सजीव सृष्टी स्वाध्याय

सजीव सृष्टी स्वाध्याय

सजीव सृष्टी स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ. वनस्पती आणि प्राणी यांमधील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

वनस्पती प्राणी
i) वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत असते.
ii) वनस्पती त्यांच्या खोड व पानावरील सूक्ष्म छिद्रांवाटे श्वसन करतात.
iii) वनस्पती स्वयंपोषी असतात. म्हणजेच त्या सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.
iv) वनस्पतींमध्ये हालचाल होते. परंतु त्या स्थान बदलू शकत नाही.
i) प्राण्यांची वाढ ठराविक कालावधी पर्यंत होते.
ii) प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात.
iii) प्राणी परपोषी असतात. म्हणजे प्राणी अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात.
iv) प्राण्यांमध्ये हालचालही होते व ते स्थान बदलवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावू शकतात.

आ. वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट करा.

उत्तर :

i) वनस्पती ही देखील प्राण्यांप्रमाणेच सजीव आहे. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

ii) वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठरावीक आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे दोघांतही सारखीच दिसून येते.

इ. वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे ?

उत्तर :

घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात.

i) जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी, यांचा वापर औषधासाठी केला जातो.

ii) काही वनस्पतींचा औद्योगिक कारणांसाठी वापर करण्यात येतो. जसे झांडापासून लाकूड मिळते. लाकडापासून दरवाजे, फर्निचर, कलेच्या वस्तू तयार केल्या जातात. तसेच कापसापासून धागे तयार करणे. त्यापासून कपडा तयार करणे इत्यादी.

iii) वनस्पतींचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे अन्न. अशाप्रकारे वनस्पती सृष्टी आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या तीनही गरजा पूर्ण करते.

ई) प्राणी सृष्टीआपल्यासाठी कशी उपयोगी आहे ?

उत्तर :

i) कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात.

ii) मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात.

iii) tar घोडा, बैल, उंट यांसारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात.

iv) गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. अशा प्रकारे प्राणी सृष्टी आपल्यासाठी उपयोगी आहे.

उ. सजीव हे निर्जिवांपेक्षा वेगळे का आहेत ?

उत्तर :

i) सजीवांमध्ये वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही लक्षणे दिसून येतात.

ii) सजीवांमध्ये जन्ममृत्यू या दोन घटना होतात. अशी लक्षणे निर्जिवांमध्ये दिसून येत नाही. म्हणून सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत.

2. कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो ?

अ. मासा

उत्तर :

कल्ले

आ. साप

उत्तर :

फुफ्फुसे

इ. करकोचा

उत्तर :

फुफ्फुसे, हवेच्या पिशव्यादेखील हवा साठवून ठेवण्यास मदत करतो.

ई. गांडूळ

उत्तर :

त्वचा

उ. मानव

उत्तर :

फुफ्फुसे, श्वासपटलाच्या साहाय्याने श्वसन

ऊ) वडाचे झाड

उत्तर :

पानावरील छिद्रांतून

ए. अळी

उत्तर :

श्वसनछिद्रे

3. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

(ऑक्सिजन, मृत्यू, उत्सर्जन, कार्बन डायऑक्साइड, चेतना क्षमता, प्रकाश संश्लेषण)

अ. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला ………………. म्हणतात.

उत्तर :

स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात.

आ. शरीरात ……………. वायू घेणे व …………….. बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात.

उत्तर :

शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात.

इ. शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे ……………… होय.

उत्तर :

शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय.

ई. घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला …………….. होय.

उत्तर :

घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता होय.

उ. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव ……………. पावतो.

उत्तर :

आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो.

4. प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा.

उत्तर :

प्राण्यांचा उपयोग

1) मधमाशी – i) मधमाश्यांनी तयार केलेल्या पोकळ्यातील मध अतिशय गुणकारी असते. या मधाचा उपयोग खाद्यपदार्थ व औषधांत होतो.

ii) संशोधनावरून सिद्ध झाले की मधमाशीचे विष सांधेदुखी व हाडाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे.

iii) मधमाशीमुळे झाडांचे परागीभवन देखील होते.

2) शार्क मासा – i) शार्क माश्याच्या यकृतापासून शार्कलिव्हर ऑइल काढले जाते.

3) याक – i) याक हा प्राणी मुख्यत्वे डोंगराळ आणि बर्फाच्छादित प्रदेशात आढळतो. या प्राण्याचा उपयोग वाहतुकीसाठी केला जातो.

ii) नेपाळ आणि तिबेटमध्ये या प्राण्याचा वापर शेतनांगरणीसाठी होतो.

iii) या भागात याकच्या दुधाचा व दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

4) मेंढी – i) मेंढ्यापासून लोकर मिळवली जाते.

ii) मेंढपाळ मेंढीचे दूधही वापरतात.

iii) मेंढ्यांच्या लेंड्यांपासून खत तयार केले जाते.

5) गांडूळ – i) गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकित, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे.

ii) हा प्राणी द्विलिंगी आहे.

iii) गांडूळ जैविक पदार्थाचे सुपीक मातीत रूपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो. त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो. म्हणून गांडूळाला ‘शेतकऱ्यांचा मित्र’ असे सुद्धा म्हणतात.

6) कुत्रा – i) पाळीव कुत्रा मालकाच्या घराचे व मालमत्तेचे रक्षण करतो म्हणून त्याला इमानदार प्राणी म्हटले जाते.

ii) प्रशिक्षित कुत्रे बॉम्ब व अमली पदार्थाचा शोध लावू शकतात.

iii) वासावरून गुन्हेगारांना पकडून देण्यास मदत करतात.

7) शिंपले – i) शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू केल्या जातात.

ii) पर्ल ऑयस्टर या शिंपल्यापासून कल्चर्ड मोती तयार केला जातो.

8) घोडा – i) प्राचीन काळापासून घोड्याचा वाहतुकीचे साधन म्हणून उपयोग केला जातो. उदा. घोडागाडी, टांगा इत्यादी

9) उंदीर – उंदीर हा उपद्रवी प्राणी म्हणूनच ओळखला जातो. परंतु पांढऱ्या उंदरांचा जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत वापर करून त्यांच्यावर विविध प्रयोग केले जातात.

वनस्पतींचे उपयोग

1) आले – i) आल्याचा रस पोटाच्या तक्रारींसाठी घेतला जातो.

ii) पदार्थांना चव येण्यासाठीही आले उपयोगात आणले जाते.

iii) आले वाळवून त्यापासून सुंठ बनविली जाते. डोकेदुःखी, पित्तविकार, मळमळणे या तक्रारींवर घरगुती उपचार म्हणून आले व सुंठीचा उपयोग केला जातो.

2) आंबा – i) आंबा हे ग्रीष्म ऋतूत येणारे फळ आहे. याला फळांचा राजा म्हणतात. कच्च्या आंब्यापासून पन्हे, लोणचे, चटण्या, सरबत हे खाद्यपदार्थ तयार केले जाते.

ii) तर पिकलेल्या आंब्यापासून आमरस, जॅम, आंबा पोळी, आम्रखंड इत्यादी खाद्यपदार्थ तयार केले जाते.

iii) हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व असल्यामुळे मंगलप्रसंगी व दाराच्या तोरणांमध्ये आब्यांच्या पानांचा उपयोग केला जातो.

3) निलगिरी – i) दुर्गंधी दूर करण्यासाठी निलगिरीच्या तेलाचा वापर केला जातो.

ii) तसेच उत्तम औषध म्हणून निलगिरीची पाने आणि तेलाचा उपयोग केला जातो. उदा. सर्दी, ताप.

4) बाभूळ – i) बाभळीच्या झाडाच्या कोवळ्या फांद्यांचा दातून म्हणून उपयोग केला जातो.

ii) पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून उपयोग होतो.

iii) बोटबांधणीसाठी बाभळीचे लाकूड वापरले जाते.

5) साग – i) सागाचे लाकूड सर्वात मजबूत व टिकाऊ असल्यामुळे याची सर्वात जास्त मागणी आहे.

ii) घराचे दरवाजे, खिडक्या, फर्निचर बनविण्यासाठी सागाचे लाकूड वापरले जाते.

6) पालक – i) पालक या पालेभाजीत अनेक जीवनसत्त्वे व खनिजे असल्यामुळे शरीराच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी या भाजीचे नियमित सेवन करणे फार फायद्याचे असते.

ii) रुग्णांना पालकाचे सूप देणे फार फायद्याचे असते.

iii) या पालेभाजीपासून बरेच खाद्यपदार्थ तयार केले जाते.

iv) ही पालेभाजी बुद्धिवर्धक व ह्रदयाचे आरोग्य जपणारी आहे. तसेच बद्ध कोष्ठावर एकमेव उपाय आहे.

7) कोरफड – i) कोरफड ही औषधी वनस्पती आहे. त्वचारोग तसेच भाजणे अशा जखमांवर कोरफड अत्यंत गुणकारी आहे.

ii) कोरफडीचा गर पचनसंस्थेचे विकार दूर करते. तसेच सौंदर्यप्रसाधनातही कोरफडीचा वापर केला जातो.

iii) कॅन्सर आणि मधुमेह यांच्या उपचारांत कोरफडीचा वापर केला जातो.

8) हळद – i) हळद ही स्वयंपाक घरातील रोजच्या वापरात येणारी आहे.

ii) हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. सर्दी, खोकला झाल्यास हळदीची पूड घातलेले दूध घेतल्यास लाभ होतो.

iii) सौंदर्य प्रसाधनात हळदीचा वापर केला जातो.

iv) हळद जखमा भरून काढण्यासाठी जंतुनाशकाचे कार्य करते.

9) तुळस – i) तुळशी ही औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात या वनस्पतीला फार महत्त्व आहे.

ii) हिंदू धर्मात तुळशीला पुजेत स्थान दिले आहे. तुळशीपासून ऑक्सिजन वायूचा पुरवठा जास्त केला जातो म्हणून ही वनस्पती घराच्या अंगणात लावली जाते.

iii) अनेक विकारांवर तुळशीच्या पानांचा रस लाभकारी आहे.

10) करंज – i) करंज ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

ii) करंजच्या फळांपासून निघणारे तेल आयुर्वेदात औषधी म्हणून वापरतात.

11) मोह – i) मोह हे जंगलात आढळणारे वृक्ष आहे. मोहाच्या फुलापासून व बियांपासून औषधी तसेच इतर द्रव्ये तयार करण्यात येतात.

ii) डोकेदुखी, त्वचाविकार यावर मोहाचे तेल उपयुक्त आहे.

iii) आदिवासी भागात मोहाची दारू विशेष लोकप्रिय आहे.

12) तुती – i) तुतीच्या झाडांची लागवड विशेष करून रेशीम उत्पादनासाठी केली जाते.

ii) तुतीची फळे ताजी किंवा सुकवून खाल्ली जातात.

13) द्राक्ष – i) द्राक्ष हे वेलीवर उगवणारे फळ आहे. ही फळे खाण्यास फार लोकप्रिय आहे.

ii) द्राक्षापासून द्राक्षासव ही आयुर्वेदिक औषध तयार केली जाते.

iii) द्राक्षापासून ‘वाईन’ हे उत्पादन घेतले जाते.

iv) द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात.

5. यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ?

सजीव : साप, कासव, कांगारू, गरुड, सरडा, बेडूक, गुलमोहर, रताळ्याचा वेल, डॉल्फिन, मुंगी, रॅटल साप, नाकतोडा, गांडूळ

उत्तर :

1) साप – i) साप हा सरपटणारा प्राणी आहे.

ii) सापाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. म्हणून ते नागमोडी आकारात सरपटतात.

2) कासव – i) कासव हा एक उभयचर प्राणी आहे.

ii) कासवांचे आयुष्य 150 वर्षापेक्षा जास्त असते.

iii) कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे.

iv) कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड, शेपूट असे चार प्रमुख भाग असतात.

3) कांगारू – i) कांगारू हा सस्तन प्राण्यांच्या शिशुधान गणातील महापाद्य कुलातील प्राणी आहे.

ii) ऑस्ट्रेलियात आढळणारा हा प्राणी सर्व शिशूधानी प्राण्यांमध्ये सर्वात मोठा आहे.

iii) मागचे पाय पुढच्या पायापेक्षा मोठे आणि बळकट असतात. उड्या मारतांना शेपटीचा उपयोग सुकाणूसारखा आणि शरीराचा तोल सांभाळण्यासाठी होतो. उड्या मारीत जाणे हे कांगारूचे खास वैशिष्ट्य होय.

4) गरुड – i) गरुड हा शिकारी पक्षी आहे, त्याला पक्ष्यांचा राजा समजले जाते.

ii) हा रॅप्टर्स या प्रकारात मोडतो.

iii) हा पक्षी उंच आभाळात भरारी मारू शकतो. त्याचे पंख अतिशय बळकट असतात व शरीर निमुळते असते.

5) सरडा – i) सरडा हा सरपटणारा प्राणी आहे.

ii) सरड्याच्या डोक्यावर दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी एक तिसरा डोळा असतो.

iii) आपल्या जिभेचा वापर करून सरडे वास घेतात.

iv) सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सरडा सगळ्यांत वेगवान प्राणी मानला जातो.

6) बेडूक – i) बेडूक हा प्राणी उभयचर गटात मोडतो.

ii) बेडूक आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो.

iii) हा नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे.

iv) बेडूक हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते. त्यामुळे ते एकदम थंड किंवा एकदम उष्ण तापमान उष्ण तापमान सहन करू शकत नाही.

7) डॉल्फिन – i) डॉल्फिन ही सस्तन माश्याची प्रजाती आहे.

ii) डॉल्फिनला जलचरांतील बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानले जाते.

iii) निमुळते शरीर व परांच्या साहाय्याने तो समुद्रात पोहू शकतो.

iv) मात्र सस्तन प्राणी असल्याने श्वासोच्छवास करण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येतो.

8) रॅटल साप – i) रॅटल सापाला खडखड्या साप असेही म्हणतात.

ii) या सापाची हालचाल अतिशय वेगाची असते. हालचालीमध्ये हा साप कडेवर सरकत जातो.

9) मुंगी – i) मुंगी हा स्वतःमध्ये अफाट सामर्थ्य घेऊन जीवन संक्रमण करणारा कीटक आहे.

ii) मुंगी आपल्या सहा पायांच्या मदतीने तुरुतुरु चालते.

iii) शिस्तबद्धता हा तिचा विशेष गुण आहे.

10) गांडूळ – i) गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे.

ii) हा प्राणी द्विलिंगी आहे.

iii) गांडूळ जैविक पदार्थाचे सुपीक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो. त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो. म्हणून गांडूळाला ‘शेतकऱ्यांचा मित्र’ असे सुद्धा म्हणतात.

11) गुलमोहर – i) गुलमोहराचे झाड दिसायला अतिशय सुंदर आहे.

ii) हा मुळचा मादागास्कर येथील वृक्ष आहे. परंतु आता तो भारतात सर्वत्र आढळतो.

iii) लाल भडक फुले या झाडाचे विशेष आकर्षण आहे.

12) रताळ्याचा वेल – i) रताळ्याच्या पिकाला उष्ण हवामान पोषक असते.

ii) भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम निचरा असलेली जमीन या पिकास मानवते.

iii) लागवडीनंतर फुटवे येऊन रताळ्याचे वेल वाढू लागतात. थोड्याच कालावधीत सर्व जमीन वेलांनी झाकून जाते. मात्र वेलांची पालटणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे. असे न केल्यास फक्त वेलांचीच वाढ होते आतिल कंदांची नाही.

6. सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा अपायकारक कसे आहेत, याविषयी सविस्तर माहिती लिहा.

उत्तर :

उपयुक्त वनस्पती – i) घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात.

ii) जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केली यांचा वापर अन्नासाठी तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो.

उपयुक्त प्राणी – i) प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात.

ii) कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात.

iii) मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात. तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात.

iv) गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.

अपायकारक प्राणी – i) आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदा. डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो.

ii) झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात.

iii) उवा, गोचिड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो.

iv) जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात.

अपायकारक वनस्पती – i) वनस्पतीही अपायकारक ठरतात. उदा. गाजरगवत, अनावश्यक तण, अमरवेल इत्यादी.

ii) खाजकुइलीच्या शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते.

iii) कण्हेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो.

iv) धोतरा ही वनस्पती विषारी आहे.

v) कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली, की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे आजार पसरतात.

Leave a Comment