आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

1. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ) बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यांतील संबंध व कारणे स्पष्ट करा.
उत्तर :
i) बराच काळ मोठा पाऊस पडल्यास भुगर्भजल पातळीमध्ये वाढ होऊन जमिनीतील भुगर्भजलाचा दाब वाढतो.
ii) या वाढलेल्या दाबामुळे उतारावरील भाग निसरडे होतात.
iii) खडकांची झीज झाल्यामुळे आणि उतारी प्रदेश निसरडा झाल्यामुळे दरडी कोसळतात.
आ) भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा.
उत्तर :
| काय करू नये | काय करावे |
|---|---|
| i) लिफ्टचा वापर करू नये. | i) जिन्याचा वापर करावा. |
| ii) एकाच जागी अवघडलेल्या अवस्थेत जास्त वेळ बसू नये. | ii) उघड्या मैदानात जावे. |
| iii) मेणबत्त्या, कंदील, काड्यापेटी यांचा वापर करू नये. | iii) घरातील मेन स्वीच, गॅस शेगडी बंद करून टॉर्चचा वापर करावा. |
| iv) उंच इमारती, झाडे, विजेच्या खांबाजवळ थांबू नये. | iv) जर तुम्ही चालत्या वाहनामध्ये असाल, तर सुरक्षित जागा पाहून वाहन थांबवा आणि वाहनाच्या आतच थांबावे. |
इ) भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर :
i) भारतीय मानक संस्थेने भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामासाठी तसेच आरेखनांच्या संरचनेसाठी आय एस 456, आय एस 1893, आय एस 13920 हे कोड बनवले आहेत.
ii) भूकंपरोधक इमारतींच्या पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.
iii) अशा इमारतींच्या भिंती कमी वजनाच्या किंवा लाकडाच्या असतात.
iv) भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते.
ई) दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा.
उत्तर :
साधारणतः पावसाळ्यात दरड कोसळतात त्यामुळे
i) वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो.
ii) मानव जीवितहानी, पर्यावरण हानी होऊ शकते. वनस्पती जीवन नष्ट होते.
iii) नद्यांना पूर येऊ शकतात. बदलतात.
iv) धबधब्याची जागा बदलून कृत्रिम जलाशय निर्माण होऊ शकते.
उ. धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय ? तो स्पष्ट करा.
उत्तर :
i) धरणांमधील पाण्याच्या वजनामुळे जमिनीवर अतिरिक्त ताण पडून भूकंप होऊ शकतो.
ii) भुगर्भजलाच्या वाढत्या दाबामुळे धरणाखालील खडक कमकुवत होतात.
iii ) धरणाच्या खाली आणि आजूबाजूला असलेल्या जमिनीमधील लहानलहान भेगा आणि फटी यामध्ये निर्माण झालेल्या पाण्याच्या अतिरिक्त दाबामुळे भूकंप होऊ शकतो.
2. शास्त्रीय कारणे द्या.
अ. भूकंपकाळात पलंग, टेबल, अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.
उत्तर :
i) भूकंपामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात. यामुळे कपाटे, पंखे यासारख्या वस्तू कोसळू शकतात.
ii) पलंग, टेबल अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेतल्यामुळे अशा कोसळणाऱ्या वस्तूंपासून आपल्या डोक्याला गंभीर जखम होणे टाळू शकतो.
म्हणून, भूकंपकाळात पलंग, टेबल अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.
आ. पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये.
उत्तर :
i) पावसाळ्यामध्ये डोंगराळ भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असते.
ii) डोंगराच्या उतारावरून दगड घसरत येऊन एखादी व्यक्ती दगडांमध्ये किंवा झाडांमध्ये अडकू शकते.
यासाठी पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये.
इ. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये.
उत्तर :
i) भूकंपाच्या वेळी विजेच्या पुरवठा अचानक खंडित होऊ शकतो. यामुळे लिफ्टमध्ये असणाऱ्या व्यक्ती बऱ्याच काळासाठी तेथे अडकून पडू शकतात.
ii) जर भूकंप तीव्र स्वरूपाचा असेल, तर लिफ्टची प्रणाली पूर्णपणे बंद पडून लिफ्ट कोसळू शकते आणि गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊ शकतात.
iii) तसेच, ठिणग्या पडल्यामुळे आग लागण्याचीही शक्यता असते. म्हणून, भूकंपाच्या वेळी लिफ्टच्या वापर करू नये.
ई. भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.
उत्तर :
i) भूकंप होत असताना भूकवच कंप पावते व भूपृष्ठाचा काही भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात.
ii) अशा हादऱ्यांमुळे इमारतींना धोका पोहोचू शकतो. हे होऊ नये म्हणून, भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.
3. भूकंपानंतर मदतकार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील ?
उत्तर :
भूकंपानंतर आसपास लोकांची गर्दी जमल्याने येणाऱ्या अडचणी :
i) आपत्ती निवारण कक्षाच्या जवानांना भूकंपग्रस्त लोकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येतील.
ii) जखमी लोकांना साहाय्य करणाऱ्या अँम्ब्युलन्स किंवा इतर वाहनांच्या रस्त्यामध्ये अडथळा आल्यामुळे ते वेळेत भूकंपग्रस्त जागेवर पोहोचू शकणार नाहीत.
iii) जर गर्दीवर नियंत्रण मिळवता आले नाही, तर चेंगराचेंगरीसारखा प्रसंग उद्भवू शकतो.
4. आपत्तीकालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा संघटना व संस्था यांची यादी करा. त्यांच्या मदतीचे स्वरूप याविषयी अधिक माहिती मिळवा.
उत्तर :
| संस्था | कार्य |
|---|---|
| i) राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था | i) भूकंप व विविध आपत्तींसंदर्भात संशोधनाचे कार्य |
| ii) इंडियन माउंटनीयरिंग इन्स्टिट्यूट | ii) भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज |
| iii) इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट | iii) या आंतरराष्ट्रीय संस्था भारतीय संस्थांना मदत करतात. |
| iv) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, नवी दिल्ली | iv) http://www.nidm.gov.in/ |
5. आपत्ती निवारण आराखड्याच्या मदतीने तुमच्या शाळेचे सर्वेक्षण करून मुद्देनिहाय माहिती लिहा.
उत्तर :
| प्रमुख मुद्दे | नोंदी करायच्या आवश्यक बाबी |
|---|---|
| शाळेची प्राथमिक माहिती | i) शाळेचे पूर्ण नाव, पत्ता ii) मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक iii) एकूण कर्मचारी |
| इमारतीची विस्तृत माहिती | i) एकूण खोल्यांची संख्या ii) छताच्या बांधकामाचे स्वरूप (लाकडी/पत्रा/सिमेंट) iii) इमारतीचे वय, वर्ष |
| शाळेच्या मैदानाविषयी माहिती | i) शालेय परिसरात असणारे मोकळे मैदानाचे प्रकार, खो-खो, कबड्डी, प्रार्थना व इतर मैदान ii) मैदानाचे मुख्य रस्त्यापासूनचे अंतर |
| शाळेची दिनचर्या | i) शाळा भरण्याची व सुटण्याची वेळ ii) शाळेत दिवसभरात राबवले जाणारे विविध उपक्रम |
| शाळेतील संभाव्य धोके | i) संभाव्य धोक्याचे नाव व स्वरूप (साधे, मध्यम व तीव्र) ii) पूर्वी झालेले नुकसान व सध्या केलेली उपाययोजना |
6. तुमच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेली ठिकाणी आहेत काय ? याची जाणकारांच्या मदतीने माहिती मिळवा.
उत्तर :
आमच्या गावाच्या जवळून घाटाचा – वळणावळणाचा रस्ता जातो. रस्ता डोंगर दऱ्यातून जाणारा आहे. रस्त्याच्या एका बाजूस दरी आहे. अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या ठोकल्या आहेत. त्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता कमी आहे. तरी पण एक दोन वळणावर तशी शक्यता आहे.
7. खालील चित्राच्या साहाय्याने आपत्तीकाळातील तुमची भूमिका काय असेल ते लिहा.

उत्तर :
i) दिलेल्या चित्रावरून असे दिसून येते, की त्या व्यक्तीला त्याच्या भागामध्ये येऊ घातलेल्या कुठल्यातरी आपत्तीविषयी पूर्वसूचना मिळालेली आहे.
ii) अशावेळी, आपत्ती व्यवस्थापनामध्ये योग्य भूमिका बजावण्यासाठी त्याने आपल्या आसपासच्या भागातील लोकांना आपत्तीविषयी योग्य आणि खात्रीशीर माहिती द्यावी.
iii) तसेच, आपत्तीच्या काळामध्ये सुरक्षित राहण्यासाठी कोणती दक्षता घेता येईल याची माहिती देखील इतरांना द्यावी.
iv) आपत्तीच्या काळामध्ये आवश्यक असणारी साधने जसे अन्नाची पाकिटे, प्रथमोपचार पेटी, इत्यादी तात्काळ गोळा करावे.