निरोप स्वाध्याय
निरोप स्वाध्याय इयत्ता नववी मराठी
प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा.
अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण …………….
1) मुलाचा वाढदिवस आहे.
2) तो रणांगणावर जाणार आहे.
3) त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
4) त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
उत्तर :
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण तो रणांगणावर जाणार आहे.
प्रश्न. 2. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा.
अ) अशुभाची साऊली
उत्तर :
रणांगणात पराभव होणे, लढताना जखमी होणे किंवा मृत्यू येणे, शत्रूने कैद करणे, रणांगणातून भीतीमुळे पळून येणे इ. वाईट गोष्टींचा तुला स्पर्शही होऊ नये. या गोष्टींची तुला स्पर्शही होऊ नये. या गोष्टींची सावली तुझ्यावर पडू नये.
आ) पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण
उत्तर :
आई साधे दिवे उजळून आरती करत नाही. ती आपल्या प्राणांनी ओवाळते आहे. तिचे पंचप्राण या आरतीतील ज्योती आहेत.
प्रश्न. 3. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्रे | कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती | आईने व्यक्त केलेली इच्छा |
---|---|---|---|
उत्तर :
कवितेचा विषय | कवितेतील पात्रे | कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती | आईने व्यक्त केलेली इच्छा |
---|---|---|---|
रणांगणावर जायला निघालेल्या मुलाविषयीच्या आईच्या अंत:करणातील भावना | रणांगणावर जायला निघालेला मुलगा व त्याची आई | श्री छत्रपती शिवाजीमहाराज व झाशीची राणी लक्ष्मीबाई. | मुलाने विजयी होऊन यावे म्हणजे मी त्याला माझ्या हाताने दूधभात भरवीन. |
प्रश्न. 4. काव्यसौंदर्य
अ) ‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देतांना आई म्हणते, छत्रपती शिवाजीमहाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला आणि भवानीआईने त्यांच्या शस्त्रास्त्राला शक्ती दिली होती. रणांगणात तूही भवानीचे स्मरण करून शिवरायाचे स्वरूप आठव म्हणजे भवानीमाता प्रसन्न होऊन तुझ्या ही शस्त्रास्त्राला शक्ती देईल आणि तुझ्या हातून शत्रूचा पराभव होईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या विरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळींतून व्यक्त होते.
आ) ‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आईचे भाव व्यक्त केले आहे. ती दु:खी होत नाही. तिला स्वत:च्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्र कन्या आहे. वीरमाता आहे. काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे. प्रस्तुत कवितेत पद्मा गोळे यांनी रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाला म्हणते, तू रणांगणावर आपल्या शौर्याने शत्रूचा पराभव करून विजयी होऊन परत ये आणि माझी कूस धन्य कर. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवील. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि श्वाश्वत निरंतर माया या ओळींतून दिसून येते.
प्रश्न. 5. अभिव्यक्ती
अ) कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
कवितेतील वीरमातेला रणांगणावर निघालेल्या आपल्या पुत्रावर अंत:करणापासूनचे उत्कट प्रेम आहे. ती त्याला आपल्या पंचप्राणांच्या ज्योतींनी ओवाळत आहे. तिने घराला मंगळ तोरण बांधले आहे. कारण त्याच्यावर अशुभाची सावली पडू नये. त्याने धीर सोडू नये आणि आईला सोडून जाताना त्याच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून ती आपल्या डोळ्यात अश्रूंचा थेंबही दिसू देत नाही. उलट छत्रपती शिवाजीमहाराज व राणी लक्ष्मीबाई यांची नावे उच्चारून त्याला रणांगणात जायला प्रोत्साहन देते आणि त्याच्या वीरवृत्तीला आवाहन करते. भवानीमातेची कृपा तुझ्यावर होईल आणि तू विजयी होऊन परत घरी येशील असा आशीर्वाद देते. माझी कूसधन्य करावीस असे आशादायक वचन बोलते आणि मी तुला पुन्हा एकदा दूधभात भरवीन असे वात्सल्यपूर्ण शब्द ऐकवते. तिच्या प्रत्येक शब्दांतून भाव ओसंडत आहे.
आ) ‘भारतभू ही वीरांची भूमी आहे’, याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :
भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दृष्टांना शिक्षा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. प्राचीन काळात श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन, अभिमन्यू यांच्यासारखे वीर भारतभूमीत निर्माण झाले. मध्ययुगीन काळात शिवाजीमहाराज, बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, पहिले बाजीराव यांच्यासारखे वीर निर्माण झाले. आधुनिक काळात नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सर्वच क्रांतिकारक भारतात निर्माण झाले. एकूणच, भारतभू ही वीरांची भूमी आहे, हे सूर्यप्रकाशासारखे सत्य आहे. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली. पण ती धैर्याने व शौर्याने परतवून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी ठासून म्हणावे लागेल, भारतभू ही वीरांची भूमी आहे.