1857 चा स्वातंत्र्यलढा स्वाध्याय
1857 चा स्वातंत्र्यलढा स्वाध्याय इतिहास इयत्ता आठवी
प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(उमाजी नाईक, स्वातंत्र्यसमर, लॉर्ड डलहौसी, भारतमंत्री, तात्या टोपे)
1) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या लढ्याला…………… हे नाव दिले.
उत्तर :
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या लढ्याला स्वातंत्र्यसमर हे नाव दिले.
2) रामोशी बांधवांना संघटित करून …………….. यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
उत्तर :
रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
3) 1857 च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी …………… हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.
उत्तर :
1857 च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.
4) भारतातील संस्थाने ……………. या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
उत्तर :
भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
प्रश्न. 2. पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा.
1) इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
उत्तर :
इ. स. 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले. ओडिशात मध्ययुगीन काळात पाईक पद्धती अस्तित्वात होती. पाइकांना त्या काळात जमिनी करण्यासाठी दिल्या गेल्या होत्या. त्यावर पाईक उदरनिर्वाह करत. परंतु इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. याचा परिणाम इ. स. 1817 मध्ये इंग्रजाविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
2) हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
उत्तर :
ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गाईची व डुकराची चरबी लावलेली असते, अशी बातमी चहूकडे पसरली. त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
3) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही.
उत्तर :
भारतीय सैनिकांकडे शौर्य होते. परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत. दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्याने त्यांच्या हालचाली जलद होत. यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. लढाया केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकाव्या लागतात.
4) स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.
उत्तर :
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाही; अशी काळजी घेण्यात आली.
5) इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले.
उत्तर :
इंग्रजांनी भारताला केवळ ‘बाजारपेठ’ या दृष्टिकोनातून पाहिले. भारतातील कच्चा माल कमी किमतीत घेऊन त्यापासून तयार केलेला पक्का माल भारतीयांनाच जास्त किमतीत विकायंचा, असे इंग्रजांचे धोरण होते. भारतीय उद्योगातून तयार होणारा माल कमी किमतीत मिळू नये या हेतूने इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्यावर जाचक कर बसविले.
प्रश्न. 3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1) 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती ?
उत्तर :
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यामागची सामाजिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
i) इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यांत हस्तक्षेप करत आहेत, असे भारतीयांना वाटू लागले.
ii) सतीबंदी, विधवाविवाह हे कायदे, जरी सामाजिक दृष्टीने योग्य असेल, तरी ते आपल्या जीवनपद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली.
2) 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश का आले ?
उत्तर :
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश आले; कारण –
i) लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती, तरीही राजपूताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिले.
ii) लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही.
iii) राजे-रजवाड्यांनी या लढ्यात पाठिंबा दिला नाही. ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.
iv) भारतीय सैन्याला शोर्यापेक्षा डावपेचांची जास्त गरज होती; कारण इंग्रजांकडे आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, आद्ययावत शस्त्रास्त्रे v अनुभवी सेनानी मोठ्या प्रमाणात होते.
v) इंग्रजी सैन्याला आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल होती.
3) 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा.
उत्तर :
1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत –
i) ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली : कंपनीच्या कारभारामुळे भारतीयांच्या असंतोषत भर पडत गेली व त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857 च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही, असे वाटल्यामुळे 1857 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.
ii) राणीचा जाहीरनामा : इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाने जाहीरनामा काढला. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाननात भेद करणार नाही, भारतीयांच्या धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही दिली.
iii) भारतीय लष्कराची पुनर्रचना : लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक केली गेली.
4) 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले ?
उत्तर :
भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ होणार नाही, अशी काळजी घ्यायला सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील. एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील, हे धोरण राबवले जाऊ लागले. ‘फोडा आणि राज्य करा’ हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले.