खोद आणखी थोडेसे स्वाध्याय

खोद आणखी थोडेसे स्वाध्याय

खोद आणखी थोडेसे स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

अ) ‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे…………..

1) विहीर आणखी खोदणे.

2) जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

3) घरबांधणीसाठी खोदणे.

4) वृक्षलागवडीसाठी खोदणे.

उत्तर :

‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

आ) गाणे असते मनी म्हणजे ……………

1) मन आनंदी असते.

2) गाणे गाण्याची इच्छा असते.

3) मनात नवनिर्मिती क्षमता असते.

4) गाणे लिहिण्याची इच्छा असते.

उत्तर :

गाणे असते मनी म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते.

2) आकृती पूर्ण करा.

उत्तर :

3) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

कवितेतील संकल्पनासंकल्पनेचा अर्थ
1) सारी खोटी नसतात नाणीअ) मनातील विचार व्यक्त करावेत.
2) घट्ट मिटू नका ओठआ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
3) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेलीइ) सगळे लोक फसवे नसतात.
4) उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळीई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

उत्तर :

कवितेतील संकल्पनासंकल्पनेचा अर्थ
1) सारी खोटी नसतात नाणीइ) सगळे लोक फसवे नसतात.
2) घट्ट मिटू नका ओठअ) मनातील विचार व्यक्त करावेत.
3) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेलीई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.
4) उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळीआ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.

4) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.

1) संयमाने वागा –

उत्तर :

योग्य

2) सकारात्मक राहा –

उत्तर :

योग्य

3) उतावळे व्हा –

उत्तर :

अयोग्य

4) चांगुलपणावर विश्वास ठेवा –

उत्तर :

योग्य

5) नकारत्मक विचार करा –

उत्तर :

अयोग्य

6) खूप हुरळून जा –

उत्तर :

अयोग्य

7) संवेदनशीलता जपा –

उत्तर :

योग्य

8) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा –

उत्तर :

योग्य

9) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा –

उत्तर :

अयोग्य

10) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा –

उत्तर :

योग्य

11) धीर सोडू नका –

उत्तर :

योग्य

12) यशाचा विजयोत्सव करा –

उत्तर :

अयोग्य

5) काव्यसौंदर्य

अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’

उत्तर :

आशयसौंदर्य : ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द. आत्मविश्वास व चिकाटी या गणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे, हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जगण्याचा संदेश ही कविता देते.

काव्यसौंदर्य : कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.

भाषिक वैशिष्ट्ये : साध्या, सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘झरा’ या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे.

आ) ‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा.

उत्तर :

कवयित्री आसावरी काकडे यांनी ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश केला आहे.

कवयित्री म्हणतात – घट्ट ओठ मिटून दुख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे. हे समजावताना त्यांनी ‘गळणाऱ्या पानाचे’ प्रतीक वापरले आहे. शिशिरऋतूमध्ये पानगळ होते. झाड निष्पर्ण होते. परंतु जे पान सुकून, रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात सोसलेल्या वेदना, त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते.

गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळींतून व्यक्त झाला आहे.

इ) ‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.

उत्तर :

आसावरी काकडे यांनी ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिति क्षमतेला आवाहन केले आहे.

कवयित्रींच्या मते – मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितिक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात निर्मितिक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मितिक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग ‘ आनंदाचे डोही | आनंद तरंग |’ ही अवस्था अनुभवता येईल.

अशा प्रकारे कवयित्रींनी ‘गाणे असते गं मनी’ या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.

ई) ‘परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही’, याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा.

उत्तर :

आमचे ‘बाभूळगाव’ हे गरीब शेतकऱ्यांचे गाव होय ! डोंगरझाडी व बिकट मार्ग त्यामुळे ते तालुक्याच्या गावापासून लांब व सोयींच्या बाबतीत अडचणीचे आहे. आमच्या गावात जेमतेम चौथीपर्यंतच शाळा, तीही एकशिक्षकी एका पडक्या घरात भरायची. पाचवीनंतरच्या विद्यार्थ्यांना जंगलातून वाट काढत दहा किलोमीटर लांबवर तालुक्याच्या गावच्या शाळेत जावे लागायचे. आमचे रोकडे मास्तर फार मेहनती होते. त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला व आम्हां मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पालकांची सही व अंगठा आणला. पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठमोठ्या माणसांना भेटलो. त्यांच्या शिफारशी गोळा केल्या. गेल्या 15 ऑगस्टला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व गुरुजींनी त्यांना पुढच्या शिक्षण व्यवस्थेचा अर्ज दिला. काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात होण्यासाठी विनवले. अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या गावात जि. प. ची शाळा मंजूर झाली. आम्हांला ‘परिश्रमाचे फळ’ मिळाले !

Leave a Comment