मृदा स्वाध्याय

मृदा स्वाध्याय

मृदा स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल

प्रश्न. 1. पुढील तक्ता पूर्ण करा.

घटक मृदानिर्मितीमधील भूमिका
मूळ खडक
प्रादेशिक हवामान
सेंद्रिय खत
सूक्ष्म जीवाणू

उत्तर :

घटक मृदानिर्मितीमधील भूमिका
मूळ खडकमूळ खडकाचे हवामान व खडकाच्या काठिण्यानुसार विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते.
प्रादेशिक हवामानमूळ खडकाची विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते.
सेंद्रिय खतखडकाच्या भुग्यात सेंद्रिय खतांचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक होते.
सूक्ष्म जीवाणूमृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळतात. त्याचे सूक्ष्म जीवाणूंमार्फत विघटन होते. विघटन झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात. ह्युमसचे प्रमाण मृदेत अधिक असल्यास मृदा सुपीक बनते.

प्रश्न. 2. कशामुळे असे घडते ?

1) सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते.

उत्तर :

i) सह्याद्रीच्या पश्चिम भागात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाचा प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो.

ii) खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून ही मृदा निर्माण होते. अशाप्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते.

2) मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते.

उत्तर :

i) मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात.

ii) वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्यांचे सूक्ष्म जीवांमर्फत विघटन होते. उदा. गांडूळ, सहस्त्रपाद (पैसा किडा), वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी. अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ‘ह्युमस’ असे म्हणतात. अशाप्रकारे मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते.

3) विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद घडते.

उत्तर ;

i) विषुववृत्तीय हवामान प्रदेशात जास्त उष्णता व वर्षभर पाऊस असतो.

ii) उष्ण व दमट हवामानामुळे झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते. मृदा निर्मितीसाठी हे अनुकूल असते.

iii) जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. म्हणून विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते.

4) मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते.

उत्तर :

i) जास्त बाष्पीभवन होत असल्याने जमिनीतील क्षार पाण्यात विरघळतात. हे क्षार भूपृष्ठावर आल्यानंतर तसेच बाष्पीभवन होऊन जमिनीवर क्षारांचा थर साचतो.

ii) तसेच अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. अशाप्रकारे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते.

5) कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ (धान) जास्त असतो.

उत्तर :

i) कोकणात भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान आहे.

ii) कोकणात तांदळाच्या पिकासाठी आवश्यक असणारी गाळाची मृदा असल्यामुळे हे पीक येथे भरपूर प्रमाणात होते. म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ (धान) जास्त असतो.

6) मृदेची धूप होते

उत्तर :

i) मृदा जसजशी लागवडीखाली येते. तसतसा तिचा कस कमी होतो. वाहते पाणी, हिम व वारा यांचे क्षरण कार्य, मृदेची योग्य मशागत न करता बेसुमार पिके घेणे, निष्काळजीपणाने जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती अवलंबिणे, तेलजन्य कचरा, प्लॅस्टिक, कीटकनाशके, खतांमधील रसायनांचा अंश, चुकीच्या शेती पद्धती, किरणोत्सर्गी पदार्थाची अयोग्य विल्हेवाट इत्यादी कारणांमुळे मृदेची धूप होते.

ii) वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो. तसेच वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यांमुळे मृदेची धूप होते.

7) मृदेची अवनती होते.

उत्तर :

i) शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो.

ii) रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते.

प्रश्न. 3. माहिती लिहा.

1) मृदा संधारणाचे उपाय

उत्तर :

i) मृदा ही अत्यंत महत्त्वाचे व मूलभूत नैसर्गिक संसाधन आहे. तिचे महत्त्व लक्षात घेता, संधारण करणे महत्त्वाचे आहे.

ii) शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये, म्हणून शेतांना बांध बंदिस्ती करणे. बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या साहाय्याने बांध घालणे.

iii) वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळेही मृदेची धूप थांबते.

iv) उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदणे. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे होणारी झीज थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

v) रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळणे. सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेतील सुपीकता टिकून राहते.

vi) शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून-पालटून पीक घेणे महत्त्वाचे असते. जेणे करून मृदेची सुपीकता टिकून राहील.

2) सेंद्रिय खत

उत्तर :

i) शेतातील मातीत पुरेसा सेंद्रिय कर्ब असेल तर ती चांगले उत्पादन देते. रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे असते.

ii) अमाप उत्पादनाच्या हव्यासापोटी भरमसाठ रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जाऊ लागली. त्यामुळे जमिनीतील जैवविविधता नष्ट होऊ लागली. जमिनीचा रासायनिक आणि जैविक समतोल बिघडल्याचा तो परिणाम आहे. हा बिघडलेला समतोल परत आणण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे.

iii) सेंद्रिय खत जमिनीची सुपिकता वाढविण्याबरोबरच जमीन निरोगी बनविण्यास उपयुक्त ठरते. गांडूळ खत, शेण खत ही सेंद्रिय खतेच आहे. नैसर्गिकरित्या तयार होणारी ही खते आज काळाची गरज बनली आहे. ही खते मृदांना आवश्यक त्या पोषणद्रव्यांचा पुरवठा करतात.

iv) मृदेत जसे रासायनिक, कार्बनिक पदार्थ असतात पदार्थ असतात तसेच अनेक जीवांचे ते वसतिस्थान असते. अनेक बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, शेवाळ, बुरशी , गांडुळे आणि अन्य छोटे जीव जमिनीत राहून तिच्यातील कार्बनयुक्त पदार्थाचे खतात रूपांतर करीत असतात. शिवाय जमिनीतील अकार्बनिक पदार्थाना विघटित करून वनस्पतींना उपयुक्त पदार्थ तयार करण्याचे काम ते करीत असतात. जमिनीतील ओलावा टिकविण्याचे आणि खताचे प्रमाण वाढविण्याचे काम गांडुळे करतात. जमिनीतील सारेच जीवाणू जमिनीत ह्युमसचे प्रमाण वाढविण्यास मदत करतात. ह्युमसमुळे जमीन हवेशीर ओलसर व भुसभुशीत राहते. जमिनीची सुपिकता टिकून राहते. आणि हे सर्व सेंद्रिय खतांच्या वापरामुळेच शक्य आहे.

3) विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का, याची माहिती मिळवण्याचे ठिकाण.

उत्तर :

i) विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का हे ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, जिल्हा मृदा परीक्षण केंद्रे या ठिकाणी याची माहिती मिळते.

ii) जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदा परीक्षण करून मृदेचे प्रकार, मृदेची सुपीकता, या मृदेत कोणते पीक घेता येते, मृदेतील ह्युमसचे प्रमाण, मृदेतील घटक या सर्वाची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते.

4) वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व

उत्तर :

i) मृदा हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी 5 डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

ii) आरोग्यदायक मृदा ही आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया मृदा आहे. अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात.

iii) जंगले वाढविण्यासाठी मृदेचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थाश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैवविविधता टिकवून ठेवण्यात मृदेचा मोलाचा वाटा आहे.

iv) मृदेमध्ये आणि अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मूलभूत गरजा मृदेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

v) आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उद्यास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य मृदेतच आहे.

vi) जमिनीतील 10 ते 15 सेमी मृदेचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

vii) मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानतून कितीही प्रगती साधली तरी एकदा नष्ट झालेली मृदा पुन्हा निर्माण करू शकत नाही हे वास्तव आहे. कारण मृदा कारखान्यांत तयार होत नाही. ती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो.

viii) जमीन हा मर्यादित स्वरूपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरज आहे.

प्रश्न. 4. मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा.

क्रिया परिणाम सुपीकता वाढते/ कमी होते.
बांधबंदिस्ती करणे
वाऱ्याचा वेग कमी झाला
काही काळ जमीन पडीक ठेवणे
ह्युमसचे प्रमाण वाढले
उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे
शेतात पालापाचोळा जाळणे
सूक्ष्मजीवांना पोषक ठरते
क्षारतेचे प्रमाण वाढते
रासायनिक खतांचा अतिवापर करणे

उत्तर :

क्रिया परिणाम सुपीकता वाढते/ कमी होते.
बांधबंदिस्ती करणे. भूजल पातळी वाहून मृदेची धूप होणे कमी होते. सुपीकता वाढते.
वृक्ष लागवड करणे. वाऱ्याचा वेग कमी झाला. सुपीकता वाढते.
काही काळ जमीन पडीक ठेवणे. मृदेची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. सुपीकता वाढते.
सेंद्रिय खतांचा वापर ह्युमसचे प्रमाण वाढलेसुपीकता वाढते.
उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे मृदेची झीज थांबते व पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. सुपीकता वाढते.
शेतात पालापाचोळा जाळणेमृदेतील राखेचे प्रमाण वाढते. सुपीकता कमी होते.
जैविक पदार्थसूक्ष्मजीवांना पोषक ठरतेसुपीकता वाढते.
अतिरिक्त जलसिंचनक्षारतेचे प्रमाण वाढतेसुपीकता कमी होते.
रासायनिक खतांचा अतिवापर करणेमृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होऊन ह्युमसचे प्रमाण कमी होते व वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळेनाशी होते. सुपीकता कमी होते.

Leave a Comment