पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय

पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय

पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग – 1

1. काय करावे बरे ?

उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात.

उत्तर :

उन्हातल्या दाहक व घातक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते. हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये. हातपाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावेत. चेहऱ्याचे रुमाल बांधून संरक्षण करावे. घरी परतल्यावर गार पाण्याचे हबके मारावेत. त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतरायला मदत होईल.

2. जरा डोके चालवा.

अ) सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत ?

उत्तर :

पृथ्वीतलावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत. हे सूक्ष्मजीव अनेक कार्ये करीत असतात. अन्नसाखळीतही त्यांची महत्त्वाची जागा आहे. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात. सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पृथ्वीतलावर साचून राहिला असता, म्हणून पृथ्वीतलावर सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत.

आ) समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार कर, माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा.

उत्तर :

i) समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात. यांपैकी काही माणसाचे अन्न आहेत.

ii) सागरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या माशांपैकी काही जाती खाद्य म्हणून वापरल्या जातात.

iii) माशातील उत्कृष्ट प्रथिने व मेदाम्ले यामुळे चांगले पोषण होते.

iv) खेकडा, कोळंबी, शेवंडे असे प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात. भारतीय सागरी जलात कोळंब्या खूप प्रमाणात असल्याने आपल्याला त्यांच्या निर्यातीने परकीय चलन मिळते.

v) शिंपले, माकले, कालवं अशा मृदुकाय प्राण्यांना अन्न म्हणून मागणी असते.

vi) समुद्रात निरनिराळी शेवाळे असतात. भारतात ती खाल्ली जात नसली तरी इतर आशियाई देशांतल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे.

3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) ढग कशाचे बनलेले असतात ?

उत्तर :

ढग पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते. येथे बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हेच कण ढग बनून तरंगत राहतात.

आ) जीवावरण कशाला म्हणतात ?

उत्तर :

पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जीवावरण बनवतात.

इ) तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरुपांची यादी तयार करा. त्यांतील कोणत्याही दोन भूरुपाचे वर्णन करा.

उत्तर :

माझ्या परिसरात छोटी टेकडी आणि मैदान आहे. दूरवर पर्वताच्या रांगा दिसतात. या पर्वतांच्या मध्ये दऱ्या व खिंडी आहेत.

भुरूपांची यादी : टेकडी, पर्वत, मैदान, दरी, खिंड

i) टेकडी : टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर.

टेकडीवरची जमीन उतरती असते. टेकडीवर सहज चढून जाता येते. टेकडीवर झाडे लावून तेथील मातीची धूप थांबवता येते.

ii) मैदान : मैदान हा जमिनीचा सपाट भाग आहे. येथे उंचवटा नसल्याने सरळ सपाट भाग खेळण्यासाठी वापरता येतो. मैदानाच्या सभोवताली झाडे आहेत. आम्ही मैदानाचा वापर फिरायला जाण्यासाठी व खेळण्यासाठी करतो.

4. पुढील दोन वाक्यांतील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा.

अ) अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे.

उत्तर :

अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे.

आ) रिया पठारी भागात राहते.

उत्तर :

रिया पठारी भागात राहते.

5. माहिती लिहा.

अ) बाष्पीभवन

उत्तर :

उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते. या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते. जमिनीत जिरलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते. बाष्पीभवनाच्या या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते. त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते. येथे त्याचे संघनन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते. बाष्पीभवनामुळे अशा रितीने पर्जन्य येणे आणि चलचक्र सतत चालू राहणे या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया घडतात.

आ) संघनन

उत्तर :

संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याची क्रिया. निसर्गात संघननाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो. उंचावर पोहोचलेल्या बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात. याचपासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो.

इ) जलचक्र

उत्तर :

पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो. यास चलचक्र असे म्हणतात. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असते. त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते. उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संघनन होते. या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे लहान कण ढगांच्या रुपात आकाशात तरंगत राहतात.

सूक्ष्म कणांचे मोठे व जड थेंब बनून पावसाच्या रुपात पुन्हा जमिनीवर येतात. पावसाचे पाणी निरनिराळ्या जलाशयात येऊन मिसळते. हिमाच्छादित प्रदेशातला बर्फ सूर्याच्या उष्णतेने वितळतो व त्याचेही पाणी बनते. जमिनीवरचे सर्व पाणी कालांतराने समुद्रात जाऊन मिसळते. अशा रितीने पाणी चक्राकार प्रवास करीत असते.

6. कोणतीही दोन उदाहरणे लिहा.

अ) हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी.

उत्तर :

i) ढग तयार होणे.

ii) पाऊस येणे

iii) धुके पडणे

iv) चक्रीवादळ येणे

v) जोराचा वारा सुटणे.

आ) पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे.

उत्तर :

ओढा, सरोवर, तळे, धबधबा, हिमनग, नदी, समुद्र इत्यादी.

7. जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा.

उत्तर :

Leave a Comment