नैसर्गिक संसाधने स्वाध्याय
नैसर्गिक संसाधने स्वाध्याय इयत्ता सहावी भूगोल

अ) खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय ?
1) पाणी
उत्तर :
i) पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होतो.
ii) तसेच घरगुती गरजेसाठी, शेतीसाठी, कारखान्यासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी, वाहतूक व मनोरंजन इत्यादी अनेक उपयोगासाठी पाणी वापरले जाते.
2) वने
उत्तर :
i) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांचा उपयोग होतो.
ii) वनांमुळे अनेक जीवमात्रांना अधिवास मिळतो.
iii) वनांतील वनस्पतीमुळे कार्बनडाय ऑक्साईड वायूचे शोषण होते.
iv) वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषध वनस्पती इत्यादी उत्पादने मिळतात.
v) वनांमुळे जमिनीची धूप होत नाही.
3) प्राणी
उत्तर :
i) घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर प्रामुख्याने नांगरणी, प्रवास, माल वाहून नेणे इत्यादींसाठी होतो.
ii) शेळी, गाई, म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो.
iii) तसेच प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मिळतात.
4) खनिजे
उत्तर :
खनिजांपासून आपल्याला विविध धातू, रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधी तयार करण्यासाठी होतो.
5) जमीन
उत्तर :
i) मासेमारी सोडून इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव जमिनीवरच करतो.
ii) जमिनीवरच शेती केली जाते.
iii) भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो.
ब) पुढील ओघतक्ता पूर्ण करा.

उत्तर :

क) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे ?
उत्तर :
i) मृदा तयार होणे प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते.
ii) मृदेची निर्मिती ही अत्यंत संथपणे होणारी प्रक्रिया आहे. साधारणपणे अडीच सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षांचा काळ लागू शकतो.
iii) खडकांचे अपक्षरण व खडकांच्या बारीक कणांचे संचयन या सर्वावर मृदा तयार होणे अवलंबून असते.
2) वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात ?
उत्तर :
वनांमधून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने मिळतात.
3) खनिजांचे उपयोग कोणते ?
उत्तर :
खनिजांपासून विविध धातू व रसायने मिळतात. या खनिजांपासून मिळणाऱ्या काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो.
4) जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो ?
उत्तर :
i) जमिनीचा वापर शेती करण्यासाठी केला जातो. तसेच बांधकाम करण्यासाठी, व्यापारासाठी, कारखान्यांसाठी जमिनीचा वापर केला जातो.
ii) भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो.
iii) त्याचप्रमाणे स्थावर मालमत्ता म्हणूनही जमिनीचा वापर केला जातो.
5) नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे ?
उत्तर :
नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कारण i) नैसर्गिक संसाधने निसर्गत: उपलब्ध असतात. या नैसर्गिक संसाधनांचा मानवाने त्याच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर वापर करण्यास सुरुवात केली.
ii) लोकसंख्या वाढ व मानवाच्या हव्यास या गोष्टींमुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर सुरू झाला.
iii) यासाठी मानवाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आवश्यकतेनुसार व तारतम्याने करणे आवश्यक आहे.