होण्यापूर्वीच रोगाची साथ पसरण्याची शक्यता असते.

iii) त्यामुळे, ज्या रोगाविरुद्ध लसनिर्मिती करावयाची आहे त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे जतन करावे लागतात.

8. थोडक्यात उत्तर लिहा.

अ. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय ?

उत्तर :

i) काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात. अशा प्रतिजैविकांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात.

ii) रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर केला जातो.

iii) अँम्पीसिलीन, अँमॉक्झीसीलीन, टेट्रासायक्लिन इत्यादी विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आहेत.

आ. किण्वन म्हणजे काय ?

उत्तर :

i) किण्वन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.

ii) या प्रक्रियेमध्ये यीस्टच्या पेशी स्वत:चे पोषण करताना द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डाय-ऑक्साइड वायू मध्ये करतात.

iii) किण्वन प्रक्रियेचा उपयोग विविध अन्नपदार्थ तयार करताना केला जातो. उदा. दही तयार करणे, पाव बनवणे इत्यादी.

इ. व्याख्या लिहा. ‘प्रतिजैविक’

उत्तर :

उपायकारक सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय.

Leave a Comment