वनस्पतींचे वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान

1. ‘अ’ ‘ब’ व ‘क’ या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | ‘क’ स्तंभ |
|---|---|---|
| थॅलोफायटा | फळांच्या आत बिया तयार होतात. | नेचे |
| ब्रायोफायटा | बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. | सायकस |
| टेरिडोफायटा | या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. | चिंच |
| अनावृत्तबीजी | या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. | मॉस |
| आवृत्तबीजी | पाणी व अन्न वहनासाठी ऊती असतात. | शैवाल |
उत्तर :
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | ‘क’ स्तंभ |
|---|---|---|
| थॅलोफायटा | या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. | शैवाल |
| ब्रायोफायटा | या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. | मॉस |
| टेरिडोफायटा | पाणी व अन्न वहनासाठी ऊती असतात. | नेचे |
| अनावृत्तबीजी | बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. | सायकस |
| आवृत्तबीजी | फळांच्या आत बिया तयार होतात. | चिंच |
2. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व विधानांची कारणमीमांसा स्पष्ट करा.
(आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, बिजाणू, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, युग्मक)
अ. मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने …………… या वनस्पतींचे असते.
उत्तर :
मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतींचे असते.
कारण – i) थॅलोफायटा विभागातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात.
ii) या वनस्पती पाण्यात वाढत असल्यामुळे त्यांचे शरीर मऊ व तंतूरुपी असते.
आ. वनस्पतीसृष्टीचे उभयचर ………………. गटाला म्हटले जाते.
उत्तर :
वनस्पतीसृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा गटाला म्हटले जाते.
कारण – ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते कारण ते ओलसर मातीत वाढतात; परंतु त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज भासते.
इ. टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे ………………. निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे ………………. निर्मितीद्वारे होते.
उत्तर :
टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.
कारण – टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस बीजाणू तयार होतात. यांच्या साहाय्याने वनस्पती तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे अलैंगिक प्रजनन करतात. ही पद्धत ज्या वेळी पाण्याची कमतरता असेल त्या वेळी वापरली जाते. परंतु सर्व परिस्थिती अनुकूल असेल, तर वनस्पती लैंगिक प्रजनन युग्मके तयार करून करतात.
ई. नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी ………………. ही वनस्पती आहे.
उत्तर :
नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी अनावृत्तबीजी ही वनस्पती आहे.
कारण – केवळ अनावृत्तबीजी वनस्पतींच्याच विभागात नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रांवर येतात.
3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
i) या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात.
ii) बियांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो.
iii) बिया रुजतांना काही काळ हा अन्नसाठा भ्रूणांच्या वाढीसाठी वापरला जातो.
iv) या वनस्पतीमध्ये बिया फळांमध्ये झाकलेल्या असतात किंवा नसतात. या वैशिष्ट्यांवरून बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग पडतात.
आ. एकबीजपत्री व द्विबीजपत्रीमधील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
| एकबीजपत्री वनस्पती | द्विबीजपत्री वनस्पती |
|---|---|
| i) एकबीजपत्री वनस्पतींमध्ये एकच बीजपत्र असते. ii) या वनस्पतींमध्ये तंतूमुळे असतात. iii) या वनस्पतींचे खोड नाजूक, पोकळ, आभासी चकतीसारखे असतात. उदा. बांबूचे पोकळ खोड, केळीचे आभासी, कांद्याचे चकतीसारखे खोड. iv) यांच्या पानांवरती समांतर शिराविन्यास असतात. v) या वनस्पतींची फुले त्रिभागी असतात. | i) द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये दोन बीजपत्रे असतात. ii) या वनस्पतींमध्ये ठळक प्राथमिक कठीण खोड असते. मूळ म्हणजे सोटमूळ असते. iii) बहुतांश वनस्पतींचे मजबूत व कठीण खोड असते. उदा. वटवृक्ष iv) यांच्या पानांवरती सम शिराविन्यास असतात. v) या वनस्पतींची फुले चतुर्भागी किंवा पंचभागी असतात. |
इ. नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर :

i) नेचे ही एक शोभिवंत वनस्पती असून तिचा अबीजपत्री या उपसृष्टीत आणि टेरिडोफायटा या विभागात समावेश होतो.
ii) या वनस्पतींमध्ये मुळे, खोड व पर्णिका असे सुस्पष्ट अवयव असतात तसेच पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात.
iii) नेचे या वनस्पतींला फुले आणि फळे येत नाहीत.
iv) या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.
v) या वनस्पतींमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते.
ई. स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा.
उत्तर :

स्पायरोगायरा वनस्पतीची वैशिष्ट्ये :
i) स्पायरोगायरा हे हिरवे, तरंगणारे, तंतूरुपी शैवाल असून त्याचा अबीजपत्री या उपसृष्टीत आणि थॅलो फायटा या विभागात समावेश होतो.
ii) तलाव, झरे, संथ गतीने वाहणारे पाणी किंवा प्रवाह यामध्ये स्पायरोगायराची मुबलक प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.
iii) स्पायरोगायराचे तंतू हे अशाखीय असून त्यामध्ये दंडाकृती पेशींची एक रांग दिसते.
iv) प्रत्येक पेशीला पेशीभित्तिका असते.
v) पेशीच्या मध्यभागी केंद्रक असते.
vi) हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश-संश्लेषण करतात. म्हणून त्या स्वयंपोषी आहेत.
उ. ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
i) ब्रायोफायटा या वनस्पती अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमध्ये येतात.
ii) या वनस्पती ओलसर मातीत वाढत असल्या तरी प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची आवश्यकता असते म्हणून या गटातील वनस्पतींना उभयचर असे म्हटले जाते.
iii) या वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असून त्यांना खरी मुळे, खोड व पाने नसतात.
iv) या वनस्पतींमध्ये मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.
v) ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींमध्ये पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात.
4. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
मर्केंशिया, फ्युनारिया, नेचे स्पायरोगायरा
उत्तर :
मर्केंशिया

i) मर्केंशिया या वनस्पतींचा समावेश अबीजपत्री या उपसृष्टीत आणि ब्रायोफायटा या विभागात होतो.
ii) या वनस्पती ओलसर जमीन, तसेच जुन्या भिंतींवर वाढतात आणि मुख्यत्वे पावसाळ्यात हिरव्या रंगाच्या गालिच्याप्रमाणे दिसतात.
iii) वनस्पतींच्या खालील पृष्ठभागावर अनेक मुलाभ दिसून येतात.
iv) तसेच, वरील पृष्ठभागावर वृंत असून त्याच्या टोकाशी बीजाणूधारी संपुटिका दिसून येते.
v) संपुटिका परिपक्व झाल्यावर त्यातून बीजाणू मुक्त होतात व त्याद्वारे अलैंगिक प्रजनन घडून येते.
फ्युनारिया

i) फ्युनारिया या वनस्पतीचा समावेश अबीजपत्री या उपसृष्टीत आणि ब्रायोफायटा या विभागात होतो.
ii) ही वनस्पती पावसाळ्यात सामान्यत: जुन्या ओलसर भिंती, झाडांचे खोड, तसेच ओलसर जमिनीवर आढळून येते.
iii) वनस्पतीच्या खालील बाजूस, अनेक बारीक, बहुपेशीय तंतूसारखे मुलाभ असून ते मुळांचे कार्य करतात.
iv) फ्युनारियामध्ये लैंगिक प्रजनन हे युग्मकांच्या संयोगाने होते; परिणामी बीजुकधारी वनस्पतीचा विकास होतो.
v) बीजुकधारी मध्ये बीजाणूधारी संपुटिका असणारे वृंत दिसून येते. ही संपुटिका परिपक्व झाल्यावर बीजाणू मुक्त करते. या बीजाणूंमुळे अलैंगिक प्रजनन घडून येते.
नेचे

i) नेचे ही एक शोभिवंत वनस्पती असून तिचा अबीजपत्री या उपसृष्टीत आणि टेरिडोफायटा या विभागात समावेश होतो.
ii) या वनस्पती थंड, ओलसर व सावली असलेल्या जागी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
iii) या वनस्पतींची मुळे तंतूमय असून ती जमिनीखालील खोडापासून वाढतात.
iv) या वनस्पतींमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते.
v) या वनस्पतींमध्ये फुलांची, तसेच बियांची निर्मिती होत नही.
vi) या वनस्पतींमध्ये पर्णिकेच्या मागील पृष्ठभागास असलेल्या बीजाणूधानी पुंजांमध्ये बीजाणूंची निर्मिती होते व त्याद्वारे अलैंगिक प्रजनन घडून येते.
स्पायरोगायरा

i) स्पायरोगायरा हे हिरवे, तरंगणारे, तंतूरुपी शैवाल असून त्याचा अबीजपत्री या उपसृष्टीत आणि थॅलोफायटा या विभागात समावेश होतो.
ii) या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात. या केवळ पाण्यातच जगू शकतात.
iii) प्रत्येक पेशीला पेशीभित्तिका असते.
iv) पेशीच्या मध्यभागी केंद्रक असते.
v) स्पायरोगायरामध्ये सर्पिल, हिरवी, तंतूसारखी रचना असलेली हरितलवके आढळतात, तसेच या सर्पिल हरितलवकात अनेक पायरेनॉईड दिसून येतात.
5. परिसरात उपलब्ध असणारी एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मूळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा.
उत्तर :
एकबीजपत्री वनस्पती – उदा. मका

i) मका ही एकबीजपत्री वनस्पती आहे.
ii) या वनस्पतीला तंतूमुळे असतात.
iii) याचे खोड पोकळ बांबूसारखे असते.
iv) पानांवरील शिराविन्यास हा समांतर शिराविन्यास असतो.
द्विबीजपत्री वनस्पती – उदा वाटाणा

i) वाटाणा ही द्विबीजपत्री वनस्पती आहे.
ii) वाटाण्याला दोन बीजपत्रे असतात.
iii) या वनस्पतीला ठळक प्राथमिक मूळ (सोटमूळ) असते.
iv) या वनस्पतींचे खोड मजबूत असते.
v) पानांवर जाळीदार शिराविन्यास असतो.
6. वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो ? ते सकारण लिहा.
उत्तर :
वनस्पतींचे वर्गीकरण करताना खालील बाबींचा विचार केला जातो.
i) वनस्पतींना अवयव आहेत किंवा नाहीत : जर वनस्पतींना मुळे, खोड आणि पाने यासारखे अवयव असतील, तर त्यांचा समावेश टेरिडोफायटा, आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी यासारख्या विभागात केला जातो. जर वनस्पती निम्नस्तरीय असतील, तर त्यांचा थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या विभागात समावेश केला जातो.
ii) पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती असणे किंवा नसणे : टेरिडोफायटा आणि बीजपत्री विभागातील वनस्पतींमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती असतात, तर ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा विभागातील वनस्पतींमध्ये अशा प्रकारच्या ऊती नसतात.
iii) फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे : यानुसार वनस्पतींचे अबीजपत्री आणि बीजपत्री असे वर्गीकरण करता येते. बीजपत्री वनस्पतींमध्ये बिया असतात. अबीजपत्री वनस्पतींमध्ये फुले, फळे आणि बिया नसतात.
iv) बिजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे : यानुसार बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी असे वर्गीकरण करता येते. अनावृत्तबीजी वनस्पतींच्या बियांवर कोणतेही नैसर्गिक आच्छादन नसतेम तर आवृत्तबीजी वनस्पतींच्या बिया या फळांच्या आत तयार होतात.
v) बियांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून : आवृत्तबीजी वनस्पतींचे एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री असे वर्गीकरण करता येते. एकबीजपत्री वनस्पतींमध्ये बी चे दोन समान भाग होत नाहीत, तर द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये बी चे दोन समान भाग होतात.