स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय
स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास
प्रश्न. 1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1) भारत सेवक समाजाची स्थापना …………….. यांनी केली.
अ) गणेश वासुदेव जोशी
ब) भाऊ दाजी लाड
क) म. गो. रानडे
ड) गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर :
भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली.
2) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ………………. येथे भरवण्यात आले.
अ) पुणे
ब) मुंबई
क) कोलकाता
ड) लखनौ
उत्तर :
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरवण्यात आले.
3) गीतारहस्य हा ग्रंथ ……………….. यांनी लिहिला.
अ) लोकमान्य टिळक
ब) दादाभाई नौरोजी
क) लाला लजपतराय
ड) बिपीनचंद्र पाल
उत्तर :
गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला.
ब) नावे लिहा.
1) मवाळ नेते
उत्तर :
1. गोपाळ कृष्ण गोखले
2. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
2) जहाल नेते
उत्तर :
1. लाला लजपतराय
2. बाळ गंगाधर टिळक
प्रश्न. 2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
उत्तर :
भारतातील अनेक विद्वानांनी आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला. संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. रा. गो. भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी भारतीय संस्कृतीला सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे, हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
2) भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले.
उत्तर :
भारतीय राष्ट्रीय सभेत राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म भाषा, प्रांत असे सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते; परंतु राष्ट्रीय सभा ही शांततेच्या सनदशीर मार्गाने पुढे न्यावी, असे काही पुढाऱ्यांचे मत होते; तर काही पुढऱ्यांचे मात्र स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे, असे मत होते. शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मावळ नेते होत. यावरून भारतीय राष्ट्रीय सभेत मवाळ व जहाल असे दोन गट तयार झाले.
3) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करावयाचे ठरवले.
उत्तर :
भारतीय राष्ट्रीय सभेने चळवळीत फूट पाडण्यासाठी तसेच हिंदू-मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. तत्कालीन व्हाॅईसरॉय लॉर्ड कर्झनने त्याला खतपाणी घातले. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. या फाळणीमागे हिंदू-मुस्लिमांत फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुर्बल करणे हा छुपा हेतू होता.
प्रश्न. 3. टिपा लिहा.
1) राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट्ये
उत्तर :
भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे, राष्ट्रांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट्ये होती.
2) वंगभंग चळवळ
उत्तर :
लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. त्यामुळे बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेधसभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला. ‘वंदे मातरम्’ हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा, महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. वंगभंग चळवळीचे नेतृत्व सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवीद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली, ती एक राष्ट्रीय चळवळ बनली.
3) राष्ट्रीय सभेची चतु:सूत्री
उत्तर :
राष्ट्रीय सभेच्या 1906 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. या अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतु:सूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. राष्ट्रीय चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेश वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे अधिवेशनात ठरविण्यात आले. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल. असे नेत्यांचे मत होते.
प्रश्न. 4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करा.
1) प्रशासकीय केंद्रीकरण
उत्तर :
ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरणे, सर्वाना कायद्यासमोर समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोईसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले; परंतु या भौतिकसुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. भारताच्या विविध प्रांतांतील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली.
2) आर्थिक शोषण
उत्तर :
इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गानी इंग्लंडकडे सुरू झाला. भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावणे, शेतसाऱ्याचे ओझे, सततचे दुष्काळ यांमुळे भारतीय शेतीचा कणा मोडला. पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली. भांडवलदारांकडून कामगारवर्गाने शोषण होत होते. मध्यमवर्गावर नवनवे कर लादले गेले. यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता.
3) पाश्चात्य शिक्षण
उत्तर :
पाश्चात्या शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. बुद्धिनिष्ठा, विज्ञान निष्ठा, मानवतावाद, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी, अशी भावना रुजू लागली. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले.
4) प्राचीन इतिहासाचा अभ्यास
उत्तर :
डॉ. भाऊ दाजी लाड व डॉ. रा. गो. भांडारकर यांनी भारताच्या प्राचीन संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला असल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
5) वृत्तपत्रांचे कार्य
उत्तर :
याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. या वृत्तपत्रांतून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली. दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बझार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली.