बहुमोल जीवन स्वाध्याय
बहुमोल जीवन स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी
प्रश्न. 1. दोन – तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे ?
उत्तर :
जे वाट्याला येते ते सर्वानाच भोगावे लागते असा विचार गुलाब करतो. म्हणून तो आसपासच्या काट्यांना बोटे मोडत नाही असे गुलाबाचे मोठेपण कवीने सांगितले आहे.
आ) ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो ?
उत्तर :
ग्रीष्म धरणीला जाळतो. पण देह जळला म्हणून ती एकसारखी रडत बसत नाही. ती पुन्हा हिरवा शालू नेसते, पुन्हा तिला नवेपण येत. ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर हा परिणाम होतो.
इ) निराश-आशा कवीला कोणाबद्दल वाटते ?
उत्तर :
रोज नभाचे रंग बदलतात. ढग दाटून येतात. तरी निराश आशा नक्षत्रांना पुन्हा आपल्या घरी नेतात. अशी निराश-आशा कवीला नक्षत्रांसारखी वाटते.
ई) सुख-दु:खाची ऊन-सावली म्हणजे काय ?
उत्तर :
संकटे येतात तेव्हा दु:ख होते. संकटे निघून जातात तेव्हा सुख वाटते. संकटे येणे अटळ असते. या संकटांना लीलया भिडावे म्हणजे सुख मिळते. ही सुखदु:खाची ऊनसावली होय.
उ) आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात ?
उत्तर :
संकटामुळे काही माणसे आयुष्याचा त्याग करतात. पण तसे करू नये. संकटाशी भिडावे, आयुष्याचा त्याग करू नये कारण जीवन बहुमोल आहे असे कवी म्हणतात.
प्रश्न. 2. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) मनासारखे सारे काही घडते का ? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात ?
उत्तर :
सारेच काही मनासारखे घडत नाही. यासाठी कवीने अनेक उदाहरणे दिली आहेत. झाडावरचे फूल निखळून पडते. गुलाबाजवळ काटे उगवतात. वसंत संपताच ग्रीष्म येतो आणि तो धरणीला जाळतो. नभात नक्षत्रे चमचमतात. पण रोज नभाचे रंग बदलतात आणि मेघ दाटून आल्याने नक्षत्रांचे चमचमणे जगाला दिसत नाही. पौर्णिमेनंतर अमावास्या येते. कवी ही उदाहरणे आपल्या कवितेतून देतात.
आ) कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे ?
उत्तर :
सारेच काही आपल्या मनासारखे घडत नाही. सुखदु:खाची ऊनसावली येते आणि जाते. त्याबद्दल राग नको. संकटास लीलया भिडावे. संकटाला घाबरून आयुष्याचा त्याग करू नये. कारण जीवन बहुमोलाचे आहे. कवीने माणसाला हा बहुमोल संदेश दिला आहे.
प्रश्न. 3. तुमच्या मनाने उत्तरे लिहा.
अ) तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता ?
उत्तर :
आम्ही ठरवलेली गोष्टी घडत नाही तेव्हा आम्ही ती गोष्ट सोडून देतो, दुसरे नवीन काही करतो. त्यात मन रमवतो. होते ते चांगल्यासाठीच होते असे मानतो.
आ) ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात ?
उत्तर :
ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत, तेव्हा आधुनिक संशोधनाप्रमाणे इथे विमानातून ढगांवर रासायनिक द्रव्ये सोडून पर्जन्यवृष्टी करावी असे विचार आमच्या मनात येतात.
इ) खूप ऊन लागू लागले, की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हांला काय वाटते ?
उत्तर :
खूप ऊन लागले की आम्ही सावली शोधतो. सावलीमध्ये आम्हाला शांत व गार वाटते. आणि उन्हामुळे सावलीचे महत्त्व कळते.
प्रश्न. 4. या कवितेत मनासारखे काही घडते का ? असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे, असे तुम्हांला वाटते ? कल्पना करा व लिहा.
उत्तर :
परीक्षेत माझा नेहमी पहिला नंबर यावा. आंतरशालेय क्रिकेटस्पर्धेत प्रत्येक वेळी आमची शाळा जिंकावी व शील्ड आमच्याच शाळेला मिळावे. प्रत्येक स्पर्धेत मी धावांचे शतक ठोकावे. वक्तृत्व स्पर्धेतही माझा नेहमीच प्रथम क्रमांक यावा. असे मनासारखे घडावे असे मला वाटते.
खेळूया शब्दांशी
अ) या कवितेत सुखदु:ख, ऊनसावली अस विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी पाच शब्द लिहा.
उत्तर :
i) आशानिराश
ii) जीवनमृत्यू
iii) नीतिअनीती
iv) रागलोभ
v) शीतोष्ण (शीतउष्ण)
vi) मानअपमान
आ) समानार्थी शब्द लिहा.
अ) लतिका
उत्तर :
लतिका – वेल
आ) धरणी
उत्तर :
धरणी – धरती
इ) देह
उत्तर :
देह – शरीर
ई) नभ
उत्तर :
नभ – आकाश
खालील धातूंपासून धातुसाधिते तयार करा.
मूळ धातू | धातुसाधिते |
---|---|
1) बोल | बोलणे, बोलत, बोलता. बोलणारा, बोलून, बोलला |
2) कर | ………………… |
3) धाव | ………………… |
उत्तर :
मूळ धातू | धातुसाधिते |
---|---|
1) बोल | बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून, बोलला |
2) कर | करणे, करत, करवा, करणारा, करून, केले |
3) धाव | धावणे, धावत, धावा, धावणारा, धावून, धावला |
खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा.
1) मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली.
उत्तर :
मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली.
2) पालक मुलांसाठी सतत राबत असतात.
उत्तर :
पालक मुलांसाठी सतत राबत असतात.
3) गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली.
उत्तर :
गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली.
4) मला चित्रे रेखाटायला आवडते.
उत्तर :
मला चित्रे रेखाटायला आवडते.