नवा पैलू स्वाध्याय

नवा पैलू स्वाध्याय

नवा पैलू स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करत होती ?

उत्तर :

आभाळ गच्च भरून आलेले होते. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत होती. पाऊस पडण्यापूर्वी दवाखान्यात पोचायला हवे म्हणून ती नातवाला लवकर चल अशी घाई करत होती.

आ) रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यांत पाणी का आले ?

उत्तर :

दिगू रिक्षाच्या समोरून चालत होता. रिक्षावाला म्हणाला, ‘अरे पोरा, केव्हाचा आवाज देतोय, पण ढिम्म हालत नाही. बहिरा आहेस की काय ?’ दिगू खरोखरच बहिरा होता. म्हणून रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यांत पाणी आले.

इ) वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला ?

उत्तर :

वत्सलाबाई मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. दिगू बधिर होता. बोलक्या मुलांप्रमाणेच बधिरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करीत होती. आपण ही शाळा आजीला दाखवू आणि तिच्या निराश मनात आशा जागवू या विचाराने तिने आजीला घरी येण्याचा आग्रह केला.

ई) शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला ?

उत्तर :

आजी शाळेत गेल्या. हेडफोन्स लावून मुले बसली होती. बाई माईकमधून शिकवत होत्या. एक बाई यंत्राच्या साहाय्याने मुलाला गोष्टी शिकवत होत्या. ते मूल बाईसारखेच हसत हसत बोलले. दिगूतही असे परिवर्तन होऊ शकेल या जाणिवेने शाळेत गेल्यावर आजीला आनंद झाला.

उ) मूक-बधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले ?

उत्तर :

मूक-बधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात सर्वच मूक-बधिरांच्या दु:खाची जाणीव झाली. आपल्याही गावात मूक-बधिरांची शाळा काढावी असा विचार तिच्या मनात आला. तिच्याकडे खूप शेती होती. त्यातली थोडीशी विकून शाळेला येणारा खर्च करावा असे विचार तिच्या मनात आले.

प्रश्न. 2. का ते लिहा.

1) आजी शहरात गेली.

उत्तर :

आजीचा नातू दिगू बहिरा होता. गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून त्याला शहरातील डॉक्टरला दाखवावे म्हणून आजी वेड्या आशेने शहरात गेली.

2) आजी वत्सलाबाईच्या घरी गेली.

उत्तर :

‘उद्या मी तुम्हांला जे काय दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल.’ असे वत्सलाताई आजीला म्हणाल्या. म्हणून आजी वत्सलाताईच्या घरी गेली.

3) आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.

उत्तर :

आजीला नातवाच्या दु:खावरून सर्वच मुक्यांच्या दु:खाची जाणीव झाली. शाळेमुळे हे दु:ख कमी होते हे तिने वत्सलाताईच्या शाळेतून अनुभवले होते. म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.

4) वत्सलेने आजीला शाळेत नेले.

उत्तर :

आजी आपली शाळा पाहील. मूक-बधिरांना कसे शिकवण्यात येते याचा अनुभव घेईल. आपण तिला सर्व उपकरणे दाखवू आणि दिगूत सुधारणा व्हावी म्हणून त्याला आपल्या शाळेत दाखल करून घेऊ हा वत्सलाताईचा उद्देश होता. म्हणून वत्सलाने आजीला शाळेत नेले.

प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा.

उत्तर :

वत्सला नावाप्रमाणेच वत्सल व प्रेमळ आहे. दिनू बहिरा आहे हे तिने जाणले. आजीशी आपणहून ओळख काढली. ‘उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल’ असे सांगून आजीला घरी नेले. मूक-बधिरांमधील स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हास्य फुलवायचे, हा पक्का निर्धार करूनच ती मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती आणि याच निर्धाराने मूक-बधिर दिगूच्या आजीला शाळेत घेऊन गेली होती. ती आदर्श शिक्षिका आहे.

2) या पाठाला ‘नवा पैलू’ हा शीर्षक आहे ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा.

उत्तर :

सामान्यत: समाजातील सर्वच स्तरावर लेखन झालेले आहे. त्या मानाने मूक-बधिरांचे क्षेत्र उपेक्षितच राहले आहे. या दृष्टीने म्हणजे विषयाच्या दृष्टीने ही कथा नव्या पैलूने दर्शन घडवले. तसेच पैसा मिळवण्याचा विचार तर सर्वजणच करतात. पण एक खेडूत स्त्री आपल्या गावात मूक-बधिरांची शाळा व्हावी म्हणून आपल्या शेतातील काही भाग विकायला तयार होते. हे नवे व आगळेवेगळे आहे. इथे एक मानवी स्वभावाचा उदात्त असा नवा पैलू पाहायला मिळतो. आपल्या नातवाचा विचार करतांना ती सर्वच मूक-बधिरांचा विचार करते. हा विश्वात्माकतेचा आणखी एक नवा पैलू होय. म्हणून या पाठाचे ‘नवा पैलू’ हे शीर्षक योग्य आहे.

3) आजीच्या थोर विचाराबाबत पाच ते सात ओळी लिहा.

उत्तर :

आजीचे विचार फार थोर आहेत. वत्सलाची शाळा पाहिल्यानंतर दिगूला तेथे पाठवण्याचा विचार आजी वत्सलाजवळ बोलून दाखवते. पण लगेच तिच्या मनात विचार येतो, ‘आपल्याही खेड्यात अशी मूक-बधिर शाळा काढली तर….’ हा विचार येण्याचे कारण आपल्या नातवाच्या दु:खावरुन सर्वच मुक्यांच्या दु:खाची जाणीव तिला झालेली असते. ती वत्सलाला त्याबद्दल विचारते. मूक-बधिरांची शाळा काढायची म्हणजे प्रचंड पैशांचा खर्च असतो असे वत्सला सांगते. त्यावर ती म्हणते, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणानं अडाणी राहिलो; पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली. एक शेत विकलं तर लाखाला जाईल. ह्यातून शाळा काढता येईल. आजी म्हणाली, ‘माझ्या गावची मुलं शाळेतजातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वत:च्या पायावर उभी राहतील.’ आजीचे विचार असे थोर आहेत.

प्रश्न. 4. खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.

i) खंत वाटणे

उत्तर :

आपण आईवर चिडलो याची शीलाला लगेच खंत वाटली.

ii) दिड्मूढ होणे

उत्तर :

ताजमहालचे सौंदर्य पाहून मी दिड्मूढ झालो.

iii) विश्वासाचे हास्य फुलणे

उत्तर :

डॉ. आंबेडकरांनी दलितांचे स्वत्व जागवल्यामुळे दलितांच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले.

iv) पक्का निर्धार करणे

उत्तर :

मुलींना शिक्षण देण्याचा महात्मा फुले यांनी पक्का निर्धार केला.

v) धक्का बसणे

उत्तर :

दहावीत राम नापास झाला याचा त्याच्या आईला फार मोठा धक्का बसला.

vi) जाणीव होणे

उत्तर :

जग नश्वर आहे याची गौतम बुद्धांना जाणीव झाली.

vii) थक्क होणे

उत्तर :

अजिंठ्याची लेणी पाहून परदेशी पाहुणेही थक्क होतात.

Leave a Comment