प्राचीन भारत सांस्कृतिक स्वाध्याय
प्राचीन भारत सांस्कृतिक स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा.
उत्तर :
तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, विक्रमशीला विद्यापीठ.
2) कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे, त्याची यादी करा.
उत्तर :
तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे.
2. नावे लिहा.
प्राचीन भारतातील महाकाव्ये ………..
उत्तर :
रामायण आणि महाभारत
3. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) रामायण हे महाकाव्य ……………. ऋषींनी रचले.
उत्तर :
रामायण हे महाकाव्य वाल्मीकी ऋषींनी रचले.
2) भारतीय वैद्यकशास्त्राला ……………. असे म्हटले जाते.
उत्तर :
भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते.
3) हजारो विद्यार्थ्याची राहण्याची सोय ……………… विद्यापीठात होती.
उत्तर :
हजारो विद्यार्थ्याची राहण्याची सोय नालंदा विद्यापीठात होती.
4. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा.
उत्तर :
i) तिपिटक म्हणजे तीन पिटक.
ii) पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ ‘विभाग’ असा आहे.
iii) तिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. यामध्ये सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांचा समावेश होतो.
2) भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे ?
उत्तर :
i) फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे, असा भगवद्गीतेत संदेश दिला आहे.
ii) तसेच ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वासाठी खुला आहे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे.
3) आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे ?
उत्तर :
i) आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे.
ii) त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, याचाही विचार करण्यात आला आहे.
4) संघम साहित्य म्हणजे काय ?
उत्तर :
i) संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा.
ii) या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य ‘संघम साहित्य’ म्हणून ओळखले जाते.
iii) हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे.
iv) संघम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते.
5. चर्चा करा.
मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला.
उत्तर :
i) मौर्य आणि गुप्तकाळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला.
ii) मौर्य काळात सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाअधिक विकसित होत गेली.
iii) गुप्तकाळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला.
6. तुम्ही काय कराल ?
1) आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर कराल ?
उत्तर :
i) तमालपात्र – तमालपत्रामुळे कफ नाहीसा होतो. अरुची, अजीर्ण, श्वास, अतिसार, पंडूरोग यासाठी तमालपत्र चूर्ण वापरले जातात.
ii) शतावरी – देवी विकारांमुळे दाहशामक म्हणून शतावरी पानाचा लेप करतात. ज्वरावर शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून त्यात जिऱ्याची पूड घालून ते मिश्रण द्यावे. शरीरपुष्टतेसाठी शतावरी चूर्ण 10 ग्रॅम प्रमाणात रोज दूधातून घ्यावे.
iii) तुळशी – या झाडाची पाने आणि बिया औषधी आहेत. पानांचा काढा किंवा रस फुफ्फुसाच्या नळ्या सुजण्यावर, पडशावर, पचनाच्या विकारात उपयोगी आहे. पानाच्या रसाचे थेंब कर्णशूल थांबविण्यासाठी कानात टाकण्यात येतात. पानांचा काढा घरगुती उपाय म्हणून सर्दी पडशासाठी नेहमी वापरण्यात येतो. मलेरियाच्या ज्वरात घाम येण्यासाठी तुळशीच्या मुळांचा काढा देण्यात येतो.
iv) चंदन – या झाडाच्या लाकडापासून (गाभ्यातून) काढलेले तेल औषधी आहे. हे तेल लघवी होण्याच्या, मूत्राशय सूजण्याच्या, परमा आणि कफ होण्याच्या उपचारात वापरले जाते. हे चंदनाचे खोड पाण्याबरोबर उगाळून लेप तयार करतात. तो सुजेवर, तापात कपाळावर आणि त्वचारोगावर लावला जातो. बियांपासून काढलेले तेल त्वचारोगावर वापरले जाते.
v) दालचिनी – दालचिनीच्या झाडाच्या फांद्या तोडून त्यांची साल काढण्यात येते. आतली कोरडी साल म्हणजे दालचिनी होय. ते अतिसार, मळमळ, वात्यांवर वापरले जाते. या सालीपासून सिनॅमॉन नावाचे तेल काढण्यात येते. हे तेल पोट दुखणे, पोटात वायु होणे यावर वापरले जाते. पानातून काढलेले तेल काही प्रकारच्या संधीवातात, दुखत असलेल्या जागेवर लावण्यासाठी उपयोग करतात.
2) तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा.
उत्तर :
सम्राट अशोकाने सांची येथे स्तूप बांधला. पुढे शुंग व सातवाहन राजांनी त्याची पुनर्बाधणी केली. येथील प्रवेशद्वारांवर जातक कथा व गौतमबुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत.
सांची येथील स्तूपाची तोरणद्वारे विदेशी येथील हस्तीदंत कारागिरांनी निर्माण केली होती. येथील स्तुपावरील उत्कीर्ण शिल्प प्रतिमा शुंगकालीन शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. हे स्तूप आज प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे स्तूप जागतिक वारसा मानले जाते.
7. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ?
तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहीत आहे.
उत्तर :
सहलीला गेल्यावर माझा मित्र जर तेथील ऐतिहासिक स्मारकावर आपले नाव लिहित असेल तर त्याला तसे करू देणार नाही. कारण ऐतिहासिक स्मारक हे आपल्या प्राचीन संस्कृतीचा ठेवा आहे. त्या वास्तूंचे सौंदर्य व मूळ स्वरूप नष्ट करून आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक वैभवाचा वारसा नष्ट होईल म्हणून तिचे जतन करू ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. असे त्याला समजावून सांगेन.