सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत स्वाध्याय

सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत स्वाध्याय

सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी

प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला ?

उत्तर :

कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडास्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला.

आ) कविताला कशामुळे दिलासा मिळाला ?

उत्तर :

चीनमधील गुआंगजऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या एका सेकंदाने हुकले. त्याप्रसंगी तिच्या आईने तिची समजूत काढली. आईच्या प्रेमळ शब्दांनी कविताला दिलासा मिळाला.

इ) कविताचे पाय कशामुळे कणखर बनले ?

उत्तर :

कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले.

ई) कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले ?

उत्तर :

जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले.

उ) कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते ?

उत्तर :

कविता पी. टी. उषा या धावपटूला आदर्श मानते.

ऊ) कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते ?

उत्तर :

कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदूरुस्ती महत्त्वाची असते.

प्रश्न. 2. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) कविता राऊतला ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ का म्हणतात ?

उत्तर :

कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारुपाला आली. त्यामुळे तिला ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणतात.

आ) कविताला कशामुळे दिलासा मिळाला ?

उत्तर :

चीनमधील गुआंगजऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले होते. त्यामुळे निराश झालेला कविताची आईने समजून काढली यामुळे कविताला दिलासा मिळाला.

इ) कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली ?

उत्तर :

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हरसूल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रदेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला. पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यांसाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली.

ई) हरसूल, सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो ?

उत्तर :

कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हरसूल – सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे.

तिच्या यशामुळे हरसूल – सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हरसूल – सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो.

उ) आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईना का वाटते ?

उत्तर :

नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. हजारोजण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईना वाटते.

ऊ) कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात ?

उत्तर :

नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायांमधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील विजेंद्र सिंग यांना देतात.

ए) कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल ?

उत्तर :

कविताने ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि मेहनतीच्या बळावर, सरावावर लक्ष केंद्रित करून ध्येय साध्य केले. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कमालीची जिद्द ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ.

प्रश्न. 3. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा.

अ) पण – वेगळेपण

उत्तर :

पण – वेगळेपण, लहानपण

आ) दार – चमकदार

उत्तर :

दार – चमकदार, बहारदार

इ) पणा – कमीपणा

उत्तर :

पणा – कमीपणा, शहाणपणा

ई) पणी – लहानपणी

उत्तर :

पणी – लहानपणी, जागेपणी

उ) इक – आर्थिक

उत्तर :

इक – आर्थिक, व्यावहारिक

ऊ) इत – अखंडित

उत्तर :

इत – अखंडित, सदोदित

प्रश्न. 4. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

अ) दिलासा मिळणे

उत्तर :

खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते; पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला.

आ) गराडा पडणे

उत्तर :

पुढारी गावात येताच त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडला.

इ) कणखर बनणे

उत्तर :

दररोज व्यायाम केल्यामुळे रामचे शरीर कणखर बनले.

ई) ओढताण होणे

उत्तर :

शेतातले काम व शाळा यांमध्ये कुमारची फार ओढाताण होते.

उ) नात्यातली वीण गहिरी असणे

उत्तर :

मीना आणि मालती यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे.

ऊ) वणवण सहन करणे

उत्तर :

महादूला स्वत:चे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागते.

प्रश्न. 5. समान अर्थाचे शब्द लिहा.

अ) माय

उत्तर :

माय – आई

आ) लेक

उत्तर :

लेक – मुलगी

इ) बळ

उत्तर :

बळ – शक्ती

ई) गहिरे

उत्तर :

गहिरे – खोल

उ) क्रीडा

उत्तर :

क्रीडा – खेळ

ऊ) वडील

उत्तर :

वडील – बाप

प्रश्न. 6. तुम्हांला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो ? तो का आवडतो ?

उत्तर :

मला वैयक्तिक उंच उडीला खेळ आवडतो. त्यामुळे माझी शारीरिक क्षमता वाढते. संपूर्ण शरीराला तोल सांभाळण्याची ताकद वाढते. शरीराची तंदुरुस्ती वाढते. शरीराची उंची वाढण्यास मदत होते. मन एकाग्न करण्याची क्षमता वाढते.

प्रश्न. 7. तुम्हांला मैदानी खेळ आवडतात, की बैठे खेळ ? की दोन्ही ? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा.

उत्तर :

मला मैदानी व बैठे असे दोन्ही खेळ आवडतात. दोन्ही खेळांमुळे मिळणारा आनंद निराळा आहे. दोन्ही खेळ उदा. लंगडी व कॅरम हे खेळण्याने शरीराला व्यायाम, ऊर्जा, एकाग्रता, विश्रांती अशा अनेक गोष्टींचा फायदा होतो.

प्रश्न. 8. खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या शब्दसमुहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दांत सांगा.

अ) तुमची गल्ली/गाव कशाने वेढलेले आहे ?

उत्तर :

गावाच्या भोवती काय आहे ?

आ) आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत.

उत्तर :

शहरात धुराचे प्रमाण जास्त आहे.

इ) अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत.

उत्तर :

सिमेंटच्या इमारतींनी वेढलेले.

ई) कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात.

उत्तर :

अनिताबाईच्या अवतीभवती नेहमी खूप फायली असतात.

प्रश्न. 9. शरीर या शब्दापासून ‘शारीरिक’ हा शब्द तयार झाला आहे. तसेच पुढील शब्दांपासून तयार झालेले शब्द वाचा व समजून घ्या.

उत्तर :

i) उद्योग – औद्योगिक

ii) शिक्षण – शैक्षणिक

iii) बुद्धी – बौद्धिक

iv) नीती – नैतिक

v) संस्कृती – सांस्कृतिक

vi) भूगोल – भौगोलिक

vii) इतिहास – ऐतिहासिक

viii) विज्ञान – वैज्ञानिक

प्रश्न. 10. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ‘क्रीडामहोत्सव’ या विषयावर आठ ते दहा वाक्ये लिहा.

महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका/जिल्हा/राज्य पातळी, खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार.

उत्तर :

आमच्या शाळेत डिसेंबर महिन्याच्या 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंत क्रीडामहोत्सव आयोजित केला जातो.

आमच्या शाळेच्या मैदानावर राज्यस्तरीय क्रीडास्पर्धाचे आयोजन या क्रीडामहोत्सवात केले जाते. या क्रीडामहोत्सवात वैयक्तिक आणि सामुदायिक अशा दोन्ही स्पर्धा होतात. यावर्षी वैयक्तिक स्पर्धामध्ये 400 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि सामुदायिक स्पर्धामध्ये लंगडी, कबड्डी, गोल खो खो, रस्सीखेच इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.

मला या स्पर्धापैकी रस्सीखेच ही स्पर्धा आवडली. महोत्सवाच्या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना पारितोषिके देण्यासाठी ऑलिंपिकवीर मिल्खासिंग यांना बोलावण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभ खूप उत्साहात, जल्लोषात पार पडला. माझ्या मनात विचार आले की खेळ माणसाला किती उत्साही, आनंदी बनवतो. आयुष्यात आपण एक तरी खेळ निश्चित खेळू.

Leave a Comment