स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय
स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास
प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1) हंगामी सरकारचे …………………. हे प्रमुख होते.
अ) वल्लभभाई पटेल
ब) महात्मा गांधी
क) पं. जवाहरलाल नेहरू
ड) बॅ. जीना
उत्तर :
हंगामी सरकारचे पं. जवाहरलाल नेहरू हे प्रमुख होते.
2) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना ………………… यांनी तयार केली.
अ) लॉर्ड वेव्हेल
ब) स्टॅफर्ड क्रिप्स
क) लॉर्ड माऊंटबॅटन
ड) पॅथिक लॉरेन्स
उत्तर :
भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड माऊंटबॅटन यांनी तयार केली.
प्रश्न. 2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला ?
उत्तर :
व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा, यांचा आग्रह बॅ. जीनांनी धरला.
2) त्रिमंत्री योजनेतील सहभागी मंत्र्यांची नावे लिहा.
उत्तर :
पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रीप्स आणि ए. व्ही. अँलेक्झांडर हे मंत्री त्रिमंत्री योजनेत सहभागी होते.
प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) राष्ट्रीय सभेने फाळणीला मान्यता दिली.
उत्तर :
लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार-विनिमय केला. त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना तयार केली गेली. राष्ट्रीय सभेचा फाळणीला तीव्र विरोध होता. देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेंचा मूळ आधार होता; परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टाहास धरला; त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. राष्ट्रीय सभेने अत्यंत नाइलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली.
2) हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
उत्तर :
हंगामी सरकारच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीग या सरकारमध्ये सामील झाले नाही. पण काही काळानंतर मुस्लिम लीग सरकारमध्ये सामील झाले. परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
3) वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
उत्तर :
व्हाईसराॅयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगलाच असावा, असा बॅ. जीनांनी आग्रह धरला. राष्ट्रीय सभेने त्याला विरोध केला. त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
प्रश्न. 4. दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा.
उत्तर :
प्रश्न. 5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1) ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली ?
उत्तर :
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत होता. त्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. ब्रिटिशांनी जरी युद्ध जिंकले असले तरी त्यांची या युद्धात बरीच शक्ती खर्च झाली होती. भारतासारख्या खंडप्राय देशावर राज्य करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज होती. त्यातच भारतीयांचा स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक झाला होता. यांचा गांभीर्याने विचार करून ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले उंचलली.
2) माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा.
उत्तर :
इंग्लंडचे पंतप्रधान अँटली यांनी जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल, असे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली गेली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांबरोबर विचारविनिमय केला आणि भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना तयार केली.
या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही राष्ट्रे अस्तित्वात येतील. त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही. संस्थानांवरील ब्रिटिशांचे स्वामीत्व संपुष्टात येईल. अशी तरतूद करण्यात आली.
3) 16 ऑगस्ट हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले ? त्याचे कोणते परिणाम झाले ?
उत्तर :
त्रिमंत्री योजनेत मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद नव्हती. म्हणून मुस्लिम लीग असंतुष्ट होती. या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या. बंगाल प्रांतातील नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याने पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. त्यानुसार 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले.