थेंब आज हा पाण्याचा स्वाध्याय
थेंब आज हा पाण्याचा स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी
प्रश्न. 1. कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.
अ) या मोत्यांचा (पाण्याचा) संचय कर.
उत्तर :
कवयित्री सुनंदा भावसार ‘थेंब आज हा पाण्याचा’ या कवितेत म्हणतात की, मानवी जीवन सर्वस्वी पाण्यावर अवलंबून आहे. पण आज पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अवलंबून आहे. पण आज पिण्याच्या पाण्यासाठी अनेक खेडुतांना कितीतरी दूरवर पायलीट करावी लागते. पाण्याची पातळी खालावली आहे. याचे कारण पाऊस येतो, पाणी देतो पण ते पाणी नदीनाल्यातून वाहून जाते. ते आपण साठवून ठेवत नाही. ते साठवण्यासाठी गावागावात तलाव खोदले आणि पाण्याचा संचय केला तर पिण्याचा पाण्याचा आणि शेतीलाही लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सहज सुटेल. पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर होईल. म्हणून कवयित्रीने पावसाच्या पाण्याचा संचय कर असे म्हटले असावे.
आ) निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.
उत्तर :
कवयित्री सुनंदा भावसार ‘थेंब आज हा पाण्याचा’ या कवितेत म्हणतात की, निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही. शेती उत्तम पिकावी म्हणून दरवर्षी नियमितपणे पावसाळ्यात पाऊस देत असतो. मुबलक पाणी देऊन मानवी जीवन समृद्ध करणे हे निसर्गाला कळते पण त्या पाण्याचा योग्य संचय करावा हे माणसाला कळत नाही. त्यामुळे निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवयित्रीने म्हटले असावे.
प्रश्न. 2. खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा.
अ) आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते.
उत्तर :
आभाळातील ह्या मोत्याने, मातीमधूनी पिकती मोती
आ) मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो.
उत्तर :
संचय करता तिजोरीतल्या, खणखणत्या त्या नाण्यांचा
इ) निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वत:ला फसवण्यासारखे आहे.
उत्तर :
कशास ऐसा वेडाचाळा, स्वत: होऊनी ठगण्याचा.
प्रश्न. 3. संकल्पना स्पष्ट करा.
अ) आभाळातील मोती
उत्तर :
मोती जसे शुभ्र, टपोरे व सुंदर दिसतात तसेच आभाळातून पडणाऱ्या पावसाचे थेंब शुभ्र, टपोरे व सुंदर दिसतात.
आ) मातीतील मोती
उत्तर :
मोती जसे मौल्यवान असतात तसे मातीतील म्हणजे शेतातील धान्यही बहुमोल असते.
इ) मोत्यांचा संचय
उत्तर :
मोती सुंदर व मौल्यवान असल्यामुळे त्यांचा संचय करून ठेवतात. त्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचे थेंबही मोत्यांप्रमाणे दिसतात व त्यांचा संचय करून आपले जीवन समृद्ध केले पाहिजे.
ई) बहुमोल थेंब
उत्तर :
मोती, सोने मूल्यवान असतात हे खरे, पावसाचे थेंब त्याहून बहुमोल असतात. कारण मोती, सोने यावाचून काही अडत नाही पण पाणी नसेल तर जीवनच संपुष्टात येईल.
प्रश्न. 4. खाली दिलेल्या ओळींतील विचार सांगा.
तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा ?
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ||
उत्तर :
माणसाचा तहान लागते. त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासावीस होतो. दुष्काळात तर पाण्यावाचून गुरे ढोरे तडफडून मरतात. तहान फक्त पाण्यानेच भागते. सोने कितीही मौल्यवान असले तरी सोन्याने तहान कधीच भागत नाही. पाणी म्हणजे जीवन. म्हणून सोन्यापेक्षाही पाण्याचा संचय मानवी जीवनासाठी अधिक मौल्यवान ठरतो.
प्रश्न. 5. माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
माणूस सोने, हिरे, मोती यांचा संचय करतो. वास्तविक त्या जीवनाश्यक वस्तू नव्हेत. पाणी, वृक्ष ह्या निसर्गाच्या वस्तू जीवनाश्यक असूनही त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. वास्तविक पाण्याचा संचय अतिशय आवश्यक आहे. तेव्हा निसर्गाला दुर्लक्षित करणे हा आपला दृष्टिकोन माणसाने बदलला पाहिजे तरच जीवन सुसह्य व समृद्ध होईल असा याचा अर्थ आहे.
प्रश्न. 6. फरक स्पष्ट करून तक्ता पुर्ण करा.
माणसाचे धन | निसर्गाचे धन | |
---|---|---|
कोणते ? | ||
कोठे ठेवतात ? | ||
उपयोग |
उत्तर :
माणसाचे धन | निसर्गाचे धन | |
---|---|---|
कोणते ? | रत्ने, हिरेमोती, सोने, पैसा | पाऊस, पाणी, वृक्ष, भूमी, इ. |
कोठे ठेवतात ? | तिजोरीत | पाण्याचे तलाव, विहिरी |
उपयोग | अलंकार व आर्थिक व्यवहार | जीवन जगणे |
खेळूया शब्दांशी
अ) खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., मोल – बहुमोल, अनमोल.
मोल- मातीमोल, कवडीमोल.
उत्तर :
i) बहुमोल – खूप मोलाचे
वा.उ. – जीवनात पाणी हे बहुमोल आहे.
ii) अनमोल – मोल करता येणार इतक्या मोलाचे.
वा.उ. – जगात कोहिनूर हिरा हा अनमोल आहे.
iii) मातीमोल – मातीच्या मोलाचे, अजिबात मोल नसलेले.
वा.उ. – गैरमार्गाने मिळविलेल्या पैशाची किंमत सज्जन व्यक्तीच्या नजरेत मातीमोल असते.
iv) कवडीमोल – कवडीच्या मोलाचे, काहीच मोल नसलेले.
वा.उ. – आज स्टेनलेस स्टिलच्या भांड्यामुळे कल्हई करणाऱ्या लोकांचा व्यवसाय कवडीमोल झाला आहे.
आ) माती-मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
उत्तर :
अंबा – आंबा, कल (मनाचा) – काल, खर – खार, गर – गार, चर (चालणारे) – चार, जर – जार, जल – जाल, दरी – दारी, नर – नार, पर – पार, बल – बाल, मल – माल, मर – मार, भर – भार, मन – मान, सल – साल इ.
प्रकल्प
‘निसर्ग वाचवा’ या विषयी घोषवाक्ये तयार करून खालील फलकांवर लिहा.
उत्तर :
लिहिते होऊया
पाऊस पडलाच नाही, तर ……………. कल्पना करा. खालील मुद्द्यांच्या आधारे निबंधलेखन करा.
1) पाण्याचा दुष्काळ.
2) दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम.
3) शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम.
4) नदी, नाले, विहिरींची स्थिती.
5) सजीवांवर होणारा परिणाम.
उत्तर :
पाऊस पडलाच नाही तर …………..
पाऊस पडलाच नाही तर त्या प्रदेशात सर्वत्र पाण्याचा दुष्काळ पडेल. प्रत्येक माणूस चिंताग्रस्त होईल. काही माणसे तर शेतीवाडी सोडून स्थलांतर करतील. पाणी नाही आणि त्यामुळे धान्यही नाही असा प्रचंड सुका दुष्काळ जीवन असह्य करून सोडील.
हॉटेलात पाणी फुकट मिळणार नाही. पाण्याच्या बाटल्यांची किंमत अतोनात वाढेल. प्यायलाच पाणी नाही तेथे अंघोळ कुठून ? आदी थोडेसेच पाणी पिऊन तहान भागवावी लागेल. कपडे धुणेही जवळजवळ बंद होईल. ‘खायला देतो पण पाणी मिळणार नाही’ अशी परिस्थिती निर्माण होईल. गुरे ढोरे तर पाण्यावाचून तडफडून मरतील. नळातूनही पाणी फार कमी येईल. पाण्यासाठी भांडणे होतील.
शेती तर निव्वळ पाण्यावर अवलंबून असते. पाण्याचे पंप असतील पण पाणीच नसेल. मग शेतकरी पेरणी कसे करणार ? शेतात धान्य कसे उगवणार.
नदीचे, तलावाचे पाणी शेतीकरिता वापरता येते. पण नदी, नाले, तलाव, विहिरी सारे कोरडे पडलेले असणार. पाण्याविना उद्योगधंदेही ठप्प पडतील.
नद्या, नाले सुकून जाणार, त्यांचे नुसते वाळवंट होईल. तलाव, विहिरीही आटून जातील. फारच भयावह गंभीर परिस्थिती निर्माण होईल.
कित्येक गाई, म्हशी, वासरे, बैल आणि अन्य प्राणीही पाण्याविना तडफडून मरतील. वाघ, अस्वल, सिंह इत्यादी श्वपदांनाही पाणी लागते. पाखरेही चिवचिवाट करतील आणि अखरे संपून जातील. गावेची गावे ओस पडतील. रुग्णांचे तर हाल विचारायलाच नकोत. ‘पाणी, पाणी’ करत सर्व जीव व्याकूळ होऊन जातील. मृत्यूला टेकलेल्या माणसालाही शेवटी पाणी पाजायचे असते.
माझ्या मनात शेवटी एक विचार येतो – ‘विज्ञानाच्या साह्याने पाऊस पाडता येणार नाही काय ?
विचार करा. सांगा
पाणी कसे तयार होते ?
उत्तर :
समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते. ती वर जाते. त्यांचे ढग बनतात. वाऱ्यामुळे ढग वाहतात. योग्य थंड वातावरणात त्या ढगांतून पाऊस पडतो. पाणी असे तयार होते.
पाणी कोठे साठवले जाते ?
उत्तर :
पाणी धरणात, तलावात, विहिरीत साठवले जाते. घरोघरी पाण्याच्या विविध भांड्यांमध्ये पाणी साठवले जाते.
पाण्याचा वापर कशाकशासाठी होतो ?
उत्तर :
पाण्याचा वापर पिण्यासाठी, अंघोळीसाठी, भांडी व कपडे धुण्यासाठी, गाई वासरांना व सर्वच प्राणी, पक्ष्यांना त्यांची तहान भागवण्यासाठी, शेतीसाठी व घरे बांधण्यासाठी, उद्योगधंद्यांसाठी होतो.
जलप्रदूषण म्हणजे काय ? जलप्रदूषणाची कारणे कोणती ?
उत्तर :
जलप्रदूषण म्हणजे पाणी दूषित होणे. नदीत किंवा तलावात मूर्तीचे व अन्य पूजासाहित्याचे विसर्जन करणे, नदी-तलावात अंघोळ करणे, त्यात मल विसर्जन करणे, कारखान्यात वापरलेले पाणी नदीत सोडणे इत्यादींमुळे पाणी दूषित होणे याला जलप्रदूषण म्हणतात.
जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर :
ज्यामुळे जलप्रदूषण होते त्या गोष्टी करू नये. मूर्ति विसर्जनासाठीस्वतंत्र व्यवस्था असावी. बारा वर्षानंतर एकदा नदी किंवा तलाव यातील गाळ उपसावा. गटाराचे किंवा कारखान्यातले दूषित पाणी नदी-तलावात सोडू नये. ते जमिनीत जिरवणे हा महत्त्वाचा उपाय आहे.
जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?
उत्तर :
जलसंवर्धनासाठी गावागावात शिवार बांधणे व नद्यांवर धरणे बांधणे हे मुख्य उपाय आहे. पावसाचे पाणी वाहून जाते. तसे होऊ नये. ते जमिनीत जिरवणे हा महत्त्वाचा उपाय आहे.
आभारपत्र
जर तुम्हांला एखाद्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करायचे असेल, तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल, त्याचे सादरीकरण कसे कराल, त्याचा आराखडा तयार करा.
उत्तर :
मुख्य कार्यक्रम आटोपल्यामुळे श्रोते आणखी काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. म्हणून आभारप्रदर्शन शक्य तेवढे संक्षिप्त असावे.
– प्रथम प्रमुख वक्ते, नंतर व्यासपीठावरील लोक व अध्यक्ष या क्रमाने आभार मानावे. प्रमुख वक्त्याच्या भाषणातील मध्यवर्ती कल्पना एकदोन वाक्यात मांडावी.
– कार्यक्रम यशस्वितेसाठी ज्यांनी हातभार लावला त्यांचे आभार मानावे.
– श्रोत्यांचे आभार मानावे.
आंतरशालेय क्रीडामहोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने/मैत्रिणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचे/तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तर :
रुपेश पवार
छत्रपती नगर, नाशिक
22 ऑक्टोबर 2020
प्रिय आकाश,
तुला आंतरशालेय क्रीडा महोत्सवात दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. याबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन मला तुझा अभिमान वाटतो.
तू धावण्याचा जबरदस्त सराव केला होतास. शिक्षकांनी दिलेल्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करत होतास. म्हणून तुला गौरवास्पद विजयाचे हे फळ मिळाले.
तुझे पुनश्च अभिनंदन !
तुझा मित्र
रुपेश