जनाई स्वाध्याय
जनाई स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) जनाई शेतात कोणते काम करत होती ?
उत्तर :
जनाई शेतात पाण्याची दारं मोडत होती.
आ) शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले ?
उत्तर :
शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून विमान आले असे जनाईला वाटले.
इ) जनाई का घाबरून गेली ?
उत्तर :
एक साप जनाईकडे धावून येत होता म्हणून जनाई घाबरून गेली.
ई) जनाईला शेतात का जावे लागणार होते ?
उत्तर :
जनाईला शेतात जावे लागणार होते कारण तिच्याशिवाय काम करणारे घरात कोणीच नव्हते.
प्रश्न. 2. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
1) रात्रंदिवस घाम गाळणे
उत्तर :
रात्रंदिवस घाम गाळणे – खूप कष्ट करणे
वा. उ. – शेतमजुरांना शेतात रात्रंदिवस घाम गाळावा लागतो.
2) धाबे दणाणणे
उत्तर :
धाबे दणाणणे – खूप भीती वाटणे
वा. उ. – आमच्या समोर साप दिसताच आम्हा सर्वाचे धाबे दणाणले.
3) पोटात घाबरा पडणे
उत्तर :
पोटात घाबरा पडणे – अतिशय घाबरणे
वा. उ. – साप पाहून जनाईच्या पोटात घाबरा पडला.
4) पायाखालची जमीन हादरणे
उत्तर :
पायाखालची जमीन हादरणे – पायाखालची जमीन हलणे व भीती वाटणे
वा. उ. – भूकंपात पायाखालची जमीन हादरते.
प्रश्न. 3. पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दांत वर्णन केले आहे. त्यांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) शेंगांचे वावर 2) शेंगांना आलेली पिवळी फुले 3) साप 4) जेवण करून पोट भरले 5) जड धाटं | अ) काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी आ) हिरवागार शालू इ) हिरव्या-पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल ई) मनगटासारखी धाटं उ) डर्रकन दोन ढेकर आले |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) शेंगांचे वावर 2) शेंगांना आलेली पिवळी फुले 3) साप 4) जेवण करून पोट भरले 5) जड धाटं | आ) हिरवागार शालू इ) हिरव्या-पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल अ) काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी उ) डर्रकन दोन ढेकर आले ई) मनगटासारखी धाटं |
प्रश्न. 4. तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा.
अ) पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग – ………………..
उत्तर :
आकाशात काळ्या रंगाचे प्रचंड सैन्य जमले. त्यांच्याजवळ चमकणाऱ्या तलवारी होत्या आणि ते रणवाद्य वाजवत होते.
आ) पाऊस उघडल्यानंतर तारेवर बसलेले पक्षी – …………………..
उत्तर :
पक्षी एखाद्या उजळलेल्या दीपमाळेप्रमाणे दिसत होते.
इ) फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे – …………………..
उत्तर :
हातात नक्षत्रे घेऊन आकाशच पृथ्वीवर उतरले होते.
ई) गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरांत लिहिलेल्या ओळी – …………………….
उत्तर :
गुरुजींनी फळ्यावर पांढऱ्याशुभ्र मोत्यांची माळ ओवली होती.
प्रश्न. 5. तुम्हांला आवडलेल्या पाठातील दोन ओळी लिहा.
उत्तर :
i) गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झागमाग करावा तसं ते वावर चमकत होतं.
ii) शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती.
प्रश्न. 6. दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा व वाक्ये पूर्ण करा.
अ) जनाईचे अंग भगभगत होते, कारण ……………….
अ) तिने खूप काम केले होते.
आ) उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते
इ) तिला झोप आली होती.
उत्तर :
जनाईचे अंग भगभगत होते, कारण उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते.
आ) जनाई वावरातून पळत सुटली, कारण ………………..
अ) तिला आकाशात विमान दिसले.
आ) तिच्या अंगावर साप धावून आला.
इ) तिचे काम संपले.
उत्तर :
जनाई वावरातून पळत सुटली, कारण तिच्या अंगावर साप धावून आला.
प्रश्न. 7. पाठात आलेले भुजंगाचे वर्णन तुम्ही वाचले आहे. एखादी गाय किंवा बैल तुमच्या समोरून जोरात पळत येत आहे, अशी कल्पना करून त्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
एकदा मी रस्त्याने क्रिकेट खेळायला ग्राऊंडकडे चाललो होतो. समोर एक बैल दिसला. आपल्याला सापाची काय पं कुत्र्याचीही भीती वाटते, तशी बैलाची भीती वाटत नाही. पण हा बैल काही वेगळाच होता. त्याचे मोठाले डोळे रोखून तो माझ्याकडे पाहत होता. त्याची शिंगे अणुकुचीदार होती. त्याने शिंगे माझ्यावर रोखली आणि माझ्यावर तो धावून आला. मी लगेच एका घराच्या फाटकातून आत शिरलो. ते पाहून तो निघून गेला.
खालील उतारा वाचा व त्यात आलेले वाक्प्रचार व म्हणी शोधा. लिहा.
दीपा हिरमुसल्या चेहऱ्याने घरी आली. तिचा पडलेला चेहरा पाहून आई स्वत:शीच म्हणाली, ‘दीपा नेहमी हसतमुख असते. आज काय झालं असेल ? विचारायला पाहिजे.’
आई म्हणाली, “अगं दीपा, तुझं कुणाशी बिनसलं का ? हल्ली तुझी मैत्रीण गीता तुझ्याबरोबर दिसत नाही.”
दीपा म्हणाली, “आई, मी गीताच्या बोलण्याकडे कानाडोळा करायचं ठरवलं आहे. अति झालं न् हसू आलं, असंच वागते सध्या ती. अति तिथं माती, ही तिला कसं समजत नाही ? ज्याला त्याला उपदेशाचे डोस पाजत असते. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, असं तिच्या पाठीमागे सगळे म्हणतात. नमनाला घडाभर तेल घालायची तिची सवय तुला माहीतच आहे. आई, हल्ली सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून चार हात लांबच राहतात. गीताला वेळीच सावध केलं पाहिजे. काही झालंतरी गीता माझी जीवश्च कंठश्च मैत्रीण आहे. तिच्यासाठी जीव तुटतो माझा. तिला कोणी नावं ठेवली, तर माझ्या जीवांची घालमेल होते.
उत्तर :
i) चेहरा पडणे – चेहऱ्यावर नाराजी दिसणे.
ii) कानाडोळा करणे – दुर्लक्ष करणे
iii) अति झालं नि हसू आलं – कोणतीही गोष्ट अति प्रमाणात झाली की ती हास्यास्पद ठरते.
iv) अति तिथं माती – अतिरेक झाला की परिणाम वाईट होतो
v) अति शहाणा त्याचा बैल रिकामा – स्वत:ला फारच शाहाणे समजणारे कोणत्याच कामाचे नसतात
vi) नमनाला घडाभर तेल घालणे – मुख्य मुद्दा सांगण्याच्या आधीच खूप बोलत राहणे.
vii) चार हात लांब राहणे – संबंध न ठेवणे
viii) जीव तुटणे – मन तळमळणे
ix) नावे ठेवणे – दोष देणे
x) जीवश्च कंठश्च – जिवाभावाची
xi) जिवाची घालमेल होणे – मन अस्वस्थ होणे